कल्याण येथील ३१ वे अखिल भारतीय स्वा. सावरकर साहित्य संमेलन

दीपप्रज्वलन करतांना डॉ. सच्चिदानंद शेवडे, डावीकडून श्री. शंकर गोखले, चंद्रशेखर वझे, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर सौ. विनिता राणे, आमदार श्री. नरेंद्र पवार आणि अधिवक्ता सुरेश पटवर्धन

कल्याण (स्वा. सावरकर साहित्य नगरी) : अंदमानात वाढणारी गर्दी पहाता ज्या कोठडीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रक्त आणि घाम गाळला, ती जागा ‘हनिमून प्लेस’ (मधुचंद्राची जागा) म्हणून प्रचलित होऊ पहात आहे. सावरकर कळण्यासाठी प्रत्येकाने वेगवेगळा अभ्यास करायला हवा. सावरकरांनी भाषाशुद्धीचे कार्य केले. आपण जेव्हा परकीय शब्द वापरतो, तेव्हा आपण आपल्या भाषेतील शब्द मारून टाकत असतो. आज जगामध्ये हिंदी भाषा दुसर्‍या क्रमांकावर आहे, तर इंग्रजी तिसर्‍या क्रमांकावर आहे आणि आपली माय मराठी १३० व्या स्थानावर आहे. पारतंत्र्यात जाण्यापूर्वी ब्राझील देशात १०८ भाषा होत्या; पण आता त्या सर्व मृत झाल्या असून पोर्तुगीज भाषा त्यांची भाषा झाली आहे; कारण पोर्तुगीजांनी त्यांच्यावर शासन केले होते. यावरून भाषाशुद्धीचे महत्त्व लक्षात येते, असे प्रतिपादन डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले. १६ जून या दिवशी कल्याण येथे आयोजित करण्यात आलेल्या ३१ व्या अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या वेळी बोलत होते. या वेळी अन्य मान्यवरांनीही त्यांचे विचार मांडले.

डॉ. शेवडे पुढे म्हणाले, ‘‘धर्मशास्त्राचा अभ्यास नसल्यामुळे आपण आपल्या सणांची खिल्ली उडवतो. मुसलमान किंवा ख्रिस्ती मात्र असे करत नाहीत. हिंदूंना धर्माचे व्यवस्थित शिक्षण मिळत नाही. त्यामुळे आपण आपल्यासमोरील वाईट असलेले घेतो, चांगले कधी घेत नाही. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील लोकांनी सावरकरांविषयी शंका काढावी, हे दुर्दैवच आहे.’’

राष्ट्र संघटित करायचे असेल, तर प्रथम जातीवाद नष्ट करायला हवा ! – दुर्गेश परुळकर, लेखक आणि व्याख्याते

आपण परिस्थितीला सामोरे न जाता कायम बचावाच्या स्थितीत असतो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ज्या समस्या निर्माण होत आहेत, त्यांना संघटितपणे सामोरे जायला हवे. भूमीनिष्ठा जिवंत असेल, तर परकीय शत्रू आपल्यावर आक्रमण करू शकत नाहीत. आपल्या संस्कृतीवर आपला विश्‍वास असायला हवा. तसेच ‘डे’सारख्या विकृतींचा प्रतिकार करायला हवा. राष्ट्र संघटित करायचे असेल, तर प्रथम जातीवाद नष्ट करायला हवा. आपल्या देशावर अनेक आक्रमणे झाली, तरी आपली धर्म आणि संस्कृती अजूनही टिकून आहे; मात्र मेकॉलेने लादलेल्या शिक्षणप्रणालीमुळे आज आपल्याला आपल्याच धर्माविषयी प्रश्‍न निर्माण होत आहेत.

महाशक्ती बनण्यासाठी आपल्याला आपल्या पायावर उभे रहावे लागणार आहे ! – भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार

आपल्या धडावर आपलेच डोके असलेले पंतप्रधान भारताला मिळाले आहेत. दूरदर्शनवर ज्या चर्चा होतात, ते निव्वळ दाखवण्यासाठी असतात. महाशक्ती होण्यासाठी आपल्याला आपल्या पायांवर उभे रहावे लागणार आहे. गेली ७१ वर्षे आपल्याला केवळ पंगू केले जात होते. ‘वेगवेगळी अनुदाने देतो’, असे पोकळ आश्‍वासन दिले जात होते; मात्र ५ वर्षांत मोदींनी देशाला स्वतःच्या पायावर उभे रहाता येईल, असा विश्‍वास निर्माण केला आहे. आपल्या सैन्याला स्वतःच्या पायावर उभे केले आहे; म्हणूनच सर्जिकल स्ट्राईक होऊ शकले. आधीचे सरकार प्रचंड भ्रष्टाचारी होते; मात्र आज भारत महासत्ता होऊ पहात आहे. हे सर्व आले कुठून ? तर ते त्यांच्या अंतर्मनात असलेल्या सावरकरांकडूनच !

भारताची आर्थिक स्थिती सुधारत असून सर्वांना बलशाली भारत मिळेल ! – डॉ. रत्नाकर फाटक

भारताची आर्थिक स्थिती सुधारत असल्याचे लक्षात येते. आताचे सरकार स्थिर सरकार असल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होईल. हा वेग अधिक दुपटीने वाढेल. स्विस बँकेत जाणारा काळा पैसा आता मंदावला आहे. हा निधी उपलब्ध झाल्यानंतर विकासाचा मार्ग खुला होईल. भ्रष्टाचारी लोक आता घाबरलेले आहेत. संरक्षण व्यवस्थेत भारत आतून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मजबूत होत आहे. धर्मांतर करण्यासाठी जो काही पैसा यायचा, त्यावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे. सर्वांना बलशाली भारत मिळेल, असा आशावाद निर्माण झाला आहे.

३१ व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनात पारित केलेले ठराव !

  • स्वा. सावरकरांना विनाविलंब ‘भारतरत्न’ देण्यात यावे.
  • ‘पोर्ट ब्लेअर’ला ‘सावरकरनगर’ असे नाव देण्यात यावे.
  • स्वा. सावरकरांचे लंडन येथील निवासस्थान केंद्र किंवा राज्य शासनाने कह्यात घेऊन तेथे स्मारक उभारावे.
  • ‘जयोस्तुते’सारखे मंगलगीत शाळेच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत करावे.
  • शालेय अभ्यासक्रमात किमान एक वर्ष सैनिकी शिक्षण अनिवार्य करावे.
  • राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांची कोणत्याही माध्यमातून होणारी अपकीर्ती थांबवावी.
  • राजस्थान राज्यशासनाने सावरकरांविषयी विपर्यस्त माहिती इतिहासाच्या पुस्तकात प्रकाशित केली आहे आणि ‘वीर’ ही उपाधी काढली आहे, याविषयी, तसेच ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने केलेल्या खोडसाळपणाविषयी अद्याप क्षमा मागितली नाही, याचा आम्ही निषेध करत आहोत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

राष्ट्रीयहिंदु संघटना आणि पक्ष

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​