१४ एप्रिल या दिवशी संध्याकाळी वांद्रे स्थानकात २ सहस्रांहून अधिक संख्येने हातावर पोट असणारे परप्रांतीय कामगार एकत्र जमल्याने दळणवळण बंदी काही काळापुरती धाब्यावर बसल्याचे चित्र पहायला मिळाले. दळणवळण बंदीच्या काळात वांद्रे येथे मशिदीच्या बाहेर आणि तेथील अरुंद रस्त्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात कामगारांची गर्दी अचानक जमणे, हे गंभीर होते. या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, याचे गांभीर्य ही गर्दी करणार्यांना आणि ती जमवण्यास प्रवृत्त करणार्या त्यांच्या तथाकथित नेत्यांना का नव्हते ? स्वतःला आणि मोठ्या प्रमाणात समाजाला यामुळे धोका निर्माण होऊन तो धोका वाढू शकतो, हे कामगारांचे प्रतिनिधित्व करणार्यांना लक्षात आले नसेल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. दिवसरात्र एक करून कोरोनाच्या संकटाशी सामना करणारी प्रशासकीय यंत्रणा आणि शासन यांना आव्हान देण्यासाठी हे कामगारांचे प्रतिनिधी का प्रवृत्त झाले ? यामागे काय राजकारण आहे आणि कुणाची फूस आहे, याच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. ‘स्वतःच्या राज्यात गेल्यावर तरी या कामगारांना तिथे सहजतेने थेट प्रवेश मिळणार होता का ?’, याचा विचार करायलाही त्यांना जमले नाही. ‘आपण आपल्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला आणि आपल्या गावालाही धोक्यात आणणार आहोत’, याचीही जाणीव त्यांना नव्हती.
पोलिसांनी तत्परतेने चांगल्या प्रकारे संवाद साधून ही गर्दी नियंत्रणात आणली. काही प्रमाणात त्यांना रेशनही दिले; परंतु काही जण म्हणाले ‘त्यांना रेशन नको, घरी जायचे आहे.’ शासनाने आज ६ लाख लोकांची छावण्यांत व्यवस्था केली आहे; परंतु एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के कामगारवर्ग मुंबईत आहे. यापूर्वी रेल्वेने १४ एप्रिलनंतरचे आरक्षण चालू केल्यानेही लोकांना गाड्या चालू होण्याची आशा होती. सद्य:स्थितीत रेल्वेगाड्या चालू करण्याचा धोका शासन घेऊ शकत नाही; परंतु रेल्वेगाड्या चालू होत असल्याची अफवा पसरली होती. त्याला कामगार भुलले का ? वांद्रे येथील गर्दीच्या प्रकरणी उत्तर भारतीय महापंचायतीचे नेते आणि कामगारांचे स्वयंघोषित नेतृत्व करणारे विनोद दुबे यांना प्रशासनाने अटक करून न्यायालयात उपस्थित केले आहे. त्यांनी कामगारांना चिथावणी दिल्याने कामगार एकत्र झाल्याचा आरोप आहे. दुबे यांनी फेसबूकवरून ‘गाड्या चालू न झाल्यास स्वतः कामगारांना घेऊन उत्तरप्रदेश आणि बंगाल येथेे चालत जाईन’ अशी चेतावणी देणे हे शासनाने गांभीर्याने घेतले असेलच; परंतु देश संकटकाळाला एकजुटीने तोंड देत असतांना अशा प्रकारे स्वतःचे वेगळे प्रस्थ निर्माण करून शासन आणि यंत्रणा यांना अधिक संकटात टाकणार्या दुबे यांच्यासारखी समाजघातकी मानसिकता निर्माण होण्यामागील षड्यंत्रही केंद्रशासनाने हाणून पाडले पाहिजे. ही सर्व सूत्रे पहाता दुबे यांची कृती जनताद्रोही आहे. आपत्काळातील हे वर्तन देशाच्या हिताला धरून नाही, हेच खरे !