धर्मनिरपेक्षतेच्या गर्तेत अडकलेला नेपाळ आणि हिंदूंची द्विधा स्थिती !

नेपाळ आणि भारत हे दोन भिन्न देश आहेत; परंतु दोन्ही देशांतील नागरिकांतील धर्म, संस्कृती, परंपरा, मानसिकता इत्यादी अनेक गोष्टींमध्ये साम्य आहे. त्यामुळे जे दोष भारतीय समाजमनात दिसतात, तेच दोष नेपाळमधील समाजमनातही दिसून येतात. भारताने गेल्या १ सहस्र २०० वर्षांच्या इतिहासात इस्लाम आणि ख्रिस्ती राष्ट्रांकडून होणार्‍या आक्रमणांचे दुष्टचक्र अनुभवले आहे. वर्तमानकाळात नेपाळी हिंदु बांधवही या आक्रमणाचे दुष्टचक्र अल्प-अधिक प्रमाणात अनुभवत आहेत. ‘एकमेकांच्या अनुभवांतून शिकून नेपाळवरील हे दुष्टचक्र संपवून भारत आणि नेपाळ ही दोन्ही राष्ट्रे पुन:श्‍च ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून स्थापित व्हावीत’, अशी सर्व सनातन हिंदु बांधवांची इच्छा आहे. या दृष्टीने आत्मचिंतन म्हणून हा लेख लिहित आहे. ‘स्वतःतील कमतरता आणि दोष यांचा अभ्यास अन् त्यांचे योग्य विश्‍लेषण करून केवळ नेपाळींनीच नव्हे, तर भारतातील हिंदूंनीही दिशा घ्यावी. त्यांनी आपापल्या भागांत अधिकाधिक कार्यरत होऊन ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेची चळवळ गतीमान करावी, यासाठी ईश्‍वर त्यांना सद्बुद्धी आणि बळ देवो’, अशी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करतो !

(सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

१. नेपाळ-भारत संबंध

सर्वप्रथम आपण नेपाळ आणि भारत यांच्या संबंधांविषयी जाणून घेऊया. नेपाळ आणि भारत या देशांतील हिंदूंमध्ये आपापसांत अपार प्रेम आहे. हे दोन्ही भिन्न देश असले, तरी त्यांच्यात सहजपणे रोटी-बेटी व्यवहार होत असतात. एकमेकांकडे घर-आंगण असल्याप्रमाणे जाणे-येणे असते. जाण्या-येण्यासाठी कोणतीही कागदपत्रे लागत नाहीत. ‘नेपाळ हिंदु राष्ट्र व्हावे’, यासाठी नेपाळी नागरिकांच्या भारतीय हिंदूंकडून फार अपेक्षा आहेत, तसेच भारतीय हिंदूंचीदेखील तशी आत्यंतिक तळमळ आहे. असे असले, तरी राजकीय पातळीवर सध्या नेपाळ-भारत संबंध फारसे चांगले नाहीत. कुठेतरी काहीतरी चुकत आहे. मोठा भाऊ म्हणून भारताने ते तत्परतेने समजून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना काढणे आवश्यक आहे, तसेच नेपाळी बांधवांनीही त्यासाठी त्यांच्या परीने योगदान देणे आवश्यक आहे. हे संबंध बिघडण्यामागे काही जी कारणे दिसून येत आहेत, ती थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो.

अ. भारत-नेपाळ संबंधांतील वितुष्टता, हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असणे

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत-नेपाळ ऐक्य हे सनातन हिंदु धर्म, संस्कृती आणि परंपरा यांना बळ देणारे आहे, तसेच सनातन हिंदु धर्माला (पर्यायाने भारत आणि नेपाळ यांना) विश्‍वगुरुपदी आरूढ करण्यास पूरक ठरणारे आहे. परिणामी वैश्‍विक स्तरावर सनातन धर्मविरोधी जे षड्यंत्र चालले आहे (जे भारत गेल्या १ सहस्र २०० वर्षांपासून अनुभवत आहे), त्याचाच एक भाग म्हणून भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंधांत वितुष्ट निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत, हे जाणले पाहिजे.

या षड्यंत्रात,

अ. ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या आडून अमेरिका, युरोपीय राष्ट्रे, दक्षिण कोरिया, जपान आदी राष्ट्रे सहभागी आहेत.

आ. जिहादी आतंकवाद आणि त्यांना समर्थन देणारे पाकिस्तान, सौदी अरेबिया यांच्यासह अरब राष्ट्रेही सहभागी आहेत.

इ. यांत सर्वांत पुढे आहे तो नेपाळमध्ये साम्यवादाचा प्रभाव वाढवून सनातन हिंदु धर्माला दाबण्याचा प्रयत्न करणारा चीन ! भारत-नेपाळ संबंध बिघडवून भारताला सर्व बाजूने शत्रूराष्ट्राच्या चक्रव्यूहात अडकवण्यासाठी प्रयत्नरत असलेला, तसेच स्वतःचे नेपाळशी असलेले संबंध सुदृढ करून तेथे हात-पाय पसरवणारा चीन, हा उभय देशांचा सर्वांत धूर्त शत्रू आहे.

ही आंतरराष्ट्रीय षड्यंत्रे लक्षात घेऊन भारत सरकार, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी योग्य दिशेने कार्य करणे अपेक्षित आहे.

आ. भारत-नेपाळ संबंधांत आलेली कटुता, हे भारतीय परराष्ट्र नीतीचे अपयश असणे !

कोणत्याही देशाची परराष्ट्रनीती ही वैश्‍विक स्तरावर अधिकाधिक मित्र देश निर्माण करणारी, तर कमीत कमी शत्रू निर्माण करणारी असावी. असे होत नसेल, तर ‘कुठेतरी चुकत आहे’, हे लक्षात घेऊन आत्मचिंतन करून त्यात पालट करणे अपेक्षित असते. मित्रराष्ट्र हे शत्रूसम परिवर्तित होईल, अशी परराष्ट्रनीती कोणत्याही राष्ट्राला नकोच असते. वर्तमान स्थितीतील भारत-नेपाळ संबंधांत आलेली कटुता पहाता ‘उभय राष्ट्रांची परराष्ट्रनीती कुठेतरी चुकत आहे’, हे दिसून येते.

१. नेपाळमध्ये चीनने केलेल्या भारतविरोधी अपप्रचाराला भारताने कोणतेही प्रत्युत्तर न देणे ! : नेपाळचा समुद्रमार्गे होणारा आंतरराष्ट्रीय व्यापार, हा बहुतांश भारतीय बंदरे आणि भारतातील भूपृष्ठ वाहतूक यांच्या माध्यमातून होतो; परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एक घटना घडली आणि तब्बल ६ मास भारत-नेपाळ सीमा बंद होती. परिणामी त्या काळात नेपाळी जनतेला पेट्रोल, डिझेल, गॅस, मीठ आदींसारख्या जीवनावश्यक वस्तूंसाठी वणवण फिरावे लागले होते. ‘भारताने हे जाणीवपूर्वक केल्याने आम्हाला या हालअपेष्टा भोगाव्या लागल्या’, अशी नेपाळी जनतेची भावना बनली. यामुळे नेपाळी जनतेच्या मनात भारताविषयी आक्रोश निर्माण झाला. चूक दोन्ही राष्ट्रांची होती; परंतु नेपाळमधील साम्यवादी (हिंदुविरोधी) प्रसारमाध्यमे, साम्यवादी राजकारणी आणि या सर्वांना बाहुल्यांप्रमाणे खेळवणारा चीन जेव्हा या घटनेविषयी नेपाळमध्ये भारतविरोधी अपप्रचार करत होता. तेव्हा भारताची बाजू नेपाळी जनतेपुढे मांडण्यासाठी भारताकडून काहीच प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे नेपाळी जनतेचे मत भारतविरोधी बनले.

२. दोन्ही देशांमध्ये एकमेकांविषयी राग असणे

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी नेपाळी जनतेला पुष्कळ प्रेम असून त्यांच्याकडून बर्‍याच अपेक्षाही आहेत; परंतु ‘मोदी हे नेपाळ पुन्हा ‘हिंदु राष्ट्र’ होण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाहीत’, अशी भावना नेपाळी जनतेच्या मनात निर्माण झाल्याने त्यांच्यात एक प्रकारची निराशाही निर्माण झाली आहे. याशिवाय मोदी यांनी एका विदेशी दौर्‍यात ‘भारत हा गौतम बुद्धांचा देश आहे’, असे म्हटल्यामुळे नेपाळी जनता त्यांच्यावर अप्रसन्न आहे. त्यांच्या मते गौतम बुद्ध यांचा जन्म नेपाळमध्ये झाल्याने ‘नेपाळ हा गौतम बुद्धांचा देश आहे.’ खरेतर गौतम बुद्धांचा जन्म नेपाळचा आहे; पण त्यांना आत्मबोध भारतात झाला. त्यामुळे ते दोन्ही देशांचे होऊ शकतात; मात्र या गोष्टींमुळे एकमेकांविषयी राग किंवा असुया बाळगणे चुकीचे आहे, हे दोन्ही देशांतील हिंदूंच्या लक्षात का येऊ नये ?

३. मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने ‘अखंड भारत’ संकल्पनेत केलेला नेपाळचा समावेश नेपाळी जनतेला अमान्य असणे आणि त्यामुळे दोन्ही देशांतील हिंदूंचे ऐक्य होण्यात अडचणी निर्माण होणे

एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या एका दृष्टीकोनामुळे नेपाळी जनतेत मतभेद निर्माण झाले आहेत. भारतातील मोठी हिंदुत्ववादी संघटना ‘अखंड भारता’ची संकल्पना घेऊन नेपाळी हिंदूंना संघटित करण्यासाठी गेली होती. या नकाशात नेपाळ हा अखंड भारताचा भाग दाखवण्यात येतो; परंतु नेपाळी जनता नेपाळला सार्वभौम आणि स्वतंत्र राष्ट्र मानते. त्यांना ‘अखंड भारत’ ही कल्पना चुकीची वाटते. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेसाठी नेपाळमधील हिंदुत्वनिष्ठ एकत्रित येऊन कार्य करण्याऐवजी ते एका संघर्षमय स्थितीत आहेत. परिणामी दोन्ही देशांतील हिंदूंचे ऐक्य होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

अ. चीनने ‘ग्रेटर-नेपाळ’, ही भारतविरोधी संकल्पना राबवणे

या संघर्षाचा लाभ उठवत पाकिस्तान आणि चीन यांच्या गुप्तचर संस्थांकडून काही नेपाळी संघटनांना हाताशी धरून ‘ग्रेटर-नेपाळ’, ही भारतविरोधी संकल्पना राबवली जात आहे. यामध्ये त्यांनी नेपाळच्या नकाशाला भारतातील दार्जिलिंगचा भाग जोडून ‘ग्रेटर-नेपाळ’ची सीमा दाखवली आहे. यापूर्वी भारतात चीन आणि पाकिस्तान पुरस्कृत फुटीरतावादी ‘गोरखा लॅण्ड’ आंदोलन झाले होते, तेच हे क्षेत्र. दार्जिलिंग क्षेत्र हे उत्तर पूर्व राज्यांचे प्रवेशद्वाराचे क्षेत्र असल्याने येथे असंतोष निर्माण करून चीन त्यावर नियंत्रण मिळवू पहात आहे. यासाठी तो भोळ्या नेपाळी जनतेला बळीचा बकरा बनवत आहे. भारताच्या हे लक्षात येऊ नये, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. सनातन धर्म परंपरेत अनेक अधिराज्ये सर्वभौम आणि मित्रराज्ये राहून धर्म, राष्ट्र, संस्कृती आणि परंपरा यांचे रक्षण करत असत. ‘राज्यांचे विलिनीकरण किंवा सत्ता बळकावणे’, या हेतुने सनातन परंपरेत कधीच प्रयत्न झाले नाहीत. चक्रवर्ती सम्राटसुद्धा कधी राज्ये खालसा करून त्यांचा बलपूर्वक ताबा घेत नसे. या न्यायाने ‘अनेक राज्ये आणि राष्ट्रे स्वतःचे सार्वभौमत्व राखत समान ध्येयाने धर्म, संस्कृती परंपरा आदींचे रक्षण करू शकतात’, हे लक्षात घेऊन सद्यःस्थितीत प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

वर्तमान नेपाळचे नागरिकदेखील नेपाळचे थोर राजे पृथ्वीनारायण शाह यांना यासाठीच मान देतात; कारण त्यांनी विखुरलेल्या छोट्या छोट्या नेपाळी राजांना एकत्रित करून आजच्या भव्य अशा नेपाळ राष्ट्राची निर्मिती केली. हे एकीकरण सार्वभौम सनातन धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणार्थ झाले होते. ‘काळाच्या आवश्यकतेनुसार असे निर्णय परस्पर संवादातून होऊ शकतात’, असा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.

४. नेपाळमधील साम्यवादी चळवळीच्या उदयाला भारत कारणीभूत असल्याचा नेपाळी जनतेचा समज असणे आणि भारताने याविषयी स्वतःची योग्य बाजू नेपाळी जनतेपुढे न मांडणे

नेपाळमधील साम्यवादी चळवळ हे भारताची देणं असल्याची नेपाळी जनतेची भावना आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासह सोनिया गांधी एकदा काठमांडू येथे गेले होते. सोनिया गांधी या ख्रिस्ती धर्मीय असल्याने त्यांना नेपाळमधील जगप्रसिद्ध श्री पशुपतीनाथ मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. या प्रसंगानंतर पुढे नरसिंहराव पंतप्रधान असतांना ‘भारताच्या हस्तक्षेपाने नेपाळमध्ये साम्यवादी चळवळीचा उदय झाला’, असा नेपाळी जनतेचा समज आहे. नेपाळी जनतेच्या म्हणण्यानुसार भारत सरकारने अनधिकृतपणे नेपाळमध्ये उलथापालथ घडवली. साम्यवाद्यांना सशस्त्र प्रशिक्षण देऊन नेपाळमध्ये रक्तरंजित क्रांती घडवली. ‘नेपाळमध्ये झालेल्या चुकीच्या निर्णयांत (उदा. ‘राजेशाही उलथवून लावून लोकशाही लादणे, तेथील संविधानात ‘सेक्युलरिझम’ शब्द घालणे आदी) हस्तक्षेप करून भारत ते रोखू शकला असता’, असे त्यांना वाटते. ‘भारताने वेळोवेळी स्वतःच्या प्रभावाने हे न थांबवणे, हा भारताने नेपाळवर केलेला अन्याय आहे’, अशी तेथील जनतेची भावना आहे. नेपाळी जनतेची भावना किंवा अपेक्षा योग्य-अयोग्य असू शकते; परंतु भारत सरकारने याविषयी स्वतःची योग्य बाजू नेपाळी जनतेपुढे मांडणे आवश्यक होते. तथापि भारताकडून तसे झाले नाही. एकूण नेपाळी जनतेच्या भावना भारत सरकारपर्यंत पोचून त्यावर त्याने योग्य उपाय काढावेत, हीच नेपाळी जनतेची अपेक्षा.

५. नेपाळमध्ये धर्मांतराची मोठी समस्या निर्माण होणे

नेपाळमध्ये राजेशाही होती, तोपर्यंत तेथे ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मप्रसारक यांच्यावर कडक निर्बंध होते. त्यामुळे ख्रिस्ती आणि मुसलमान यांची लोकसंख्याही मर्यादित होती; परंतु सामूहिक हत्याकांडाद्वारे राजवंशाचा नाश करून नेपाळमध्ये लोकशाही स्थापित करण्यात आली आणि ख्रिस्ती धर्मप्रसारकांना मोकळे रान उपलब्ध झाले. त्याचसमवेत पाकिस्तान आणि त्याची गुप्तहेर संघटना आयएस्आयला नेपाळमध्ये मुक्त प्रवेश मिळाला. कालांतराने पंथनिरपेक्षता स्वीकारून नेपाळच्या ‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेला मूठमाती देण्यात आली. आता नेपाळमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांना मोकळे रानच मिळाले आहे.

अ. ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी हिंदू आणि बौद्ध यांना धर्मांतरित करणे

नेपाळमधील धर्मांतराची समस्या ही ग्रामीण, तसेच पहाडी (पर्वतीय) भागांत अधिक असली, तरी आता ती शहरी आणि सुशिक्षित भागांतही वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सध्याचे राज्यकर्ते जातीने ब्राह्मण असले, तरी साम्यवादी विचारसरणीचे आहेत. त्यांतील बहुतांश धर्मांतरित ख्रिस्ती आहेत. आता तर त्यांच्या छात्रछायेखाली ख्रिस्ती धर्मप्रसारकांना राजाश्रय मिळाला आहे. ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी बौद्ध नेते आणि धर्मगुरु यांना जवळ करून हिंदु धर्मावर वैचारिक आक्रमणे चालू केली आहेत; परंतु ते अद्यापही अत्यल्प हिंदूंना धर्मांतरित करू शकले. त्यानंतर त्यांनी रणनीती पालटली आणि आता त्यांनी बौद्धांनाच ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित करून घेण्यास प्रारंभ केला आहे.

आ. ख्रिस्ती मिशनर्‍यांनी विविध प्रलोभने दाखवून सर्वसामान्य हिंदू आणि बौद्ध यांचा ताबा घेणे

सध्या नेपाळमधील पहाडी (पर्वतीय) भागांतील हिंदू अणि बौद्ध समाज हा अधिकाधिक धर्मांतराला बळी पडत आहे. ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून ग्रामीण भागांतील हिंदू आणि बौद्ध यांना पैशांचे प्रलोभन दाखवणे, त्यांना घर, गाडी, कपडे इत्यादी सुविधा पुरवणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा व्यय (खर्च) करणे, एखाद्या परिवाराचा रुग्णालयाचा व्यय करणे, घर खर्चासाठी पैसे देणे, कुटीर-उद्योग किंवा तत्सम उद्योगांचे प्रशिक्षण देणे आदी माध्यमांतून धर्मांतर करत आहेत. याशिवाय शहरी भागांत एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला माध्यम बनवून त्याच्या माध्यमातून ते आसपासच्या भागात धर्मांतर करतात. प्रत्येक रविवारी चर्चमध्ये येण्यासाठी गरीब कामगार लोकांना कोट-पॅन्ट शिवून देणे, चर्चमध्ये आल्यावर आठवड्याभराचे किराणा देणे, रोजंदारी करणार्‍यांना कामावर न जाता चर्चमध्ये बोलावून रोजंदारित मिळतात, तितके पैसे देणे आदी अनेक प्रकारांनी ख्रिस्ती मिशनर्‍यांनी सर्वसामान्य हिंदू आणि बौद्ध यांचा ताबा घेतला आहे.

इ. मिशनर्‍यांचे आर्थिक बळ आणि युरोपीयन देशांचा राजकीय दबाव, हा धर्मांतराचा पाया असणे

आजच्या क्षणाला नेपाळची राजधानी असलेल्या एकट्या काठमांडू शहरात तब्बल ७०० हून अधिक नोंदणीकृत चर्च आहे. याशिवाय संपूर्ण नेपाळमध्ये तब्बल २ सहस्र ५०० ते २ सहस्र ७०० इतकी नोंदणीकृत चर्च आहेत. किमान तितकीच अनधिकृत चर्चही आहेत. गेल्या १५ वर्षांत चर्चची वाढलेली संख्या, ही फार मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचे द्योतक आहे. एका चर्चसाठी जागा आणि बांधकाम मिळून न्यूनतम १० लाख रुपये, असा व्यय (खर्च) धरल्यास २ सहस्र ५०० चर्चसाठी किती मोठी आर्थिक उलाढाल झाली असेल, हे लक्षात येते. एकूणच ‘ख्रिस्ती मिशनर्‍यांचे आर्थिक बळ आणि युरोपीयन देशांचा राजकीय दबाव, हा नेपाळमधील धर्मांतराचा पाया आहे’, असे दिसून येते. धर्मांतरामुळे नेपाळमधील काही परिवारांची स्थिती बिकट झाली आहे. काही परिवारांमध्ये पालक धर्मांतरित झाले आहेत, तर त्यांची मुले हिंदु धर्म वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही परिवारांत मुले धर्मांतरित झाली आणि पालक हिंदु धर्म वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे अशा परिवारांत एकतर सण-उत्सव साजरे होत नाहीत आणि झालेच, तर ते विकृत स्वरूपात किंवा सर्वधर्मसमभावाच्या पद्धतीने होतात. कधी यासाठी कुटुंबात संघर्षही होतो. ‘अशा परिवारांतील कोणाचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कार कोणत्या धर्माच्या पद्धतीने करायचा’, यावरही आता संघर्ष चालू झाला आहे !

६. नेपाळी हिंदूंचे धर्मप्रेम (धर्माचरण)

सर्वसामान्य नेपाळी हिंदु हा धर्मपरायण आणि देशभक्त आहे. नित्य पूजापाठ आणि कर्मकांड यांवर त्याची विशेष श्रद्धा आहे. पारंपरिक सण, उत्सव आणि व्रते करण्याकडे त्याचा कल असतो. तथापि ब्राह्मणांसह बहुतांश हिंदू मांसाहारी असून गेल्या काही वर्षांपासून तेथे शाकाहाराविषयी प्रबोधनाचे मोठे अभियान चालू आहे. नेपाळी हिंदु परिवार नियमित तीर्थयात्रेला जातात. नेपाळी जनतेचा पूर्वी संस्कृत शिकण्याकडे अधिक कल होता. आता इंग्रजी माध्यमात शिकून पटकन विदेशात जाण्याकडे कल वाढला आहे. नेपाळी हिंदु बांधवांना पारंपरिक वेशभूषा आवडत असली, तरी ही परंपरा सध्या केवळ वयस्कर लोकांनी जोपासलेली आहे. नवीन पिढी मात्र आता आधुनिक वेशभूषेकडे वळली आहे. नेपाळी जनता कर्मकांडप्रेमी असली, तरी साधना किंवा उपासनाकांड यांविषयी उदासीन आहे. पूजापाठ, भजन, गायन, तीर्थाटन आदी गोष्टींनाच ते साधना समजतात. एकूणच व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी त्यांच्यात जागरूकता अल्प आहे.

६ अ. पाश्‍चात्त्य कालगणना स्वीकारण्यासाठी आलेला दबाव नेपाळी हिंदु बांधवांनी संघटितपणे झुगारणे : नेपाळी हिंदु विक्रम संवत्सरानुसार कालगणना करतात. गेल्या १५ – २० वर्षांत पाश्‍चात्त्य कालगणना स्वीकारण्यासाठी आलेला दबाव नेपाळी हिंदु बांधवांनी संघटितपणे झुगारला आहे आणि सनातन पद्धतीची कालगणना अद्याप चालू ठेवलेली आहे. सध्या नेपाळमध्ये गुरुकुल परंपरा, आश्रम आणि मठ उभारण्याची चळवळ जोर धरत आहे; परंतु हे योग्य आणि यशस्वी होण्यासाठी अद्याप भरपूर पायाभूत कार्य होणे अपेक्षित आहे.

हिंदु अधिराज्य असलेला नेपाळ ‘धर्मनिरपेक्ष’ बनणे

राजपरिवाराचे हत्याकांड घडवून आणल्यानंतर नेपाळवर लोकशाही लादण्यात आली. राजकीय पक्षांच्या उदयासह नेपाळमध्ये साम्यवाद उदयाला आला. राजकीय नेते विदेशी शक्तींचे बाहुले बनून विकले गेले. विदेशांतून पैसे घेतले जाऊ लागले, पैशांच्या जोरावर बलाढ्य राष्ट्रांना हवी तशी धोरणे नेपाळमध्ये राबवण्यास प्रारंभ झाला. नेपाळचे राजकीय नेते पैशांसाठी विकले जाणे किंवा धर्मांतरित होणे इत्यादी अनेक कारणांमुळे हिंदु अधिराज्य असलेले नेपाळ प्रारंभी ‘लोकशाही राष्ट्र’ आणि काही वर्षांतच ते ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्र घोषित झाले. हिंदू असंघटित असणे, दिशाहीन असणे, त्यांच्यात कणखर नेतृत्व नसणे, आर्थिक आणि बौद्धीक बळ नसणे इत्यादी अनेक कारणांमुळे जो लढा समाजातून उभा रहायला हवा होता, तो उभा राहिला नाही. जातनिष्ठता, व्यक्तीनिष्ठता वा पक्षनिष्ठता यांमुळे हिंदूंकडून धर्मांतरित ख्रिस्ती ब्राह्मण किंवा उच्चवर्णीय, तसेच साम्यवादी यांना निवडून देण्याचे प्रकार घडत आहेत. हिंदूंची ही एक मोठी घोडचूक आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. ‘हिंदु राष्ट्र किंवा हिंदुत्वाचे रक्षण करू’, असे आश्‍वासन देणार्‍या राजकीय पक्षांनी ऐनवेळी संविधानात ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द अंतर्भूत करण्यास विरोध न करणे, त्यांनी शांतपणे धर्मनिरपेक्षता स्वीकारणे, त्यानंतर जनतेच्या पाठीत खंजीर खूपसून साम्यवाद्यांसह सत्तेत सहभागी होणे, अशा अनेक उलटसुलट प्रसंगांतून वर्तमान ‘धर्मनिरपेक्ष नेपाळ’चा राजकीय उदय झाला आहे. अशाप्रकारे एका हिंदु अधिराज्याचा मुडदा पाडून एक ‘धर्मनिरपेक्ष’ राज्यव्यवस्थेची स्थापना नेपाळमध्ये झाली आहे.