जात मंदिरांमध्ये नाही, तर सरकारी चाकरी, शिष्यवृत्ती, विनामूल्य वस्तूंचे वाटप, शासकीय योजना आणि राज्यघटनेकडून प्राप्त जातीनिहाय आरक्षण यांमध्ये विचारली जाते, असे मत सनदी अधिकारी श्री. संजय दीक्षित यांनी व्यक्त केले. यापूर्वीही दीक्षित यांनी म्हटले होते की, ब्राह्मणाचा पुत्र ब्राह्मण आणि क्षुद्राचा पुत्र क्षुद्रच राहील, ही गोेष्ट मनुस्मृति नाही, तर भारतीय राज्यघटनेचे जात प्रमाणपत्र सांगते. सनातन धर्मामध्ये व्यास, वाल्मीकि, रविदास यांनाही ब्राह्मण आणि संत यांच्या श्रेणीतील स्थान देण्यात आले. सनातन धर्माने कर्माने महान बनण्याचा आणि होण्याचा सिद्धांत दिला.
ब्राह्मणांविषयी पसरवण्यात आलेला भ्रम दूर करणे आवश्यक !
श्री. दीक्षित यांनी म्हटले आहे की, ब्राह्मणांनी स्वत: जाती निर्माण केल्या नाहीत, तर त्या काळाच्या ओघात निर्माण झाल्या आहेत; परंंतु बाह्मणांनीच जाती बनवल्याचे मान्य केले, तरी त्यातून लाभ कुणाचा झाला ? पूर्वीच्या काळी तर उपजीविकेसाठी सरकारी चाकरी नव्हती. ब्राह्मणांनी संपूर्ण फर्निचर व्यवसाय सुतारांना दिला. टेक्सटाईलचे काम शिंप्यांना दिले. शस्त्र बनवण्याचे काम लोहारांना दिले. पानविक्रीचे काम बारीला दिले. सुपाचे काम धरिकारला दिले. बांगड्यांचा व्यवसाय कासारांना दिला. मांसाचा व्यवसाय खाटिकांना दिला. फुलांचा व्यवसाय माळ्यांना दिला. तेलाचा व्यवसाय तेलींना दिला. त्यामुळे सर्वांना रोजगार मिळाला. या सार्या सन्माननीय व्यवसायांना राज्यघटनेने मागास बनवले आहे. ब्राह्मणांनी स्वत:साठी भिक्षा मागणे आणि नि:शुल्क अध्यापनाचे कार्य ठेवले. शेवटी सर्व व्यवसायांमुळे भारत संपूर्ण विश्वात ‘सोनेकी चिडिया’ झाला.
ब्राह्मणांनी क्षत्रियांच्या वाट्याला बलीदान दिले आणि स्वत:च्या वाट्याला भिक्षाटन घेतले, तर त्यांनी जातीव्यवस्थेमध्ये अन्याय कसा केला ? हा विचार आणि चिंतन करण्यासारखा प्रश्न आहे. प्रबुद्धजनांनी याचा अभ्यास करावा आणि समाजातील इतर लोकांचेही प्रबोधन करावे. ज्यामुळे पसरवण्यात आलेला भ्रम आणि विषमता दूर होणे आवश्यक आहे.’’
श्री. संजय दीक्षित यांचा परिचय
श्री. संजय दीक्षित राजस्थान कॅडरचे आणि वर्ष १९८६ च्या बॅचचे आय.ए.एस्. अधिकारी आहेत. ते राजस्थान राज्य सरकारचे मुख्य सचिव या पदावर कार्यरत होते. त्यांनी राजस्थान क्रिकेट मंडळाचे अध्यक्षपदही भूषवले आहे. याखेरीज त्यांची सामाजिक माध्यमांमध्ये एक लेखक म्हणून ओळख आहे. ते ‘द प्रिंट’ आणि ‘स्वराज्यमग’ यांसाठी स्तंभलेखन करतात.
(संदर्भ : संकेतस्थळ)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात