श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील धर्मपरंपरा आणि प्रथा मोडू पहाणारे पुरो(अधो)गामी अन् नास्तिकतावादी यांच्या विरोधात हिंदूंनी वैध मार्गाने दिलेला यशस्वी लढा !

हिंदु जनजागृती समिती, हिंदुत्ववादी संघटना आणि शनिशिंगणापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांची  हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम

sunil_ghanvat
श्री. सुनील घनवट
priyanka_lone
कु. प्रियांका लोणे

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांसाठी प्रवेश निषिद्ध असूनही त्या चौथर्‍यावर चढून दर्शन घेण्याचा या महिलांचा यापूर्वी हेका होता. स्वतःला श्री शनिदेवांचे भक्त म्हणवून घेत प्रसिद्धीच्या हव्यासापोटी, तीव्र अहंकाराने भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी तेथे आंदोलन उभारले होते. या आंदोलनाची ठिणगी पेटताच धर्माभिमानी हिंदू, शनिभक्त, हिंदुत्ववादी महिला, ग्रामस्थ, देवस्थान समितीचे सदस्य यांनी धार्मिक परंपरांचे रक्षण करण्याचा वणवा पेटवला. धार्मिक प्रथांच्या रक्षणासाठी सहस्रो धर्माभिमान्यांनी कंबर कसली आणि भूमाता ब्रिगेडवाल्यांचे धर्मद्रोही प्रयत्न हाणून पाडले. श्री शनिशिंगणापूर येथील परंपरांच्या रक्षणाच्या मोहिमेच्या वेळी सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत. हे आंदोलन कसे उभे राहिले ? त्यातील हिंदुत्ववाद्यांचा सहभाग, ग्रामस्थांची श्रद्धा, ईश्‍वराने साहाय्य केल्याविषयी आलेल्या अनुभूती आदी सूत्रे आपण या लेखातून पाहू.

संकलक : श्री. सुनील घनवट आणि कु. प्रियांका लोणे, हिंदु जनजागृती समिती

संघटनेच्या नावातही इंग्रजी शब्द असणारी भूमाता ब्रिगेड हिंदूंच्या धार्मिक परंपरांना नष्ट करण्याचा प्रयत्न करते, यात आश्‍चर्य ते काय !

धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्ण, श्री शनिदेव यांची कृपा आणि संतांचे आशीर्वाद यांमुळेच हे आंदोलन यशस्वी झाले. त्यामुळे श्री शनिदेव आणि संत-महंत यांच्या चरणी कृतज्ञता ! शनिशिंगणापूर ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटना यांचे आभार ! 

अशा विविध सनदशीर मार्गांनी दिला लढा !

IMG_0411
नेवासा (जिल्हा नगर) येथील हिंदुत्ववाद्यांनी काढलेला मोर्चा (१३.१.२०१६)
IMG_0426
नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शशिकांत जोशी यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी (१३.१.२०१६)
T_THU02PHOTO
भूमाता ब्रिगेडच्या निषेधार्थ संघटित झालेल्या सोनई आणि शनिशिंगणापूर येथील ग्रामस्थ महिला (२६.१.२०१६)
IMG-20160127-WA0062
श्री. सुनील घनवट यांचा सत्कार करतांना भीमा महाले, अन्य ग्रामस्थ आणि कु. प्रियांका लोणे (२६.१.२०१६)

१. मोहिमेच्या आरंभी झालेल्या शनिशिंगणापूर ग्रामस्थांच्या बैठकीत ग्रामस्थांची श्री शनिदेवाच्या प्रती असलेली प्रचंड श्रद्धा लक्षात येणे आणि श्री शनिदेव आम्हाला माध्यम बनवत आहेत, असे जाणवणे !

भूमाता ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि काही नास्तिक मंडळी यांनी श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्याचा धर्मद्रोही अट्टाहास करून लाखो शनिभक्तांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला होता. त्याविषयी वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रे यांच्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. या नास्तिकवादी मंडळींनी २६ जानेवारीला श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर पुन्हा एकदा चढण्याचा अट्टाहास करण्यासाठी शनिभक्तांनाच आव्हान दिले होते. आम्ही महिला चौथर्‍यावर चढणारच, असा स्त्रीसमानतेचा डांगोरा पिटणार्‍या नास्तिक मंडळींना रोखायला हवे, असा विचार घेऊन २८ डिसेंबर २०१५ या दिवशी श्री शनिशिंगणापूर येथील काही स्थानिक ग्रामस्थ, विश्‍वस्त, गावातील शनिभक्त आणि सरपंच यांची भेट घेऊन एका बैठकीचे आयोजन केलेे. या बैठकीत श्री शनिदेवाच्या मंदिराला ५५० वर्षांची परंपरा असून याविषयी लोकांची प्रचंड श्रद्धा आहे, हे लक्षात आले. ती कोणी मोडू पहाणार असेल, तर त्याच्या विरोधात वाटेल ते करण्याची सिद्धता असणार्‍या ग्रामस्थांचे मनापासून कौतुक वाटले. त्याच दिवशी निश्‍चय झाला, शनिभक्त ग्रामस्थ आणि लक्षावधी शनिभक्तांचे श्रद्धास्थान असणार्‍या धर्मपरंपरा आणि प्रथा या मोडायला नकोत. त्यासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटनांना एकत्रित करून या विरोधात लढा देऊया. हा निश्‍चय शनिदेवाच्या प्रांगणात झालेल्या बैठकीत साक्षात श्री शनिदेवांनीच करून घेतला. ती बैठक चालू असतांना साक्षात श्री शनिदेव त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्हा सर्वांना त्यासाठी माध्यम बनवत आहेत, असे प्रकर्षाने जाणवलेे.

२. गावच्या सरपंचांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा आधार वाटणे अन् त्यांनी कौतुक करणे !

बैठक चालू असतांना श्री शनिशिंगणापूरचे सरपंच श्री. बाळासाहेब बानकर यांनी सांगितले, या गावात श्री शनिदेव आहे. हे जगप्रसिद्ध देवस्थान आहे. या ठिकाणी असलेल्या धर्मपरंपरा आणि प्रथा मोडण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे, त्या विरोधात आम्ही ग्रामस्थ एकटेच पडलो आहोत. श्री शनिदेव केवळ शनिशिंगणापूरमधील लोकांचाच आहे का ? यासंदर्भात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी जी विविध वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून देवस्थानची बाजू लावून धरली आहे, त्याचा आम्हाला खरोखरच आधार वाटला. तुम्ही आमच्या गावात आलात आणि याविषयी आम्हाला साहाय्य आणि मार्गदर्शन करत आहात. त्यामुळे आम्हाला खरोखरच तुमचा आधार वाटत आहे. २६ जानेवारीला धर्मद्रोह्यांनी जो श्री शनिदेवाच्या प्रथा मोडण्याचा अट्टाहास केला आहे, तो तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून मोडून काढू. यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची सिद्धता सरपंचांनी दर्शवली. सरपंचांनी व्यक्त केलेली खंत लक्षात घेऊन या संदर्भात सर्वांना एकत्र करून आपण या प्रथा आणि परंपरा मोडणार्‍यांच्या विरोधात उभे राहिले पाहिजे, हा मनाशी निश्‍चय केला आणि आंदोलनासाठीची पुढील बैठक निश्‍चित झाली.

३. गावातील राजकारण बाजूला ठेवून ग्रामस्थांनी पद, पक्ष आणि संप्रदाय बाजूला ठेवून धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी संघटित होणे आणि यातून ईश्‍वराचे साहाय्य कसे मिळते, ते अनुभवता येणे !

शनिशिंगणापूर येथील राजकीय आणि सामाजिक स्थिती वेगळी होती. गावातील ग्रामपंचायत एका पक्षाकडेे आणि देवस्थान अन्य एका पक्षाकडे होते. त्यामुळे कोणतेही विधायक कार्य किंवा हिंदुत्वाचे कार्य यांसाठी हे दोघे एकत्र आले नव्हते. गावात असलेले विविध गट, आपापसांतील हेवेदावे यामुळे या मोहिमेसंदर्भात सर्वांचे संघटन करणे, हे एक आव्हानच होते; परंतु भगवंतावर श्रद्धा ठेवून जर कार्य केले, तर ईश्‍वर साहाय्य करतो, याची अनुभूती क्षणोक्षणी आम्ही घेत होतो. या मोहिमेच्या प्रारंभीपासून शेवटपर्यंत जरी इतर विषयांच्या संदर्भात ग्रामस्थांची मतभिन्नता असली, तरी येथील धर्मपरंपरा आणि प्रथा या विषयासाठी, तसेच श्री शनिदेवाच्या प्रथा-परंपरांच्या रक्षणासाठी पद, पक्ष, संघटना बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची सिद्धता दर्शवली आणि ती शेवटपर्यंत पारही पाडली. यातून कितीही अडचणी असल्या, तरी आपण ध्येयाने प्रेरित होऊन कार्य केल्यास ईश्‍वर नक्की साहाय्य करतो, हे शिकायला मिळाले.

४. गावातील लोकांनी मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेणे आणि घरोघरी जाऊन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करणे !

गावात महिला आणि तरुण वर्ग यांच्या विविध ठिकाणी बैठका घेतल्या. सर्वांनीच त्या दिवसापासून आपापल्या परीने धर्मरक्षणासाठी चला शनिशिंगणापूरला या मोहिमेमध्ये सहभाग घ्यायला प्रारंभ केला. गावातील महिला उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडून गटागटाने घरोघरी जाऊन सांगत, आपल्याला २६ जानेवारीला एकत्र यायचे आहे. श्री शनिदेवाचे रक्षण करायचे आहे. आपल्या प्रथा-परंपरांचे रक्षण करायचे आहे. यासाठी प्रतिदिन २५ ते ३० महिला मोहिमेच्या प्रचारासाठी बाहेर पडत होत्या. गावातील तरुण अन्य भागातील तरुणांना एकत्र करून त्यांच्या बैठकांचे आयोजन करत होते. सर्वांना सांगतांना ते सर्व प्रकर्षाने एक भाग सांगून आवाहन करत होते, आपल्या गावातील श्री शनिदेवाच्या रक्षणासाठी बाहेरील लोक येऊन आपल्याला साहाय्य करत आहेत. आपण घरात बसून रहातो आहोत, हे चुकीचे आहे. आजपासूनच आपण बाहेर पडून सर्वांना या मोहिमेत सहभागी करूया.

५. सरपंचांचा मोहिमेमध्ये सक्रीय सहभाग !

सरपंचांनी गावातील सर्व महत्त्वाची मंडळी आणि पदाधिकारी यांच्याशी संपर्क करून त्यांनाही त्या मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी भेटी करून दिल्या. या मोहिमेसाठी गावात आलेले सनातनचे साधक आणि समितीचे कार्यकर्ते यांच्या रहाण्याची अन् जेवणाची व्यवस्था सरपंचांनी स्वत:हून केली. तसेच त्यांना आपल्या गावात या कार्यासाठी बाहेरून कोणीतरी येऊन साहाय्य करत आहे, याविषयी पुष्कळ कृतज्ञताही वाटत होती. याविषयी ते वारंवार बोलत होते.

६. श्री शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्तांचे मोहिमेमध्ये सहकार्य !

या मोहिमेत सहभागी सर्व कार्यकर्त्यांसाठीचे भोजन आणि निवास यांची व्यवस्था श्री शनैश्‍वर देवस्थानच्या अन्नछत्रामध्ये करण्यात आली होती, तसेच प्रसारासाठी आसपासच्या वाड्यावस्त्यांमध्ये जाण्यासाठी वाहनाची व्यवस्थाही उपलब्ध करून दिली होती. देवस्थानचे उपाध्यक्ष श्री. नानासाहेब बानकर यांनी ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी यांच्या बैठकीसाठी स्वत:चे लॉन उपलब्ध करून दिले आणि त्यांच्या चहापानाची व्यवस्था केली. या मोहिमेसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून देऊन सर्वतोपरी सहकार्यही केले.

७. गावातील तरुणांकडून पत्रके, भित्तीपत्रके, फ्लेक्सचे फलक, फलकलेखन यांच्या माध्यमातून पंचक्रोशीत प्रसार !

चला शनिशिंगणापूरला या मोहिमेचा व्यापक प्रसार होण्याच्या दृष्टीकोनातून भित्तीपत्रके आणि फ्लेक्सचे फलक सिद्ध केले होते. ते पंचक्रोशीत लावणे, त्यासाठी प्रायोजक शोधणे आणि त्यासाठी लागणार्‍या सर्व गोष्टी विनामूल्य मिळाव्या, यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेतला. त्यामुळे मोहिमेच्या आधी पंचक्रोशीत या मोहिमेची वातावरणनिर्मिती झाली होती. अनेक स्थानिक संघटनांनी स्वत:हून या मोहिमेचे फलक लावले आणि या मोहिमेत सक्रीय सहभाग दर्शवला. या मोहिमेचा प्रसार व्यापक स्तरावर झाल्याने सर्वांचीच त्या दिवशी या प्रथा-परंपरांच्या रक्षणासाठी आपण शनिशिंगणापूरमध्ये यायलाच हवे, अशी उत्स्फूर्त सिद्धता झाली. पंचक्रोशीतील अनेक तरुण भित्तीपत्रके आणि फ्लेक्सचे फलक स्वतःहून घेऊन जाऊन आपापल्या भागात लावत होते अन् मोहिमेचा प्रसार करत होते. गावात अनेक ठिकाणी फलकलेखनही करण्यात आले होते. नगर जिल्ह्यातील ११ तालुके आणि ३५ हून अधिक गावांत या मोहिमेचा प्रसार झाला होता.

८. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून दिलेला यशस्वी लढा !

८ अ. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्यासाठी पत्र देण्याची धर्मादाय आयुक्तांकडे मागणी केल्याचे समजणे आणि त्याविषयी धर्मादाय आयुक्तांना पत्र पाठवल्यावर त्यांनी चौथर्‍यावर चढण्याला प्रतिबंध करणारा आदेश काढणे : या मोहिमेविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेने मोलाचे सहकार्य केले. परिषदेने या मोहिमेसाठी लागणारे कायदेशीर साहाय्य करण्याची सिद्धता दर्शवली. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या समवेत झालेल्या बैठकीत आपण कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने हा लढा कसा देऊ शकतो, याविषयी रणनीती सिद्ध करण्यात आली. ही बैठक चालू असतांनाच एका हितचिंतक अधिवक्त्यांचा भ्रमणभाष आला. त्या वेळी त्यांनी सांगितले, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात आल्या होत्या. त्या आम्हाला तुम्ही श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावरती चढण्यासाठी दोन ओळींचे पत्र द्या, अशी आग्रही मागणी करत होत्या. धर्मादाय आयुक्तांनी जर असे पत्र दिले, तर या धर्मद्रोह्यांना श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावरती चढणे सहज शक्य होणार होते. ही संभाव्य धर्महानी लक्षात घेऊन या संदर्भात धर्मादाय आयुक्तांच्या कर्तव्यांविषयी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, न्यायविधी विभाग, धर्मादाय आयुक्त आणि नगर येथील धर्मादाय आयुक्त यांना पत्र पाठवण्याचा विचार झाला. या पत्रात असे आदेश जारी करण्याचा आपल्याला अधिकार नाही आणि तसे केल्यास आम्ही याविषयी न्यायालयात जाऊ, असे सांगण्यात आले. दुसर्‍याच दिवशी धर्मादाय आयुक्तांनी भूमाता ब्रिगेडला शनिशिंगणापूर येथे जाऊन श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्याला प्रतिबंध करणारा आदेश काढला. या मोहिमेतील हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून मिळालेले हे पहिले यश होते. ईश्‍वराच्या कृपेने ते हितचिंतक अधिवक्ता त्या वेळी धर्मादाय आयुक्त कार्यालयात असणे, त्यांनी तत्परतेने निरोप देणे, लगेचच याविषयी पत्र पाठवणे आणि त्याचा यशस्वी परिणाम होणे, हा योगायोग नसून या कार्यात ईश्‍वर आपल्यासमवेत आहे, याची अनुभूती आली.

८ आ. पोलीस अधिक्षकांना भूमाता ब्रिगेडचा पूर्वेतिहास सांगणारे पत्र लिहिल्यानंतर पोलिसांनी भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांना नगर जिल्ह्याच्या सीमेवरच रोखणे : यासंदर्भात नगर येथील पोलीस अधिक्षकांना भूमाता ब्रिगेडचा पूर्वेतिहास सांगणारे पत्र लिहिले. त्यामध्ये भूमाता ब्रिगेड या संघटनेत असलेला अन्य धर्मियांचा सहभाग आणि त्यामुळे जर २६ जानेवारी या दिवशी महिलांना शनिशिंगणापूर येथे येऊ दिले; परंतु श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावरती चढू दिले नाही, तर त्या ठिकाणी महिलांकडून अयोग्य कृती होऊ शकते, तसेच त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो आणि तसे झाल्यास याला सर्वस्वी आपल्याला उत्तरदायी धरून आपल्या विरोधात न्यायालयात जाऊ, असे लिहिले. तेव्हा पोलीस अधीक्षक सतर्क झाले आणि त्यांनी सर्व महिलांना नगर जिल्ह्यात प्रवेश करतांनाच सुपे या ठिकाणी अडवले.

या सर्व प्रसंगांमधून कोणतेही आंदोलन आणि मोहीम यांसाठी अधिवक्त्यांचे कायदेशीर मार्गदर्शन आणि सहभाग असेल, तर ते आंदोलन यशस्वी होऊ शकते, हे शिकायला मिळाले.

९. मोहिमेचा व्यापक प्रसार म्हणून पंचक्रोशीत बैठका घेणे

नगर जिल्ह्यात ११ तालुक्यांमध्ये प्रत्येक दोन दिवसांनी त्या ठिकाणच्या विविध हिंदुत्ववादी संघटना एकत्र येऊन तहसीलदारांना निवेदने देत होत्या. या मोहिमेला आमचा पाठिंबा असून भूमाता ब्रिगेडच्या सर्व महिलांना जिल्हाबंदी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात येत होती. यामध्ये नेवासा, श्रीरामपूर, श्रीगोंदा, शेवगाव, नगर, कोपरगाव, पाथर्डी, संगमनेर, राहुरी, जामखेड, कर्जत या ११ तालुक्यांमधील विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग होता. नेवासा या ठिकाणी घेतलेल्या बैठकीला १०० तरुण उपस्थित होते. त्यांनी नेवासा तालुक्यातील १०० गावांमध्ये हा विषय पोहोचवण्याचे दायित्व घेतले, तसेच शनिशिंगणापूर येथून येणार्‍या विविध रस्त्यांवरच धर्मद्रोह्यांना रोखण्याचे दायित्व घेतले. त्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. नेवासामध्ये या मोहिमेतील सहभाग दर्शवण्यासाठी १५० हून अधिक तरुणांनी उत्स्फूर्तपणे मोर्चा काढला. त्या मोर्च्याची बातमी सर्व वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्याने पंचक्रोशीतील सर्वांना या मोहिमेविषयी समजले. या घटनेमुळे तरुणांमधील उत्साह वाढला. तसेच छावा संघटनेचे श्री. अशोक सोनावणे आणि श्री. दत्ता वामन यांनीही १ सहस्राहून अधिक तरुणांसह नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. त्या वेळी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन खणखणीत चेतावणी दिली की, त्या महिलांना शनिशिंगणापूर सोडाच; पण नगर जिल्ह्यातही पाय ठेवू देणार नाही. प्रत्यक्ष त्या दिवशीही छावा संघटनेचे अनेक कार्यकर्ते धर्मपरंपराच्या रक्षणासाठी शनिशिंगणापूर येथे उपस्थित होते.

१०. नेवासा येथील सक्रीय धर्माभिमानी आणि बजरंग दलाचे श्री. संतोष पंडुरे !

Santosh-Pandure_clr
श्री. संतोष पंडुरे

बजरंग दलाचे श्री. संतोष पंडुरे यांच्या घरची परिस्थिती अतिशय हालाखीची असून मागील ५ वर्षांपासून त्यांच्यावर न्यायालयीन खटले चालू आहेत. असे असतांनाही धर्माविषयीची तळमळ काय असते, याचे जिवंत उदाहरण त्यांच्या माध्यमातून पहायला मिळाले. या मोहिमेसाठी रात्री अपरात्री कोणत्याही ठिकाणी बोलावल्यानंतर तत्परतेने हातातील सर्व गोष्टी बाजूला ठेवून ते उपस्थित रहात. स्वत:च्या घरातीलच कार्य आहे, या भावाने ते धर्मकार्य करत होते. या आंदोलनाला श्री शनैश्‍वर आपल्याला यश देणारच आहेत, यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून जे सनदशीर आंदोलन उभे रहात आहे, त्यातूनच आपल्याला यश मिळणार आहे, हे सर्वांना सांगून सर्वांना सहभागी करून घेत होते. श्री शनिशिंगणापूर हे देवस्थान नेवासा तालुक्यात येत असल्याने श्री शनैश्‍वराच्या ठिकाणचे पावित्र्य आणि परंपरा यांचे रक्षण करणे, हे आपले दायित्व आहे, या विचाराने प्रेरित होऊन पंचक्रोशीत विविध बैठकांचे त्यांनी आयोजन केले. यामध्ये विविध पक्ष, संप्रदाय, संघटना यांचा सक्रीय सहभाग करून घेतला. नेवासा या ठिकाणी निघालेल्या मोर्च्यामध्ये केवळ श्री. संतोष पंडुरे यांच्या नेतृत्वामुळे सर्वपक्षीय लोकांचा सहभाग होता. श्री. पंडुरे यांच्यासमवेत काही राजकीय मंडळींना भेटण्याचा योग आला. त्या वेळी या राजकीय मंडळींची अनास्था आणि उदासीनता अन् प्रत्येक गोष्टीत होणारे राजकारण पाहून निराश न होता, आपल्याबरोबर ईश्‍वराचे अधिष्ठान आहे, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आपल्या समवेत आहे अन् अधिवक्त्यांचे साहाय्य आपल्याला आहे, त्यामुळे काहीही चिंता करण्याची आवश्यकता नाही, आपण सर्वांनी यथाशक्ती या ईश्‍वरी कार्यात सहभागी होऊया, असा त्यांनी ठेवलेला भाव वाखाणण्याजोगा होता. श्री. पंडुरे यांच्यासारखे धर्माभिमानी हीच धर्माची खरी शक्ती आहे, हे शिकायला मिळाले.

११. मोहिमेचा व्यापक प्रसार

११ अ. विविध जिल्ह्यांत पत्रकार परिषदा घेतल्याने या मोहिमेचा प्रसार संपूर्ण राज्यात आणि राष्ट्रीय स्तरावर होणे

११ अ १. पहिल्याच पत्रकार परिषदेनंतर विविध वाहिन्यांनी समितीसह सर्व हिंदुत्ववादी संघटना शनिशिंगणापूर येथे प्रथा-परंपरा मोडू पहाणार्‍यांना विरोध करणार, अशा वार्ता प्रसिद्ध केल्याने आंदोलनाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त होणे : शनिशिंगणापूर देवस्थान नगर जिल्ह्यात असल्याने आणि हा विषय राज्यस्तरीय असल्याने याविषयी राज्यस्तरीय पत्रकार परिषद घेऊन नगरमध्येच या विषयाला वाचा फोडली. पहिल्याच पत्रकार परिषदेत पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हा विषय केवळ नगरपुरता मर्यादित न रहाता राज्यातील विविध ठिकाणच्या वृत्तपत्रांमध्ये याविषयीच्या वार्ता प्रसिद्ध झाल्या. एबीपी माझा, टीव्ही ९, आयबीएन् लोकमत, झी २४ तास या वाहिन्यांनी हिंदु जनजागृती समितीसहित सर्व हिंदुत्ववादी संघटना शनिशिंगणापूर येथे संरक्षक कडे उभारून प्रथा-परंपरा मोडू पहाणार्‍यांना विरोध करणार, अशा आशयाच्या वार्ता प्रसिद्ध केल्याने आंदोलनाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. यानंतर पोलीस, प्रशासन आणि पुरोगामी संघटना यांनी या विषयाकडे गांभीर्याने पहायला आरंभ केला.

११ अ २. विविध जिल्ह्यांमधील पत्रकार परिषदांमध्ये केलेल्या चलो शनिशिंगणापूर या उद्घोषामुळे व्यापक प्रसार होणे : नगर, नंदुरबार, जळगाव, पुणे, मुंबई अशा विविध जिल्ह्यांमध्ये ५ – ६ दिवसांच्या अंतराने पत्रकार परिषदा घेऊन चलो शनिशिंगणापूर हा उद्घोष करण्यात आला. या सर्व जिल्ह्यांतून हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि रणरागिणी सहस्रोंच्या संख्येने शनिशिंगणापूरमध्ये दाखल होऊन शनि चौथर्‍याभोवती संरक्षक कडे उभारून धर्मद्रोह्यांना रोखणार, हा विषय पोहोचला. अशा प्रकारे या आंदोलनाच्या संदर्भात व्यापक जनप्रसार व्हावा आणि विषयाची व्याप्ती सर्वांपर्यंत पोचावी, यासाठी विविध जिल्ह्यांत घेतलेल्या पत्रकार परिषदांचा मोलाचा सहभाग झाला.

११ अ ३. अनेक वृत्तवाहिन्यांनी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या प्रवक्त्यांना चर्चासत्रात आमंत्रित करणे : या सर्वांचा परिणाम म्हणून मराठी, हिंदी आणि इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती अन् हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या प्रवक्त्यांना चर्चासत्रात आमंत्रित केले. याद्वारेही शनिशिंगणापूर येथील धर्मरक्षणाचा विषय राष्ट्रीय स्तरावर पोहोचून त्यांना धर्मरक्षण करणार्‍या संघटना अशी प्रसिद्धी ईश्‍वराच्या कृपेमुळे मिळाली. या माध्यमातून ६ नवीन महिला प्रवक्त्या सिद्ध झाल्या. प.पू. गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे येणार्‍या काळात विविध विषयांच्या संदर्भात संस्था आणि समिती यांच्या प्रवक्त्यांना बोलावले जाणार, याची आठवण झाली. यातून एखाद्या जिल्ह्यातील विषय वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वरूपाचा कसा करू शकतो ?, हे शिकायला मिळाले. त्याचसह या पत्रकार परिषदांचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक महिला प्रवक्त्या आणि रणरागिणी यांनी या परिषदा घेतल्या.

११ आ. हिंदु धर्मजागृती सभांमधून धर्माभिमान्यांना शनिशिंगणापूर येथील धर्महानी रोखण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केल्यावर अनेक जण सहभागी होणे : या कालावधीत पुणे, जळगाव, कारंजा, धुळे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हिंदु धर्मजागृती सभांना आलेल्या सर्व धर्माभिमान्यांना शनिशिंगणापूर येथील धर्महानी रोखण्यासाठी कोण सहभागी होणार ?, असे आवाहन केल्यानंतर सर्वच जण उत्स्फूर्तपणे हात उंचावून आपला सहभाग दाखवत होते. अनेक जण सहभागीही झाले. नंदुरबार आणि जळगाव येथील हिंदु धर्माभिमान्यांनी स्वतः शनिशिंगणापूर येथे जाण्यासाठी स्वतःचे वाहन उपलब्ध करून दिले. या सभांच्या माध्यमातून देवस्थानचा विषय तळागाळापर्यंत पोहोचला. त्यामुळे केवळ शनिशिंगणापूरच नव्हे, तर अन्य ठिकाणीही प्रथा, परंपरा मोडीत काढणार्‍यांच्या विरोधात खंबीरपणे उभे रहाण्याची सर्वांची सिद्धता झाली. त्याचसह वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे आणि पुरोगामी यांच्याकडून जे अपसमज पसरवले जात होते, ते दूर होऊन या विषयाच्या संदर्भात स्पष्टता आली. या सभांच्या माध्यमातून धर्महानीच्या विषयांना वाचा फोडल्यास लोकांचा सहभाग वाढतो, लोक कृतीशील होण्यासाठी सिद्ध आहेत; पण त्यांना दिशा देण्याची आवश्यकता आहे, हेच लक्षात येते.

११ इ. विविध संघटनांचा सहभाग : छावा, बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, सारा फाऊंडेशन, अखिल भारतीय मराठा महासंघ, शनिशिंगणापूर, नेवासा, सोनई ग्रामस्थ, स्थानिक भजनीमंडळे आणि गणेशोत्सव मंडळे शनिशिंगणापूर युवा मंच, शिवप्रतिष्ठान, श्री संप्रदाय, हिंदु एकता आंदोलन, वारकरी संप्रदाय, अखिल भारतीय वारकरी मंडळ, शिवसेना, भाजप, भाजप युवा मोर्चा, काँग्रेस युवा मोर्चा, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांतील शनिभक्तांच्या सहभागाने या आंदोलनातून संघे शक्तिः कलौयुगे । या धर्मशास्त्रातील वचनाप्रमाणे सर्व जण एकत्रित आल्यामुळे धर्मद्रोह्यांना पळता भुई थोडी झाली आणि शेवटी धर्माचाच विजय झाला.

११ ई. दैनिक सनातन प्रभातच्या माध्यमातून लेख आणि वार्ता यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाल्याने मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळणे : दैनिक सनातन प्रभातच्या माध्यमातून २६ जानेवारी चलो शनिशिंगणापूर या मोहिमेविषयी एक विशेषांक मोहिमेच्या आधी तीन आठवडे प्रसिद्ध करण्यात आला. त्यात शनिशिंगणापूर येथील प्रथा-परंपरांविषयी माहिती, सर्व शनिभक्त वाचक आणि हिंदुत्ववादी यांना आवाहन, तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असलेली आंदोलने, बैठका, पत्रकार परिषदा, प्रसार या सर्वांची माहिती देण्यात आली होती. या विशेषांकाचे सर्वत्र अधिक वितरण केल्याने या मोहिमेमध्ये अनेक हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय यांनी स्वतःहून आम्ही त्या दिवशी शनिशिंगणापूर येथे येऊन सहभागी होणार आहोत, असे सांगितले, तसेच देवस्थानच्या ठिकाणी नेमके काय चालू आहे, आपण या नास्तिक आणि धर्मद्रोही मंडळींना का विरोध करायला हवा आणि सर्वांचा वाढता सहभाग, हे सर्व स्पष्ट झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर या मोहिमेला पाठिंबा मिळाला. प.पू. गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे एक गोष्ट अनुभवायला मिळाली, दैनिक सनातन प्रभात हे केवळ वार्ता देणारे दैनिक नसून लोकांना कृतीशील बनवणारे दैनिक आहे.

११ उ. संतांच्या आणि शंकराचार्यांच्या अनुमतीने हिंदूंच्या धार्मिक प्रथा-परंपरा मोडीत काढल्यास आम्ही त्याला प्रखर विरोध करणार आहोत, असा ठराव पहूर या गावी संमत करणे : या मोहिमेच्या काळात पुरोगामी आणि नास्तिक मंडळी पत्रकारांच्या साहाय्याने काही संघटनांना सहभागी करून घेऊन पोलीस अन् प्रशासन यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होती. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ते आम्हाला पूर्ण संरक्षण देणार आहेत, असेही त्यांनी घोषित केले. या सर्व गोष्टी पहाता आता हिंदु धर्मातील प्रथा आणि परंपरा यांसंदर्भात हिंदु धर्मातील अधिकारी व्यक्ती संत अन् शंकराचार्य यांनी याविषयीची स्वतःची भूमिका मांडून चालू असलेल्या वादंगावर पडदा टाकणे आवश्यक होते. ईश्‍वराच्या कृपेने शेवगाव तालुक्यातील पहूर या गावी एका आध्यात्मिक कार्यक्रमासाठी करवीर पीठाचे शंकराचार्य, स्वामी गोविंददेवगिरी महाराज आणि वारकरी संप्रदायातील अनेक संत-महंत उपस्थित रहाणार असल्याचे समजले. त्यांपैकी काही संतांशी संपर्क साधून शनिशिंगणापूरच्या विषयाची माहिती दिली. सर्वांनी या कार्यक्रमात या घटनेचा निषेध करून सर्व संतांच्या आणि शंकराचार्यांच्या अनुमतीने हिंदूंच्या धार्मिक प्रथा-परंपरा जपल्या पाहिजेत, त्यांचे संवर्धन केले पाहिजे. कुणी त्या मोडीत काढत असेल, तर त्याला आम्ही प्रखर विरोध करणार आहोत, अशा आशयाचा ठराव संमत करण्यात आला. तो राज्याचे मुख्यमंत्री, धर्मादाय आयुक्त आणि शनिशिंगणापूर विश्‍वस्त यांना पाठवण्यात आला. या कार्यक्रमात १० सहस्रांहून अधिक लोकांची उपस्थिती होती. सर्वानुमते २६ जानेवारीला चलो शिंगणापूर असा उद्घोष करून शंकराचार्यांसहित सर्व संतांनी प्रथा मोडण्याच्या प्रकाराला विरोध केला. या ठरावाची वार्ता आणि ठराव सर्व प्रसिद्धीमाध्यमांपर्यंत पोहोचवून राज्यभर त्याला प्रसिद्धी मिळेल, असे नियोजन केले. अशा प्रकारे धर्मरक्षणाच्या बाजूने शंकराचार्य आणि संत उभे राहिल्याने पोलीस प्रशासनावर दबाव निर्माण झाला. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आणि शनिशिंगणापूर ग्रामस्थ यांना त्याचा आधार वाटून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

१२. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेला प्रसार

मोहिमेच्या पहिल्या दिवसापासूनच विविध ठिकाणी झालेल्या बैठका, पत्रकार परिषदा, सभा, वर्तमानपत्रांतील कात्रणे, आंदोलने, मोर्चे या सर्वांविषयीच्या वार्ता, माहिती, व्हिडीओ, छायाचित्रे, विरोधकांची रणनीती, शासनाचे धोरण, संतांच्या बैठका आणि ठराव, त्याचसमवेत पंचक्रोशीतील, राज्यभरातील अद्ययावत् घडामोडींची माहिती प्रतिदिन राज्यभरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना, कार्यकर्ते यांच्यापर्यंत पोचेल आणि प्रतिदिन तिचा प्रसार होईल, याचे नियोजन केले. यासाठी एका राज्यस्तरीय गटाचे नियोजन केले. त्यामुळे छोट्यातील छोटी घटनासुद्धा सवार्र्ंपर्यंत पोहोचत असल्याने हिंदुत्ववाद्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण झाला. संपूर्ण राज्यभरातून या मोहिमेला प्रतिसाद मिळत असल्याचे पोलीस प्रशासनाच्याही लक्षात आले. त्यामुळे या विरोधकांच्या आंदोलनाच्या बाजूने आपण जर कल दिला, तर संपूर्ण राज्यभरामध्ये कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, हे त्यांच्या लक्षात आले. शनिशिंगणापूर येथील मोहिमेला राज्यभरातूनच अनेक हिंदुत्ववादी संघटना उपस्थित राहणार, असे वातावरण या सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण झाले. यामध्ये शनिशिंगणापूर, सोनई, नेवासा या ठिकाणी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्या गटांमधूनही या मोहिमेचा प्रसार केला.

या संदर्भात हिंदुजागृती.ओआर्जी या संकेतस्थळावर चलो शनिशिंगणापूर या नावाने विशेष पानही सिद्ध करण्यात आले होते. त्या माध्यमातून हा विषय जगभरातील अनेक लोकांपर्यंत पोचला. सोशल मिडियाच्या माध्यमातून १८ लक्षहून अधिक लोकांपर्यंत पोहोचला. याचा परिणाम म्हणजे शनिशिंगणापूर येथील मोहिमेमध्ये सर्वांचा झालेला उत्स्फूर्त सहभाग ! यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमधून काही कार्यकर्त्यांचा गट सिद्ध करण्यात आला होता. त्यांनी अतिशय तळमळीने प्रयत्न केले. फेसबूक, ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅप, संकेतस्थळ, इमेल, व्हॉइस एस्एम्एस् इत्यादी माध्यमांचा यात सहभाग करण्यात आला होता. काळानुसार आधुनिक माध्यमांचा उपयोग करून सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्महानी कशी रोखता येते, याचे उत्तम उदाहरण, म्हणजे शनिशिंगणापूर मोहीम !

१३. मोहिमेची पंचसूत्री

१३ अ. कागदपत्रांचा वापर : शनिशिंगणापूर येथील प्रथा-परंपरांच्या संदर्भात धर्मशास्त्रीय आधार असलेली कागदपत्रे, कायद्याविषयी माहिती असलेली, तसेच मोहिमेचा आध्यात्मिक दृष्टीकोन असणारी माहितीपत्रके, विविध वर्तमानपत्रांमधून आपल्या बाजूने प्रसिद्ध झालेली कात्रणे, बैठकांची छायाचित्रे, व्हिडीओ ही सर्व कागदपत्रे समवेत ठेवून प्रत्येक बैठकांमध्ये सर्वांना दाखवून या मोहिमेत सहभागी करवून घेण्यात आले. कागदपत्रांमुळे सर्वांचा विश्‍वास लगेच बसण्यास साहाय्य झाले.

१३ आ. कायदेशीर मार्गदर्शन : मोहिमेची पूर्वसिद्धता आणि प्रत्यक्ष नियोजन चालू असतांना येणार्‍या अडचणींविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतल्याने पुढील रणनीती ठरवण्यास साहाय्य झाले. अधिवक्ता आपल्या पाठीशी आहेत. उद्या या आंदोलनाच्या संदर्भात कायदेविषयक काहीही अडचण आली, गुन्हे प्रविष्ट झाले, तरी आम्ही या मोहिमेत सहभागी व्हायला सिद्ध आहोत, असा विश्‍वास निर्माण झाला. हिंदु विधीज्ञ परिषदेचा सर्वांना आधार वाटला.
श्री मिलिंद चवंडके

१३ इ. पत्रकारांचा सहभाग : नगर जिल्ह्यातील नगर टाईम्स या सायंदैनिकाचे मुख्य वार्ताहर श्री. मिलिंद चवंडके यांच्या अनुभवाचा या मोहिमेसाठी लाभ झाला. वर्ष २००२ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि काही धर्मद्रोही मंडळींनी चला चोरी करायला शनिशिंगणापूरला, अशी धर्मद्रोही मोहीम हाती घेतली होती. त्याला श्री. चवंडके यांनी प्राणपणाने विरोध केला होता. त्यांचा त्या वेळचा अनुभव आणि सध्याची एकंदरित परिस्थिती या सर्वांची माहिती असणारा एक लेख त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध केला होता. त्या लेखाचा लाभही विविध ठिकाणी करत असलेला प्रसार आणि नियोजन यांसाठी आत्यंतिक उपयोगी ठरला.

पत्रकार अल्प आणि या मोहिमेतील सक्रिय कार्यकर्ता अधिक, अशी श्री. चवंडके यांची भूमिका होती. त्यांनी दिवसाआड विविध घटनांची केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यभरातील घडामोडींची प्रेसनोट नगर जिल्ह्यातील सर्व वर्तमानपत्रांत कशी छापून येईल, याचे दायित्वच घेतले होते.

न कंटाळता अतिशय उत्साहाने, तळमळीने आणि मनापासून धर्मकार्य कसे करावे, हे त्यांच्याकडून शिकायला मिळाले. दर दोन दिवसांतून प्रसिद्ध होणार्‍या वार्तांमुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे, तर संपूर्ण राज्यामध्ये या मोहिमेविषयी २६ जानेवारीला नेमके काय होईल ? श्रद्धाळू भक्त जिंकतील का ?, याची उत्सुकता आणि उत्कंठा शिगेला पोहोचली होती. त्याचसमवेत केवळ पत्रकारिताच नव्हे, तर त्यांच्या आंदोलनाचा लाभ या आंदोलनाला कसा होईल, याचे मार्गदर्शन त्यांनी वेळोवेळी केले. मग ते धर्मादाय आयुक्त, शनिशिंगणापूर येथील विश्‍वस्त, पत्रकार, विरोधकांची रणनीती आणि जिल्ह्यात होणार्‍या विविध कार्यक्रमांमधून शनिशिंगणापूर येथील मोहिमेचा विषय सर्वांपर्यंत कसा पोचवता येईल, याची त्यांची धडपड असायची. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेतील एक पत्रकार जरी धर्मरक्षणासाठी सर्वशक्तीनिशी उभा राहिला, तरी आंदोलन किती व्यापक स्तरावर पोचू शकते, याचे हे मूर्तीमंत उदाहरण आहे.

Sarpanch_Balasaheb_Bankar_col
श्री. बाळासाहेब बानकर

१३ ई. स्थानिक ग्रामस्थ आणि आणि सरपंच यांचा कृतीशील सहभाग : शनिशिंंगणापूरचे सरपंच श्री. बाळासाहेब बानकर यांनी स्वतःहून सक्रिय सहभाग आणि पुढाकार घेतला होता. यासंदर्भात गावातील महिलांना एकत्र करून त्यांची एक बैठक घेतली आणि २६ जानेवारीला सर्व महिलांनीच पुढाकार घेऊन भूमाता ब्रिगेडला कसे रोखले पाहिजे, याविषयी रणरागिणी शाखेच्या कु. प्रियांका लोणे यांचे मार्गदर्शन ठेवले. यानंतर गावातील ग्रामस्थ महिलांनी उत्स्फूर्तपणे पोलीस स्थानकात जाऊन निवेदन दिले. संपूर्ण गावातील महिलांना हा विषय लक्षात यावा, यासाठी गावातील महिलांच्या एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला २५० हून अधिक महिला आणि ग्रामस्थ सहभागी होते. सरपंचांनी आयोजित केलेल्या या बैठकीला मंदिर विश्‍वस्त, हिंदुत्ववादी संघटना आणि ग्रामस्थ हे उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या बैठकीनंतर गावातील महिलांचा आत्मविश्‍वास वाढून त्यांनी संपूर्ण पंचक्रोशीत या मोहिमेचा प्रसार करण्याचे दायित्व स्वीकारले. प्रत्यक्ष वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन प्रसार केला. याचा परिणाम म्हणजे स्थानिक पोलीस प्रशासन सतर्क झाले. संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा याला विरोध होत आहे, असा संदेश संपूर्ण राज्यभर पोचला. या बैठकीचे स्थळ ऐनवेळी पालटले होते, तरीही महिलांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एक काकू प्रवरासंगम येथून त्यांच्या यजमानांना घेऊन या बैठकीला आल्या होत्या. या बैठकीची वार्ताही प्रसिद्धीपत्रकाद्वारे संपूर्ण राज्यभर कशी लागेल, याचे नियोजन केल्याने पुन्हा एकदा शनिशिंगणापूर येथील ग्रामस्थ महिलाच भूमाता ब्रिगेडच्या विरोधात रस्त्यांवर उतरून त्यांना रोखणार, अशा आशयाच्या वार्ता प्रसिद्ध झाल्या.

१३ ई १. ग्रामसभेचा ठराव : सरपंचांनी २५ जानेवारीला गावातील सर्व महिलांची ग्रामसभा बोलावून शनिशिंगणापूर येथील परंपरा मोडू देणार नाही, अशा आशयाचा ग्रामपंचायतीचा ठराव करून शासन दरबारी पाठवला. त्याचाही या आंदोलनातील परिणाम महत्त्वपूर्ण होता. या वार्ता सर्वत्र प्रसिद्ध झाल्या.

त्यामुळे शंकराचार्य, संत-महंत, हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय, पक्ष, शनिभक्त, श्रद्धाळू, ग्रामपंचायतीचा ठराव आणि ग्रामस्थ यांच्या प्रखर विरोधामुळे केवळ शनिशिंगणापूरमध्येच नव्हे, तर सोळशी, बीड, मुंबई या जिल्ह्यांमध्ये महिलांच्या समानतेसाठी हिंदूंच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथा-परंपरा मोडण्यासाठी जो पुरोगाम्यांचा उच्छाद चालू होता, त्याला खीळ बसली आणि अन्य जिल्ह्यांमध्ये अशा प्रथा-परंपरा मोडीत काढण्याचा विचारही त्यांनी केला नाही.

१३ उ. श्रद्धाळू भाविकांचा सहभाग : कोणतेही आंदोलन वा मोहीम करतांना त्या विषयाशी संबंधित ज्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत आणि ज्यांची त्या विषयाच्या संदर्भात श्रद्धा आहे, त्यांचा सहभाग करून घेतल्यास कोणतेही आंदोलन यशस्वी होते, हे शनिशिंगणापूर आंदोलनातून लक्षात आले. अशा प्रकारे वरील पंचसूत्रीमुळे कोणतेही आंदोलन यशस्वी होऊ शकते, हे शिकायला मिळाले.

१४. ग्रामस्थ आणि शनिभक्त यांच्या श्रद्धेची काही उदाहरणे

१४ अ. दोन दिवस वृत्तवाहिन्यांवरील वार्ता पाहून आम्ही जेवलोसुद्धा नाही, असे सांगणारे शनिभक्त श्री. आणि सौ. तवले : पहिल्यांदा शनिशिंगणापूर येथे गेलो, त्या वेळी तेथील शनिभक्त श्री. आणि सौ. तवले यांच्या घरून गेली २५ वर्षे शनिदेवाला सायंकाळचा नैवेद्य दिला जातो. यांना भेटल्यानंतर धर्मद्रोही महिलांनी आमच्या शनिदेवाचा जो अपमान केला, त्या संदर्भातील वृत्तवाहिन्यांवरील वार्ता पाहून दोन दिवस आम्ही जेवलोसुद्धा नाही, असे सांगितले आणि आमच्याच शनिदेवाचा हा अपमान का ?, असे विचारले. तेव्हा ५० वर्षांहून अधिक वय असणार्‍या पती-पत्नींच्या डोळ्यांतून अश्रू वहात होते. एखाद्याची देवाविषयी किती नितांत श्रद्धा असते, याचे आदर्श उदाहरण म्हणजे, हे पती-पत्नी होते. तुम्ही या गावात येऊन आमच्या शनिदेवाच्या रक्षणासाठी प्रयत्न करणार असाल, तर आम्ही तुमच्यासमवेत प्राणपणाने उभे राहू, असेही त्यांनी सांगितले.

१४ आ. धर्मद्रोही महिला शनिचौथर्‍यावर चढणार असतील, तर आम्ही त्याला प्रखर विरोध करू, असे सांगणारे एक शनिभक्त ! : याच गावातील आणखी एक शनिभक्त गेल्या ४५ वर्षांपासून प्रतिदिन सायंकाळी न चुकता ऊन, वारा आणि पाऊस यांची पर्वा न करता शनिदेवाच्या सायंआरतीला जातात. त्यांचीही भेट झाली. त्यांनी झालेल्या प्रकाराविषयी खंत व्यक्त करून आमच्या गावातील एकाही महिलेला शनिचौथर्‍यावर चढावे, असे वाटत नाही. मग जर या महिला तसे करणार असतील, तर आम्ही ग्रामस्थ त्याला प्रखर विरोध करू, अशी भूमिका त्यांनी घेतली. अशा श्रद्धाळूंच्या या गावी देवाने या मोहिमेच्या माध्यमातून शिकण्यासाठी तेथे पाठवले, यासाठी मनोमन कृतज्ञताच व्यक्त होते.

१४ इ. मोहीम पूर्ण होईपर्यंत पाणीही न घेता रहाणे आणि धर्महानी टळल्यानंतर महिलांनी पुरणपोळ्यांचा नैवेद्य शनिदेवाला दाखवणे : शनिशिंगणापूर येथील ग्रामस्थांची शनिदेवावर पुष्कळ श्रद्धा आहे. हे सर्व प्रकार चालू असतांना कित्येक शनिभक्त ग्रामस्थांना जेवणही जात नव्हते. २६ जानेवारीला सकाळपासून ते ही मोहीम पूर्ण होईपर्यंत अनेकांनी पाणीही घेतले नव्हते. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतरच जेवण केले. गावातील अनेेक शनिभक्त महिलांनी २६ जानेवारीला ही धर्महानी टळल्यानंतर रात्री घरांमधून पुरणपोळ्यांचा नैवेद्य करून शनिदेवाला दाखवला.

कित्येक ग्रामस्थ महिलांनी बोलून दाखवले, आमच्या शनिदेवाची शक्ती किती आहे की, जी नास्तिक मंडळी इतके दिवस देवच नाही, असे म्हणायची. आता तीच मंडळी शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून तेल वाहण्याचा आग्रह करत आहेत. आमच्या शनिदेवाची ताकद त्या तृप्ती देसाईंना या आंदोलनातून नक्की लक्षात आली असेल. यावरून प.पू. गुरुदेव ग्रामीण भागात जाऊन हिंदूंचे संघटन करा, हे का सांगतात, ते शिकायला मिळाले.

१५. प्रत्यक्ष मोहिमेच्या वेळची स्थिती

शनिशिंगणापूर येथे प्रत्यक्षात २५ जानेवारीला सकाळपासूनच एका छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. संपूर्ण राज्यभरातूनच पोलिसांची आणि लष्करातील काही सैनिकांची नेमणूक करण्यात आली होती. शनिदेवाच्या चौथर्‍याभोवती तात्पुरत्या स्वरूपाचे लोखंडी संरक्षककडे करण्यात आले होते. संपूर्ण देशभरातून आलेल्या वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलक, ग्रामस्थ आंदोलक, राज्यभरातून आलेल्या विविध संघटनांची उपस्थिती, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी आणि संपूर्ण देशभरातून शनिदर्शनासाठी आलेले शनिभक्त यांमुळे दिवसभर तेथे अतिशय तणावपूर्ण वातावरण होते. दर्शनासाठी आलेल्या प्रत्येकाला ओळखपत्र पाहूनच दर्शनाला सोडण्यात येत होते. कुणीही चौथर्‍यावर बळजोरीने चढू नये, यासाठी पोलिसांकडून साध्या वेशातील महिला पोलीसही तैनात करण्यात आल्या होत्या. मंदिरातील ही स्थिती, मंदिराबाहेर एका बाजूला हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन आणि दुसर्‍या बाजूला स्थानिक ग्रामस्थांचे आक्रमक आंदोलन यांमुळे सकाळपासूनच पोलिसांवर दबाव वाढत होता. या वेळीच भूमाता ब्रिगेडच्या ५०० हून अधिक कार्यकर्त्या १० बसमधून शनिशिंगणापूरच्या दिशेने निघाल्या, अशा आशयाच्या वार्ता विविध वृत्तवाहिन्यांवरून झळकत होत्या. त्या वेळी स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी यांनी एकत्रित येऊन एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले. त्याच्या वार्ता लगेचच संपूर्ण राज्यभर प्रसारित झाल्या. त्याचाही दबाव निर्माण झाल्याने पोलिसांना भूमाता ब्रिगेडच्या आंदोलकांना नगर जिल्ह्यात प्रवेश करतांनाच रोखावे लागले. त्यामुळे विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळाले आणि धर्माचा विजय झाला.

१६. विरोधकांची रणनीती आणि त्या विरोधातील कृती

भूमाता ब्रिगेड आणि त्यांच्याशी संबंधित संघटना पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यामुळे पोलीस प्रशासन त्यांना झुकते माप देते कि काय, असे वाटत होते; परंतु ईश्‍वराच्या कृपेने प्रतीआंदोलन उभे राहिल्याने विरोधकांच्या सर्व गोष्टी मोडीत निघाल्या. कायदा आणि सुव्यवस्था राखत पोलिसांना या धर्मद्रोह्यांना कह्यात घ्यावे लागले.

१७. पोलीस आणि प्रशासक यांचे आडमुठे धोरण

हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ महिला अशांवर दबाव आणण्यासाठी अन् हिंदुत्ववाद्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी दबावतंत्राचा वापरले. चौथर्‍यावर हिंदुत्ववादी संघटनांना कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करत अनुमती नाकारली. ३५ हून अधिक हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ महिला यांना १४९ च्या नोटीसा देऊन आंदोलनात सहभागी न होण्याचा दबाव आणला. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्यांचा सल्ला घेऊन या १४९ च्या नोटिशीला प्रखर उत्तर देण्यात आले की, शनिशिंगणापूर येथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास ग्रामस्थ अन् हिंदुत्ववादी उत्तरदायी रहाणार नसून संभाव्य घटनांना पोलीस आणि प्रशासन उत्तरदायी राहील. पोलिसांनी सतर्कतेने परिस्थिती हाताळण्यास प्रारंभ केला; परंतु कायदेविषयक माहिती, ईश्‍वरी अधिष्ठान नसते, तर परिस्थिती वेगळी झाली असती.

१८. समितीच्या आंदोलनामुळे महिलांमध्ये निर्माण झाला आत्मविश्‍वास

आरंभी आम्ही शनिशिंगणापूर येथे गेलो होतो, तेव्हा तेथील महिला फार बोलत नव्हत्या; पण त्यांना शास्त्र सांगितल्यावर धर्माची बाजू कशी मांडायला हवी, हे सांगितले. गावातील महिलांनी अनुभव नसतांना त्यांचे म्हणणे, तसेच धर्माची बाजू ठामपणे प्रसिद्धीमाध्यमांसमोर मांडली.

१९. हे आंदोलन म्हणजे प.पू. गुरुदेवांच्या हिंदूंचे संघटन होण्याच्या संकल्पाचे उदाहरण होते, याची आलेली अनुभूती !

२६ जानेवारीला आंदोलन होते आणि त्याच्या आदल्या दिवशी रामनाथी आश्रमातून आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व साधकांसाठी प्रसाद आला होता. प्रसाद हाती पडताक्षणी देवाचे आपल्याकडे किती लक्ष आहे, हे पाहून सर्वांना पुष्कळ कृतज्ञता वाटत होती आणि एक प्रकारे दुसर्‍या दिवशीच्या आंदोलनासाठी मिळालेला तो देवाचा आशीर्वादच होता.

हे आंदोलन म्हणजे प.पू. गुरुदेवांच्या हिंदूंचे संघटन होण्याच्या संकल्पाचे उदाहरण होते, असे प्रत्येक क्षणी वाटत होते; कारण तेथील परिस्थिती पहाता एवढ्या अल्प कालावधीत हा धर्माचा विजय होणे, हे सर्व दृष्टीने विचार करता अवघड होते.

२०. …आणि धर्माचा विजय झाला !

सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥ – दासबोध, दशक २०, समास ४, ओवी २६

या समर्थ रामदासस्वामींच्या उक्तीनुसार हिंदूंच्या धार्मिक प्रथा-परंपरा रक्षण अभियानांतर्गत चलो शनिशिंगणापूर या अभियानाला धर्मनिष्ठ हिंदुत्ववादी श्रद्धाळू शनिभक्तांसमोर पुरोगामी आणि नास्तिक, धर्मद्रोही या सर्वांचा पराजय झाला आणि धर्माचाच विजय झाला.

हिंदु बांधवांना आणि श्रद्धाळूंना या लेखाच्या माध्यमातून आवाहन आहे की, शनिशिंगणापूर हा आरंभ आहे; परंतु भविष्यात हिंदु धर्म, संत, राष्ट्रपुरुष, हिंदूंच्या प्रथा-परंपरा यांच्याकडे कुणीही वाकड्या दृष्टीने पहाणार नाही, असा धाक, अशी ताकद आणि असे संघटन आपण सर्व निर्माण करूया अन् या महाराष्ट्रातील सर्व पुरोगाम्यांना दाखवून देऊया की, महाराष्ट्र हा पुरोगाम्यांचा नसून हिंदूंचा आहे, हिंदुंच्या साधूसंतांचा आहे आणि हिंदूंच्या प्रथा-परंपरा सांभाळणार्‍यांचा आहे.

२१. भावपूर्ण निरोपसमारंभ

पोलिसांनी धर्मद्रोह्यांना सुपे येथेच थांबवले. ही वार्ता कळताच सर्वांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. अनेकांच्या तोंडवळ्यावर आनंद, उत्साह आणि कृतज्ञतेचा भाव होता. मोहीम संपल्यानंतर विविध जिल्ह्यांतून आलेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनस्थळी सरपंच श्री. बाळसाहेब बानकर, गावातील ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटनांचे तरुण कार्यकर्ते अन् महिला कार्यकर्त्या उपस्थित राहिले. समारंभ चालू झाल्यानंतर या कार्यक्रमात अनेकांना भावना शब्दांत व्यक्त करता आल्या नाहीत. भावाश्रू आवरता आले नाही. सरपंचांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना सांगितले, मागील दीड मासापासून समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक गावात येऊन जे परिश्रम घेत आहेत, यासाठी आमच्याकडे शब्दच नाहीत. आम्हाला याविषयी जागृत केले आणि धर्मरक्षणासाठी उभे केले, याचे सर्व श्रेय समितीला जाते. धर्मरक्षणासाठी आम्ही कधीही उभे राहू. या आंदोलनातून भूमाता ब्रिगेड आणि अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या पाठीमागे आमच्या शनिदेवाने साडेसाती लावली आहे, हे निश्‍चित झाले. यातून तरी त्यांनी शहाणे व्हावे आणि थांबावे.

२२. कृतज्ञता

भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने कोणतीही पात्रता नसतांना धर्मरक्षणाच्या या मोहिमेसाठी ईश्‍वराने आम्हाला माध्यम बनवले आणि या सर्व गोष्टी करून घेतल्या. या अभियानात क्षणोक्षणी येणार्‍या अडथळ्यांच्या वेळी साक्षात् भगवान श्रीकृष्ण आपल्यासमवेत आहे, याची वेळोवेळी अनुभूती दिली. या तीव्र आपत्काळात आम्हा सर्व साधकांकडून ही समष्टी सेवा आणि साधना करवून घेतली, त्यासाठी त्याच्या आणि श्री शनैश्‍वराच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.