संकटकाळातील निःस्वार्थता !

संपादकीय

भारतात सध्या कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्याने दळणवळण बंदीही उठवता आलेली नाही. सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने सर्वाधिक आर्थिक फटका बसला, तो देशातील कामगार वर्गाला, अर्थात परप्रांतियांना ! हातावर पोट असणार्‍यांना प्रतिदिन भुकेची भ्रांत भेडसावू लागली. पोटापाण्याच्या सोयीअभावी या गोरगरीब कामगारांच्या दृष्टीने सध्याचा काळ त्यांच्या समोर अगदी ‘आ’ वासूनच उभा होता. रहात्या ठिकाणी उपजीविकेचे साधनच उपलब्ध नसल्याने शेवटी त्यांचे गाव त्यांना खुणावू लागले. आपापल्या कुटुंबकबिल्यासह अनेकांनी गावची वाट धरली. कुणी अनेक किलोमीटर पायपीट करत गाव गाठले, तर काहींनी रेल्वे, बस किंवा अन्य वाहन यांच्या माध्यमातून गावापर्यंत पोचण्याची सोय केली. अशा प्रतिकूल स्थितीत अनेकांचे साहाय्याचे हात पुढे आले; पण या कामगारांसाठी खर्‍या अर्थाने साहाय्यदूत ठरले, ते अभिनेते सोनू सूद ! सूद यांनी अनेक गरीब कामगारांना त्यांच्या घरापर्यंत पोचवण्याचे दायित्व स्वीकारले आणि आजही हे दायित्व ते समर्थपणे पार पाडत आहेत. परप्रांतीय कामगारांना घरी सोडण्यासाठी सोनू सूद यांनी महाराष्ट्र शासनाकडून विशेष अनुमती घेऊन काही गाड्यांची सोय केली. विशेष म्हणजे हे सर्व साहाय्य ते विनामूल्य करत आहेत. त्यांच्या माध्यमातून जणू आशेचा किरण दिसल्याने देशाच्या कानाकोपर्‍यांत अडकलेले कामगार त्यांच्याकडून साहाय्याची अपेक्षा करत आहेत. ‘शेवटचा कामगार स्वतःच्या घरी पोचेपर्यंत मी शांत बसणार नाही’, असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. सद्य:स्थितीत त्यांनी जपलेले समाजभान नक्कीच आदर्शवत आणि समाजऋण फेडणारे ठरेल, यात शंका नाही. सोनू सूद यांच्या साहाय्यामुळे भारावलेल्या काहींनी तर बिहारमध्ये त्यांचा पुतळा उभारणार असल्याचे सांगितले आहे; पण ‘माझ्या पुतळ्यावर पैसे व्यय करण्यापेक्षा त्यांचा वापर गरिबांच्या साहाय्यासाठी करा’, असे सूद यांनी ट्वीट करून म्हटले आहे. दळणवळण बंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत त्यांनी जवळपास ४५ सहस्र जणांच्या जेवणाचीही सोय केली आहे. यापूर्वी त्यांनी १ सहस्र ५०० पीपीई किट्सही उपलब्ध करून देण्यात साहाय्य केले होते, तसेच स्वतःचे हॉटेल कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी खुले करून दिले होते. त्यांच्या या साहाय्यता कार्यामुळे समाजातील सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. काही जणांना साहाय्य करता न आल्याने त्यांनी संबंधितांची क्षमाही मागितली आहे. त्यांची ही कृती नम्रपणा दर्शवणारी आहे. केवळ पैशांसाठी हपापलेल्यांच्या जगात मानवता शिल्लक आहे, हे सोनू सूद यांच्या उदाहरणातून प्रकर्षाने जाणवते. चित्रपटसृष्टीतील सर्वच अभिनेते आणि अभिनेत्री यांनी त्यांच्याकडून बोध घ्यायला हवा. अभिनेता सोनू सूद यांनी आतापर्यंत चित्रपटसृष्टीत खलनायकाच्या भूमिका पार पाडल्या होत्या; पण वास्तवात ते ‘खलनायक’ नसून खराखुरे अभिनेते (रिअल हिरो) आहे’, असे म्हटता येईल.

साहाय्याचा आध्यात्मिक पाया !

‘कामगारांना इतक्या मोठ्या प्रमाणात साहाय्य करण्याविषयीची प्रेरणा कशी मिळाली ?’, याविषयी एका मुलाखतीत सांगतांना सोनू सूद म्हणाले, ‘‘रस्त्यावरून आपल्या कुटुंबियांसमवेत जाणार्‍या कामगारांना पाहून मी अस्वस्थ झालो होतो. ‘त्यांना सहस्रो किलोमीटर पायी जावे लागत आहे’, हे समजल्यामुळे माझी रात्रीची झोप उडाली होती. त्यामुळे मी कामाला लागलो. कामगारांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी आमच्या नियोजनाप्रमाणे पहिला गट निघाला, तेव्हा आम्ही नारळ फोडून ‘सर्वांचा प्रवास सुखरूप होवो’, अशी देवाला प्रार्थना केली. त्या वेळी कामगारांच्या तोंडवळ्यावर हसू आणि डोळ्यांत पाणी होते. आता मला प्रतिदिन साहाय्यासाठी सहस्रो संदेश आणि ईमेल येत आहेत. मी आणि माझे सहकारी प्रतिदिन १८ घंटे काम करत आहोत. मला इतरांना साहाय्य करण्याची संधी मिळाली, ही दुर्मिळ गोष्ट आहे. ‘देवच माझ्याकडून हे काम करून घेत आहे’, असे मला वाटते. माझ्या आई-वडिलांनी मला जे शिकवले, तेच मी करत आहे.’’ कामगारांना घरी पाठवण्यापूर्वी केलेली प्रार्थना आणि देवच साहाय्य करवून घेत असल्याची त्याच्या मनातील जाणीव हेच ते करत असलेल्या साहाय्यामागील खरे गमक आहे. आध्यात्मिकतेचा पाया असेल, तरच इतक्या मोठ्या प्रमाणात निरपेक्ष भावनेने समाजसाहाय्य करता येते, याची प्रचीती सोनू सूद यांच्या उदाहरणातून येते. पुष्कळ साहाय्य करूनही सूद यांनी ना कुठला ‘सेल्फी’ काढला, ना स्वतःच्या साहाय्यता कार्याचा उदोउदो केला !

जरासे साहाय्य करायचे आणि स्वतःचे नाव लोकांपर्यंत जाण्यासाठी आटापिटा करायचा, अशांना सोनू सूद यांचे उदाहरण म्हणजे चपराकच आहे. सर्वत्र स्वार्थांधता बोकाळत असल्याने निःस्वार्थीपणाचा पाया डगमगत आहे. सर्वांनी आध्यात्मिकतेची कास धरून समाजकर्तव्य पार पाडल्यास ते खर्‍या अर्थाने समाज साहाय्य आणि राष्ट्ररक्षण ठरेल !

खरे राष्ट्रप्रेमी कोण ?

मध्यंतरी देहलीतील जे.एन्.यू.मध्ये झालेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील आंदोलनाला समर्थन देत अभिनेत्री दीपिका पदुकोण, स्वरा भास्कर, फरहान अख्तर यांनी ‘आम्ही देशाला वाचवत आहोत’, असा आव आणला होता. तेव्हाच्या स्थितीपेक्षा आता देश अधिकच मोठ्या संकटात सापडला आहे. असे असतांना ही मंडळी आता कुठल्या बिळात लपून बसली आहेत ? एरव्ही ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते’, ‘राज्यघटनेचा अवमान झाला’, अशी आरोळी ठोकणारे डावे (अ)विचारवंत, पुरो(अधो)गामी आणि पुरस्कारवापसीवाले आता मात्र साहाय्यासाठी समोर आलेले नाहीत. राष्ट्रप्रेमींनी अशांना वेळीच त्यांची जागा दाखवून द्यायला हवी. संकटकाळातच निःस्वार्थीपणा, इतरांविषयीचा कळवळा, त्यागी वृत्ती यांच्या कसोटीवरच कांगावखोर कोण आणि देशाला वाचवणारे खरे समाजप्रेमी अन् राष्ट्रप्रेमी कोण ? हे ओळखता येते. आज देशाला राष्ट्रप्रेमी लोकांचीच आवश्यकता आहे. सोनू सूद यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून सर्वांनी संकटकाळाचा सामना करण्यासाठी सिद्ध व्हायला हवे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

राष्ट्रीय

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​