-
कर्नाटकात अटक केलेल्या ३ आतंकवाद्यांकडून मिळाली माहिती
-
गुजरात, दक्षिण भारत आणि रत्नागिरी येथे बस्तान बसवण्याची आतंकवाद्यांची होती सिद्धता
रत्नागिरीत आतंकवादी येऊन रहातात आणि त्याची माहिती पोलीस अन् गुप्तचर यंत्रणांना मिळत नाही, हे लज्जास्पद ! मिरकरवाडा आणि कोकणनगर येथे आतंकवादी कुणाकडे राहून गेले, याचा शोध घेऊन आतंकवाद्यांना आश्रय देणार्यांवर पोलीस कठोर कारवाई करणार का ?
रत्नागिरी : ‘इस्लामिक स्टेट’चे ३ आतंकवादी शहरातील मिरकरवाडा आणि कोकणनगर येथे अनुमाने ४ ते ५ दिवस राहून गेल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. कर्नाटक राज्यात पकडलेल्या ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्यांनी ते रत्नागिरीतील कोकणनगर आणि मिरकरवाडा येथे जाऊन राहिल्याचे पोलिसी अन्वेषणात सांगितले आहे. कर्नाटकात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) ‘इस्लामिक स्टेट’च्या छावण्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत ही माहिती उघड झाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुप्तचर यंत्रणेचे काही अधिकारी शहरातील मिरकरवाडा आणि कोकणनगर येथे काही भागांत अन्वेषणासाठी येऊन गेल्याची चर्चा शहरात चालू होती. यानंतर आता हे प्रकरण उघड झाले आहे.
‘इस्लामिक स्टेट’ ही जिहादी आतंकवादी संघटना गुजरातमध्ये जांबुसान, दक्षिण भारतात केरळ आणि महाराष्ट्रात रत्नागिरी येथे बस्तान बसवण्याच्या सिद्धतेत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. काही हिंदु नेते, धार्मिक नेते, राजकीय नेते, पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि काही सेलिब्रिटी यांची हत्या करण्याची योजना आतंकवाद्यांनी आखली होती. या आतंकवाद्यांनी कर्नाटक राज्यातील गुंडलुपेट आणि शिवान समुद्र जंगलात प्रशिक्षण घेण्याची सिद्धता केली होती, अशी माहिती ‘एन्.आय.ए.’ला प्राप्त झाली आहे.
रत्नागिरीत पोलीस यंत्रणांना सतर्कतेची चेतावणी
जिल्ह्याच्या समुद्र किनार्यावर ‘इस्लामिक स्टेट’च्या हालचाली चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणेसमवेत गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाली आहे. याविषयी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी सांगितले की, जिल्ह्यात एकही ‘इस्लामिक स्टेट’चा सदस्य नाही; मात्र पोलीस दलातील सर्व यंत्रणांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात