आपत्काळातील दायित्वशून्यता !

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी प्रत्येक देश मोठ्या प्रमाणावर झुंजत आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार संपूर्ण देशात दळणवळण बंदी लागू करण्यात आली; परंतु अशाही परिस्थितीत समाजातील काही घटकांचा बेशिस्तपणा, दायित्वशून्यता आणि स्वार्थीपणा दिसून येतो. काही व्यापारी या परिस्थितीचा अपलाभ उठवत आहेत. अनेक शहरांत जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री केली जात आहे. प्रशासनाने याची नोंद घेण्यासाठी निवेदनेही दिली जात आहेत. तोंडाला लावायचे ‘मास्क’, हात धुण्याचे ‘सॅनिटायझर’ यांचा कृत्रिम तुटवडा भासवला जात आहे. ‘घरात बसणे’ ही जणू ‘शिक्षाच आहे’, अशी काहींची मानसिकता झाली आहे. घरात राहून लोक मनोरुग्ण होत असल्याचे संदेश सामाजिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित केले जात आहेत. हे अल्प कि काय अभिनेते ऋषी कपूर यांनी ‘संतापात नैराश्याची भर पडू नये, यासाठी मद्यविक्री चालू ठेवा !’, असे ट्वीट केले आहे. ‘ऋषी कपूर यांच्यासारख्या काही श्रीमंत वलयांकित व्यक्तींना आपत्काळाचे भान नाही’, असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करणार्‍या अनेकांवर गुन्हे नोंद होत आहेत. गेल्या आठवड्यात सायंकाळी दहिसर (मुंबई) येथील गणेशनगर झोपडपट्टीच्या ठिकाणी चार-पाच लोक बाहेर उभे होते. आकाश मिस्त्री या तरुणाने त्याच्या अल्पवयीन मित्रासह ‘देशात संचारबंदी आहे. तुम्ही एकत्र इथे बसून गुन्हा केला आहे’, असे सांगून त्यांच्याजवळ पैशांची मागणी केली. ‘सगळ्यांना पोलीस ठाण्यात नेऊ’, अशी धमकीही दिली. चौकशीअंती ते बनावट पोलीस असल्याचे सिद्ध झाले. कनिका कपूर ही गायिका अमेरिकेहून १५ मार्च या दिवशी लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे आली. प्रशासनाचा १४ दिवस घरात बंदिस्त रहाण्याचा नियम न पाळता लक्ष्मणपुरीमध्ये ४०० ते ५०० जणांची उपस्थिती असलेल्या मोठ्या मेजवानीत तिने अनेकांशी हस्तांदोलन केले. उपरोक्त घटनांवरून हे सिद्ध होते की, अजूनही समाजातील काही घटकांना या आजाराविषयीचे गांभीर्य नाही. ज्या समाजात आपण रहातो, त्या समाजाप्रती स्वतःचे काही कर्तव्य असते. आपण समाजाचे काही देणे लागतो. एखादी व्यक्ती काही देऊ शकत नसेल, तर किमान ‘आपल्यामुळे समाजाची हानी होणार नाही’, याची जाणीव तिला असायलाच हवी. त्यामुळे यापुढे शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत सहकार्य करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ‘लोकांनी घरातच रहावे’, अशी हात जोडून कळकळीची विनंती स्वतः पंतप्रधान करत आहेत. आज अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संघटना पुढे येऊन लोकांना साहाय्य करत आहेत, ही उल्लेखनीय गोष्ट आहे. समाजाचा विचार करणे, राष्ट्रभावना जागृत असणे, प्रसंगी राष्ट्रासाठी स्वार्थ बाजूला ठेवून अगदी सर्वस्वाचा त्याग करण्याची सिद्धता ठेवायला हवी, तरच आपण या जागतिक आपत्तीतून बाहेर पडू !

– श्री. नीलेश पाटील, जळगाव

Related Tags

राष्ट्रीय

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​