हिंदु जनजागृती समितीची गुजरात येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा

नवसारी (गुजरात) : गांधीजींच्या शेळीला बांधलेली दोरी आम्ही जपून ठेवली; पण क्रांतीकारक भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशी दिलेल्या दोर्या कुठे आहेत? आज क्रांतीकारकांची परंपरा आणि आदर्श ठेवूनच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य केले पाहिजे, असे विचार येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत प्रमुख वक्ता अधिवक्ता राजेश जोलियाजी यांनी व्यक्त केले. १९ जानेवारीला येथील श्री रामजी मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. सभेचा आरंभ शंखनाद, वेदपठण आणि वीरवाडी श्री हनुमान मंदिराचे महंत श्री गोकुळदासजी महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ आणि ‘राष्ट्ररक्षण’ या विषयी प्रबोधन केले. सनातन संस्थेच्या सौ. शीला दातार यांनी साधनेचे महत्त्व सांगितले आणि धर्माचरण करून ईश्वराचे पाठबळ मिळवून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील होण्याचे आवाहन केले. सभेचे सूत्रसंचालन सौ. उज्ज्वला पंचाल यांनी केले. सभेला नवसारी आणि परिसरातील हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी अन् मान्यवर उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. सभेला सर्व धर्मप्रेमी शेवटपर्यंत उपस्थित राहिले होते आणि ते उत्साहाने घोषणा देत होते.
२. सभेनिमित्त सेवेत असणार्या कार्यकर्त्यांसाठी धर्मप्रेमींनी अल्पाहार आणि महाप्रसाद यांची सोय केली होती, तसेच सभेसाठी विनामूल्य सभागृह उपलब्ध करून दिले.