माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

नवी देहली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अरुण जेटली यांचे २४ ऑगस्ट या दिवशी एम्स् रुग्णालयात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्‍वसनाचा त्रास होत असल्याने ते ९ ऑगस्टपासून या रुग्णालयातील अतीदक्षता विभागात होते. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह भाजपमधील काही ज्येष्ठ नेते यांनी एम्स् रुग्णालयात जाऊन त्यांची भेटही घेतली होती. यापूर्वी जेटली यांना कर्करोग असल्याचेही निदान झाले होते. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत जाऊन उपचार घेतले होते. तेथून आल्यावर जेटली यांच्यावर शस्त्रकर्मही करण्यात आले होते. तसेच त्यांचे मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर २५ ऑगस्टला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते अर्थमंत्री होते; मात्र प्रकृतीच्या कारणाने त्यांनी दुसर्‍या कार्यकाळात मंत्रीपद घेण्यास नकार दिला होता.

मी जवळचा मित्र गमावला ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मी माझा सर्वांत जवळचा मित्र गमावला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुण जेटली यांच्या निधनावर प्रतिक्रिया व्यक्त केली. पंतप्रधान मोदी सध्या सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर आहेत. मोदी यांनी पुढे म्हटले की, अरुण जेटली यांची पत्नी संगीता आणि मुलगा रोहन यांच्याशी मी दूरभाषवरून चर्चा केली. ‘तुमच्या दुःखात सहभागी आहे’ असे सांगत मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्ही दौरा रहित करू नका’ असे त्यांच्या कुटुंबियांनी मला सांगितले’, अशी माहितीही मोदी यांनी दिली.

अरुण जेटली यांचा परिचय

अरुण जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ या दिवशी झाला. त्यांचे वडील महाराज किशन जेटली हे प्रसिद्ध अधिवक्ता होते. वर्ष १९६०-६९ या काळात देहलीतील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. वर्ष १९७३ मध्ये श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्यांनी कॉमर्स विषयाची पदवी संपादन केली. वर्ष १९७७ मध्ये देहली विश्‍वविद्यालयातून त्यांनी कायदा पदवी मिळवली. सत्तरच्या दशकात ते देहली विश्‍वविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते. वर्ष १९७४ मध्ये येथील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले. वर्ष १९८९ मध्ये त्यांची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती झाली. जानेवारी १९९० मध्ये त्यांना देहली उच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता म्हणून नियुक्त केले. वर्ष १९९१ पासून ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. वर्ष १९९९ च्या लोकसभा निवडणुकींच्या काळात ते भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते होते. वर्ष १९९९ मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये जेटली माहिती आणि प्रसारण मंत्री, कायदामंत्री आणि जलवाहतूकमंत्री होते. वर्ष २००० पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. ३ जून २००९ या दिवशी त्यांची राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाली होती. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात से अर्थमंत्री होते, तर त्यांच्याकडे काही काळ संरक्षण मंत्रालयही होते.

जेटली यांच्या जाण्याने देशाची सर्वांत मोठी हानी ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

मुंबई : आमचा सर्वांत मोठा आधार आणि मोठा भाऊ सोडून गेला आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यामधील दुवा म्हणून जेटली यांनी नेहमीच काम केले आहे. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जेटली यांचे चांगले संबंध होते. गेल्या वर्षी जेटली माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आले होते. त्या वेळी ते सर्वांशी आपुलकीने वागत होते. जेटलींच्या जाण्याने केवळ भाजप किंवा शिवसेना यांचीच नव्हे, तर देशाची सर्वांत मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते तथा खासदार श्री. संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

राष्ट्रीय

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​