नियम सर्वांना सारखे असतात आणि त्यातही पंतप्रधान राहिलेल्या व्यक्तीने तिचे पालन करणे आवश्यक आहे. असे असतांना अशा व्यक्तीकडूनच जर त्याचे उल्लंघन होत असेल, तर अशांना कायद्यानुसार सामान्य व्यक्तीला देण्यात येणार्या शिक्षेपेक्षा अधिक कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे !
बेंगळुरू (कर्नाटक) – देशात दळणवळण बंदी असतांना माजी पंतप्रधान आणि जनता दल (निधर्मी)चे अध्यक्ष एच्.डी. देवेगौडा यांचे नातू तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल याचा विवाह काँग्रेसचे माजी मंत्री एम्. कृष्णप्पा यांची भाची रेवती हिच्याशी १७ एप्रिलला बेंगळुरूमध्ये थाटामाटात पार पडला. ए.एन्.आय. या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या छायाचित्रांत या विवाह सोहळ्यात सामाजिक अंतर आणि दळणवळण बंदी यांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले आहे.
या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये विवाहाच्या मंडपात लोकांची गर्दी दिसत आहे. ‘विवाहाला केवळ १० ते १५ लोक उपस्थित असतील’, अशी माहिती कुमारस्वामी यांनी प्रारंभी दिली होती; मात्र छायाचित्रांमध्ये अनेक जण उपस्थित असल्याचे दिसून आले. पोलिसांनी अद्याप कुणावरही कारवाई केलेली नाही. (अशा प्रसंगांत सामान्य लोकांवर लाठीमार करणारे पोलीस राजकारण्यांवर कारवाई करण्याचे टाळतात, हे पुन्हा स्पष्ट होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)