मोदीजी आणि शहाजी, तुमच्या हातात देशाचे सुरक्षित भविष्य आहे; म्हणून तुम्ही स्वत:ला जपायला हवे !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना अनावृत्त पत्र

श्री. नरेंद्र मोदी

काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांच्या मृत्यूमागे विरोधकांच्या मारक शक्तीचा प्रयोग कारणीभूत !, असे विधान भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले होते. अलीकडेच भाजपच्या नेत्यांच्या मृत्यूच्या मालिकेत पुढचा क्रमांक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असेल, अशी दर्पोक्ती पाकिस्तानी वंशाचे ब्रिटीश खासदार लॉर्ड नझीर अहमद यांनी केली होती. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे माओवाद्यांच्या रडारवर आहेत, असे वृत्त होते. एकंदरीत सद्यःस्थिती पहाता भारताला अत्युच्च स्थानी नेण्यासाठी प्रयत्न करणार्‍या या राष्ट्रप्रेमी नेत्यांच्या जिवाला धोका असल्याचे दिसून येते. या संदर्भात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी लिहिलेले हे अनावृत्त पत्र येथे प्रसिद्ध करत आहोत.

श्री. अमित शहा

परिवारातील एका व्यक्तीशी आपण जिव्हाळ्याने आणि प्रेमाने हितगुज करतो, या भावाने हे पत्र लिहित आहे. कलम ३७० चे रहित होणे, ही एक ऐतिहासिक घटना आहे. भाजप शासनाने हे पाऊल उचलले आहे, त्याचा प्रत्येक भारतियाला अभिमान आहे. कलम ३७० आधी तिहेरी आणि तोंडी तलाक रहित करण्यात आले. असा तलाक देण्याला गुन्हा ठरवण्यात आला. तिकडे तिहेरी तलाकलाच तलाक देण्यात आला आणि आपल्या शासनाने त्यासाठी काढलेला ऑर्डीनन्स पुन्हा कायद्यात रूपांतरित केला. म्हणजेच एका सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून हे घडले. दुसरीकडे आसामसारख्या राज्यांमध्ये नागरिकत्वाच्या सूत्रावरून कारवाई चालू झाली, जी कदाचित् आपण अन्य राज्यांमध्येही चालू करणार असाल, त्याचेही स्वागत आहे.

दुसरीकडे विरोधक बेसावध असतांना अचानक संविधानाचे कलम ३७० आणि ३५-अ हे संसदेत चर्चेला आणले गेले. विखुरलेल्या आणि नगण्य झालेल्या विरोधी पक्षांना त्याला विरोध करणे जमलेच नाही. काँग्रेसच्या एका खासदाराने तर स्वत:च्या अकलेचे ऐतिहासिक तारे तोडले. काश्मीरचा प्रश्‍न अंतर्गत आहे कि २ देशांमधील आहे, हे भाजपने पहिले स्पष्ट केले पाहिजे. जर अंतर्गत असेल, तर मग भारताने काश्मीरशी शिमला करार, लाहोर करार का केला ?, असे हास्यास्पद प्रश्‍न उपस्थित करून या खासदारांनी स्वत:ची पात्रता दाखवून दिली. भारत-पाकिस्तान समस्येचे अभ्यासक या प्रसंगावर खरेतर दात काढून हसले असतील.

तिहेरी तलाक आणि कलम ३७० यांनंतर आता राममंदिराचा विषय ऐरणीवर आला आहे. राममंदिराविषयी सर्वोच्च न्यायालय निकाल कोणताही देवो, पुन्हा एकदा देशांतर्गत आणि जगातही पाणी ढवळून निघणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काही लागला, तरी शेवटी मंदिर बांधले जाईलच, अशी मोर्चेबांधणी झालेली असूही शकते. तसे असेल, तर त्याचेही स्वागतच आहे. पुढच्या काळात समान नागरी कायदा येऊ घातलेला असेल. अजूनही काही अशी सूत्रे चर्चेच्या आणि निर्णयांच्या वाटेवर आहेत. यात अनपेक्षितपणे आपल्याला चीनविषयीची धोरणेही ठरवावी लागतील. आता दिसतांना शांती दिसत असली, तरी या सूत्रांवरून अंतर्गत घुसळण होत आहेच.

एका ऐतिहासिक कालखंडाच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत. हा इतिहास कसा लिहिला जाणार आहे, हे नियती ठरवेल. काळ प्रचंड धोक्याचा आहे, हे मात्र दिसते आहे. आपण सर्वांनी सजग रहायला पाहिजे, हेही दिसते आहे.

आपल्या देशाच्या प्रमुख नेत्याविषयी तर ही काळजी अजूनच घेतली पाहिजे. जवाहरलाल नेहरू यांना लोकांचे प्रचंड प्रेम लाभले. अनभिषिक्त सम्राटासारखी त्यांनी सत्ता गाजवली; परंतु चीनविषयी हिमालयाएवढ्या चुकांनंतर झालेला टीकेचा भडीमार त्यांना सहन झाला नाही. त्यातून ते खचले आणि मृत्यूपंथी लागले.

वर्ष १९६५ च्या युद्धानंतर लालबहादूर शास्त्री यांना देशांतर्गत प्रचंड लोकप्रियता लाभली होती. भारत-पाकिस्तान दोघांमध्ये करार करण्यासाठी ते रशियात गेलेले असतांना बैठकींच्या काळातच त्या हॉटेलमध्ये शास्त्री यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याविषयी आम्ही काहीच बोललो नाही. तो स्वच्छ आणि शुद्ध भेकडपणा होता. रशियाची कितीही मैत्री असली, तरी देशाच्या सर्वोच्च नेत्याचा संशयास्पद मृत्यू खपवून घेणे अयोग्य होते.

सुवर्णमंदिरात सैन्य घुसवले म्हणून इंदिरा गांधी यांचे सुरक्षारक्षक सतवंत सिंह आणि बियांत सिंह यांनी गोळ्या झाडून त्यांच्या देहाची चाळण केली. १० वर्षांच्या आत श्रीलंकेत शांतीसैन्य पाठवले म्हणून लिट्टेच्या सैनिकांनी राजीव गांधी यांच्या शरिराच्या आत्मघातकी बॉम्बचा उपयोग करून चिंधड्या उडवल्या.

इस्लामी आतंकवादाची आपल्याकडे परंपरा प्राचीन असली, तरी स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्याला असे राजकीय स्वरूप आलेले नाही, जे पाकिस्तानात आलेले आहे. तिकडे त्यांच्याच देशाच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची हत्या ही राजकारण-आतंकवाद अशा दोहोंच्या मिश्रणातीलच आहे. पाकिस्तानचा इतिहासच अशा राजकीय-आतंकवादमिश्रित हत्यांचा आहे.

अशा हत्याकांडांकडे आपल्या देशात फारसे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. आमच्या देशातील संशोधक आणि शास्त्रज्ञ यांच्या झालेल्या हत्याही आजपर्यंत पडद्याच्या आत असल्यासारख्या आहेत. खरेतर तो वेगळा विस्तृत विषय आहे. देशातील कित्येक न चर्चिली गेलेली पाने अशा राजकीय आणि संरक्षण विषयक हत्यांनी भरलेली आहेत. त्यामुळे याची नोंद घेतलीच पाहिजे.

हत्येची आशंका केवळ एखाद्या आपल्यासारख्या नेत्याविषयी आहे असे नव्हे; तर अनेक महत्त्वाच्या नेत्यांविषयीही ही आशंका आहे. हे आम्ही सांगावे मगच ऐकले जाईल, यासाठी हे लिहिण्याचा प्रपंच नाही. आपण ही स्थिती जाणत असालच आणि त्यावर उपाययोजनाही काढल्या गेलेल्या असतील; परंतु रहावत नाही म्हणून सांगण्याचे धाडस केले आहे.

नागरिकांची सजगता महत्त्वाची आहे. ही युद्धे साधी नाहीत. येणार्‍या काळात विरोधी प्रचाराची धूळ अशीच उडत रहाणार आहे. २६/११ च्या आक्रमणाच्या वेळी अजमल कसाब आणि त्याचे साथीदार मुंबईत थैमान घालण्याच्या हेतूने येत असतांना हातात प्रभादेवीच्या सिद्धीविनायकासमोर मिळणारे लाल दोरे हातात घालून आणि भारतीय हिंदु विद्यार्थ्यांची ओळखपत्रे खिशात ठेवून आले होते. कसाब मेला असता, तर हे सर्व अतिरेकी हिंदु विद्यार्थी म्हणून घोषित करण्यात आले असते आणि अन्वेषणही तसेच झाले असते. एका तुकाराम आेंबळे यांच्या शौर्याने हे षड्यंत्र उघडकीस आले. नाहीतर हिंदु आतंकवादाच्या चर्चेच्या त्सुुनामी लाटा परत वृत्तपत्र आणि दूरचित्रवाहिन्या यांमधून आपल्यावर आदळत राहिल्या असत्या.

इस्लामी आतंकवादाचा भाग म्हणून पुण्यात आतंकवादी आक्रमण होणार होते. दगडूशेट हलवाई मंदिराच्या बाहेर कातील सिद्दीकी याने बॉम्बने भरलेली पिशवी ठेवलीही. पिशवी ठेवून तो तिथून निघाला; परंतु तेथे असलेल्या फुलवाल्याचे लक्ष होते. फुलवाल्याने त्याला पिशवी घेऊन जायला लावली. शेकडो प्राण वाचले आणि ताण वाढला नाही. ही सतर्कता आज प्रत्येक नागरिकाला वाढवायला हवी.

मोदीजी आणि शहाजी, तुमच्या हातात देशाचे सुरक्षित भविष्य आहे; म्हणून तुम्ही स्वत:ला जपायला हवे !

आपला विनम्र,
श्री. चेतन राजहंस,
राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

भाजपाराष्ट्रीयसनातन संस्था

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​