आध्यात्मिक उन्नतीसाठी गोसेवेतून साधना, हा दृष्टीकोन ठेवा !

व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग, या सिद्धांतानुसार साधना केल्यास शीघ्रगतीने आध्यत्मिक प्रगती होते. आज अनेक जण गोपालन, गोसंवर्धन, गोरक्षण, गोकथा प्रसार, पंचगव्यांपासून बनवलेली औषधे आणि उत्पादने यांचा प्रसार आदी गोमातेसंबंधी कार्य करत आहेत. विश्‍वातील ३३ कोटी देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या गोमातेवरील भक्तीमुळे हे कार्य केले जात असेल किंवा गोसेवेतून साधना व्हावी, हा दृष्टीकोन असेल, तर गोसेवा करणार्‍यांची आध्यात्मिक उन्नती होते. गव्यसिद्धाचार्य निरंजन वर्मागुरुजी यांनी पंचगव्यांपासून औषधनिर्मिती करण्यामागे गोसेवेतून साधना हा दृष्टीकोन बाळगल्याने त्यांनी आध्यात्मिक उन्नती साध्य केली आहे. गोसेवकांनीही गोसेवेतून साधना होईल, असा प्रयत्न केल्यास त्यांना गोमातेचा खराखुरा आध्यात्मिक लाभ होईल. गोमातेची सेवा करणार्‍यांनी साधना म्हणून गोपालक भगवान श्रीकृष्णाचा ॐ नमो भगवते वासुदेवाय हा नामजप केल्यास त्यांची अधिक साधना होईल आणि त्यांच्या इच्छित कार्यास यशही लाभेल !

भारतीय गोमाता ही पृथ्वीवरील सात्त्विकतेचा ठेवा आहे. तिच्यापासून प्राप्त होणारे दूध, गोमूत्र आणि गोमय (शेण) यांत चैतन्य असल्याने त्यांपासून बनवलेल्या औषधांचा गुण येतो, तर उत्पादनांतून सात्त्विकतेचा लाभ होतो. अशा आध्यात्मिक लाभ देणार्‍या गायीकडे केवळ धन मिळवण्याचे साधन म्हणून पहाणे, हा स्वार्थी दृष्टीकोन आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी धर्माचे आचरण केल्यास उर्वरित ३ पुरुषार्थ साध्य होतात, हे धर्मशास्त्रीय वचन आहे. गोदेवतेची उपासना धर्मानुसार केली, तर दुसरा पुरुषार्थ म्हणजे अर्थ हाही सहजतेने प्राप्त होईल.

पंचगव्य औषधींकडेही केवळ अर्थार्जनाचे साधन म्हणून नव्हे, तर भावी काळातील मानवजातीच्या रक्षणाचे साधन म्हणून पहायला हवे. येत्या काही वर्षांत तिसर्‍या महायुद्धाची आणि अराजकसदृश स्थिती निर्माण होईल तेव्हा समाजाला औषधे मिळणे दुर्लभ होईल. अशा काळात घरोघरी बनवता येणारी पंचगव्य औषधे संजीवनी म्हणून कार्य करतील.

भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्याविना संपूर्ण गोरक्षणाचे किंवा गोसंवर्धनाचे कार्य अशक्य आहे. त्यामुळे गोसेवकांनी प्रतिदिन काही काळ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातही सहभागी झाल्यास त्यांच्यावर गोमातेची विशेष कृपा होईल.

Leave a Comment