आतातरी बांगलादेशी घुसखोरांना देशातून बाहेर काढण्यासाठी जलदगतीने कठोर प्रयत्न व्हायलाच हवेत !
नवी देहली : ‘जमात उल मुजाहिदीन बांगलादेश’ही (जे.एम्.बी.) बांगलादेशी आतंकवादी संघटना बांगलादेशी घुसखोरांच्या माध्यमातून देशात जलदगतीने पसरत आहे. आसाम, झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ येथे ही संघटना सक्रीय आहे. तिच्या १२५ संशयित आतंकवाद्यांची सूची राज्य सरकारांना सोपवण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे (एन्.आय.ए.चे) महासंचालक वाय.सी. मोदी यांनी दिली. ते आतंकवादविरोधी पथकांच्या प्रमुखांच्या बैठकीत बोलत होते.
१. वाय.सी. मोदी पुढे म्हणाले की, गेल्या १० वर्षांत आमच्या यंत्रणेने इस्लामिक स्टेट, जिहादी कारवाया, आतंकवाद्यांचा अर्थपुरवठा आदी विषयांचे अन्वेषण केले. जितक्या खटल्यांचे अन्वेषण करण्यात आले, त्यांतील ९० टक्के खटल्यांमध्ये संबंधितांना शिक्षा झाली आहे.
२. एन्.आय.ए.चे महानिरीक्षक आलोक मित्तल म्हणाले की, वर्ष २०१४ ते २०१८ या कालावधीत जे.एम्.बी.ने बेंगळुरूमध्ये २० ते २२ ठिकाणे बनवली होती. यातून दक्षिण भारतात पाय पसरण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संघटनेने कर्नाटक सीमेवरील कृष्णागिरी येथे राकेट लाँचर्सचीही चाचणी केली होती. म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांवरील आक्रमणाचा सूड घेण्यासाठी ही संघटना बौद्ध मंदिरांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे.
इस्लामिक स्टेटचे १२७ आतंकवादी आतापर्यंत अटकेत !
महानिरीक्षक मित्तल यांनी माहिती देतांना सांगितले की, इस्लामिक स्टेटशी संबंधित १२७ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. यात सर्वाधिक म्हणजे ३३ जणांना तमिळनाडू, १९ उत्तरप्रदेश, १७ केरळ आणि १४ जणांना तेलंगणमधून अटक करण्यात आली आहे. यांतील बहुतेक जण जिहादी आतंकवादाला प्रोत्साहन देणारा डॉ. झाकीर नाईक आणि अन्य मुसलमान धर्मगुरु यांची भाषणे ऐकत होते. त्यातून प्रेरित होऊन ते आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात