हिंदु राष्ट्राविषयी मत मांडणे, हा हिंदूंचा घटनात्मक अधिकारच ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

वाराणसी येथे चालू असलेल्या ‘उत्तर आणि पूर्व भारत हिंदु राष्ट्र अधिवेशना’चा तृतीय दिवस

वाराणसी (उत्तरप्रदेश) : भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्येच भारतीय नागरिकांना ‘धर्म’ आणि ‘उपासना’ यांचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. कलम २५ मध्ये ‘धर्माचा प्रचार करणे’ आणि कलम १९ मध्ये ‘आपले मत मांडणे’, याचा अधिकार भारतीय नागरिकांना आहे. यांमुळे भारतात हिंदु समाजाने हिंदु राष्ट्राचे मत मांडले, तर ते पूर्णपणे घटनात्मकच आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी येथे केले. ते येथील आशापूर क्षेत्राच्या ‘स्मृती लॉन’मध्ये चालू असलेल्या ‘उत्तर आणि पूर्व भारत हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या तिसर्‍या दिवशी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेचे मूलभूत विचार’ या विषयावर बोलत होते.

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी ‘हिंदूंवरील अत्याचार, हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्र यांचे महत्त्व’ या विषयांवर आपले जाज्वल्य विचार मांडले. या प्रसंगी कोलकाता येथील ‘शास्त्र धर्मप्रचार सभा’चे अध्यक्ष आणि ‘द ट्रूथ’ या नियतकालिकाचे संपादक पू. (डॉ.) शिवनारायण सेन यांनी अधिवेशनानिमित्त पाठवलेल्या आशीर्वचनाचे वाचनही करण्यात आले.

श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले, ‘‘प्रभु श्रीरामाने आपल्याला ‘मातृभूमी’चे महत्त्व लक्षात आणून दिले. लंकेवर विजय मिळवल्यानंतर जेव्हा लक्ष्मणाने श्रीरामाला सांगितले, ‘‘आपण सोन्याची लंका जिंकली आहे, तेव्हा अयोध्येला पुन्हा जाण्याची काय आवश्यकता ?’’ त्या वेळी श्रीरामाने उत्तर दिले की, सोन्याच्या लंकेला महत्त्व नसून माझी मातृभूमी मला अधिक प्रिय आहे. या दृष्टीने पाहिल्यास ‘हिंदु राष्ट्रा’चा विचार हा कोणताही राजकीय पक्ष किंवा कोणतीही संघटना यांचा विचार नाही. ती एक प्राचीन, उदात्त आणि आदर्श शासनप्रणाली आहे. दिशांपासून बनतो तो देश ! राष्ट्र हे आमची भावना, आमचे विचार, आमचे पूर्वज, आमची संस्कृती यांनी बनते. ‘इंडिया’ हा एक देश होऊ शकतो; परंतु हिंदु राष्ट्र ‘भारत’च असणार आहे.

देशाचे नागरिकत्व विकत घेता येऊ शकते; परंतु राष्ट्रनिष्ठेविषयी तसे नाही. ती आतून यायला हवी. राष्ट्रासाठी आपल्याला एकट्याने नाही, तर इतरांनाही प्रोत्साहित करून काहीतरी करायला हवे. संपूर्ण विश्‍वामध्ये असा एकही देश नाही, जेथील प्रणाली अल्पसंख्याकांनुसार चालते. ही स्थिती आपल्याला पालटावी लागेल. ‘एक भारत एक कायदा’, हा नियम लक्षात घेऊन भारतामध्ये राहायचे असेल, तर भारताचा कायदा मानायला हवा. ’’

नेपाळमध्ये हिंदुत्वाला वाचवणे आवश्यक ! – श्री. अजय सिंह, वर्ल्ड हिंदु फेडरेशन

‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील हिंदूसंघटनाची आवश्यकता आणि आव्हाने, तसेच ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’ने केलेले हिंदूसंघटनाचे कार्य’, या विषयांवर बोलतांना ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजय सिंह म्हणाले, ‘‘नेपाळमध्ये माओवादी आणि ख्रिस्ती हे हिंदूंवर अत्याचार करत आहेत. तेथे हिंदूंची ९२ टक्के असलेली लोकसंख्या आज घटून ८० टक्क्यांवर आली आहे. याचा अभ्यास केला असता लक्षात येते की, नेपाळमधील हिंदूंचे मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केले जात आहे. यापासून जर आपल्याला वाचायचे असेल, तर हिंदुत्वाला वाचवले पाहिजे.’’

आपल्या परिचयातील उद्योजकांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात जोडा ! – पू. प्रदीप खेमका, उद्योगपती परिषद

‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी उद्योगपती परिषदेच्या माध्यमातून उद्योजकांचे संघटन’ याविषयी मार्गदर्शन करतांना उद्योगपती परिषदेचे पू. प्रदीप खेमका म्हणाले, ‘‘संघटनेचे कार्य एक-दोन लोक करू शकत नाहीत, त्यामध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक असतो. अधिवक्त्यांचे संघटन करतांना अधिवक्त्यांनी ज्याप्रमाणे स्वतःचे योगदान देऊन विविध अधिवक्त्यांना या कार्यात जोडले, त्याचप्रकारे आता उद्योजकांच्या संघटनाच्या कार्यात आपल्याला सहभागी व्हावे लागणार आहे. आपल्या परिचयातील हिंदुत्वनिष्ठ उद्योजकांना या कार्यात जोडा अन् त्या मार्गान्वये त्यांचे संघटन करा. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडे उद्योजकांच्या संघटनासाठी आवश्यक प्रसारसाहित्य उपलब्ध आहे. या कार्यास लाभलेला तुमचा अमूल्य सहभाग हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या अनुषंगाने प्रेरणादायी ठरेल.’’

Related Tags

हिंदु अधिवेशनहिंदु जनजागृती समितीहिंदु संघटना आणि पक्ष

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​