‘नॅशनल सेंटर ऑफ रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट’ने नुकत्याच घोषित केलेल्या आकडेवारीत वर्ष २०१९ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ३ सहस्र ९२७, तर संपूर्ण देशात १० सहस्र २८१ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. हे प्रमाण चिंताजनक असून आत्महत्या रोखण्याच्या दिशेने विचार व्हायला हवा. देशातील शेतकरी आज विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. या समस्या केवळ निसर्गामुळे येतात, असे नाही, तर मानवनिर्मित समस्यांनाही शेतकर्यांना तोंड द्यावे लागते. बोगस बियाणांमुळे अनेक शेतकर्यांना पेरणी केलेल्या शेतावर नांगर फिरवावा लागला. बोगस खते, बियाणे पुरवणार्या स्वार्थांध प्रवृत्तींमुळे शेतीची अतोनात हानी होते. याविषयी चौकशी होऊन हानीभरपाई देण्याचे जरी घोषित होत असले, तरी प्रत्यक्ष कितपत साहाय्य त्यांच्यापर्यंत पोचते ? हा प्रश्न आहेच.
शेतकर्यांच्या हितासाठी अनेक योजना असतात; मात्र भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे तळागाळातील शेतकर्यांपर्यंत योजना, हानीभरपाई यांचे पैसे प्रत्येक वेळेस पोचतातच, असे नाही. शेतीमाल पिकला, तरी वितरणाच्या साखळीतील त्रुटी दलाल आणि व्यापारी यांच्या पथ्यावर पडतात; मात्र शेतकरी पिकाचा योग्य भाव मिळण्यापासून अनेकदा वंचित रहातात. राजकीय दिरंगाई, निर्यातीसंदर्भातील धोरणे निश्चित करण्यातील वेळकाढूपणा यांचाही हमीभावाला फटका बसतो. विदर्भात यंदा आलेल्या महापुरामुळे पीक हातचे गेले. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये चालू असलेल्या पावसानेही राज्यात पिकांची हानी झाली. एकूणच शेतकर्यांपुढील समस्यांचा पाढा न संपणारा आहे. अधिकार्यांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे शेतकर्यांपुढे समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी अधिकार्यांच्या वृत्तीत पालट व्हायला हवा. कर्तव्यात कुचराई करणार्या अथवा भ्रष्टाचार करणार्या घटकांवर वेळीच आणि कठोर कारवाई व्हायला हवी. हीच प्रक्रिया बियाणे-खत पुरवठादार आणि आस्थापने यांच्या संदर्भात असायला हवी. वृत्तीमध्ये पालट होण्यासाठी नीतीमान समाजाची निर्मिती आवश्यक आहे. धर्मशिक्षणाने साधना होऊन व्यक्ती नीतीमान होते. प्रजा धर्माचरणी असेल, तर देशात योग्य त्या वेळेत पाऊस पडून निसर्गही शेतीला अनुकूल होईल. साधनेमुळे व्यक्तीचे प्रारब्ध सुसह्य होते. हे सर्व लाभ पहाता शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘साधना’ हाच एकमेव पर्याय असल्याचे लक्षात येते !
– कु. प्राजक्ता धोतमल, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात