मुंबईनगरीत भव्य हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून भक्ती, शक्ती आणि संस्कृती यांचा त्रिवेणी संगम !

शौर्यजागरण प्रात्यक्षिकांनी वीरश्री जागवली । विठुनामाच्या गजराने भगवंत भक्तीची साक्ष दिली ॥
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाचे औचित्य

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे फुलांनी सजवलेले मेघडंबरीतील छायाचित्र

मुंबई : ‘हिंदूंच्या राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवरील एकमेव उपाय म्हणचे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना !’ असा ज्वलंत विचार देऊन हिंदूंमधील धर्मतेज जागवणारे आणि हिंदूंना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीप्रवण करणारे हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव म्हणजे हिंदूऐक्याच्या प्रकट आविष्काराची पर्वणी ! हा योग जुळून आला रविवार, दिनांक १९ मे २०१९ या दिवशी ! परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने भारतभर राबवण्यात आलेल्या हिंदु-राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत मुंबईतील गिरणगाव नगरीत भव्य हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. भगवंताच्या नामाचा गजर करत पारंपरिक वेशभूषेत दिंडीत सहभागी झालेले शेकडो धर्मनिष्ठ हिंदू यांसह दिंडीत सादर करण्यात आलेली स्वरक्षणविषयक प्रात्यक्षिके, राष्ट्रपुरुषांच्या त्यागाचे महत्त्व बिंबवणारे बालदेशभक्त आणि शौर्यजागरणाची प्रात्यक्षिके दिंडीमार्गातील लोकांचे लक्ष वेधून घेत होती. दिंडीचा समारोप एका मोठ्या सभेत होऊन मान्यवर वक्त्यांनी त्यांच्या ओजस्वी भाषणांद्वारे उपस्थितांमध्ये स्फुलिंग चेतवले. दिंडीमध्ये १ सहस्र हिंदु धर्मप्रेमींनी सहभाग घेतला.

धर्मध्वज आणि फुलांनी भावपूर्णरित्या सजवलेली पालखी घेऊन दिंडीत सहभागी झालेले धर्मवीर

…असा झाला दिंडीचा आरंभ

सायंकाळी ५ वाजता मुंबईतील चिंचपोकळी रेल्वे स्थानकाजवळील आर्थर मार्ग सिग्नल जवळील चौकात धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. हिंदुत्वनिष्ठ श्री. विशाल शिंदे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. अश्‍विनी शिंदे यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले.

श्री. प्रशांत सरवटेगुरुजी यांनी पौरोहित्य केले. ‘लष्कर-ए-हिंद’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवले. यानंतर मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवी मातेच्या पालखीचे आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. या वेळी ५ सुवासिनींनी पालखीचे औक्षण केले. शंखनादाने दिंडीचा आरंभ करण्यात आला. श्री. जयदीप शेडगे यांनी शंखनाद करताच परिसरातील वातावरणात चैतन्य पसरून उपस्थित हिंदूंमध्ये उत्साह संचारल्याचे अनुभवायला मिळाले. या चैतन्यमय वातावरणात दिंडी मार्गस्थ झाली.

परंपरागत पंढरीच्या वारीची प्रचीती देणार्याा पारंपरिक वेशभूूषेतील डोक्यावर तुळस आणि कलश धरलेल्या महिला
टाळ, मृदुंगाच्या गजरात विठुभक्तीचा जागर करणारे भजनी मंडळ आणि समवेत दिंडीत सहभागी झालेले वासुदेव
दिंडीत झिम्मा, फुगडी खेळत वैभवशाली भारतीय संस्कृतीचे महत्त्व बिंबवणारे महिलांचे मंगळागौर पथक

दिंडीची लक्षवेधक रचना

  • दिंडीच्या अग्रभागी युवा शौर्य जागरण शिबिराच्या वतीने स्वरक्षण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. लाठीकाठी, दंडसाखळी यांची प्रात्यक्षिके प्रत्यक्षदर्शींमध्ये वीरश्री निर्माण करत होती.
  • धर्मध्वज दिंडीला दिशानिर्देश करत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे भगव्या ध्वजाखाली हिंदूंना संघटित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याप्रमाणे भगव्या धर्मध्वजाखाली संघटित झालेला हिंदूंचा आविष्कार हिंदु राष्ट्र स्थापनेची चाहूल देत होता. प्रखर हिंदुत्वनिष्ठ मान्यवर धर्मध्वजासह मार्गक्रमण करत होते.
  • परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची सुहास्यवदन असणारी पालखीत विराजमान केलेली प्रतिमा साधकांना वेगळ्या भावविश्‍वात घेऊन जात होती. या पालखीसमोर केवळ साधकच नव्हेत, तर नामदिंडी पहाणारा सामान्य हिंदूही नतमस्तक होत होता. मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवी मातेची प्रतिमा विराजमान असलेली पालखी हिंदू एकता दिंडीवर ग्रामदेवतेची अखंड कृपा असल्याची साक्ष देत होती.
  • राष्ट्रपुरुषांची वेशभूूषा धारण करून दिंडीत सहभागी झालेली बालके भावी पिढीवर राष्ट्रपुरुषांच्या चरित्रांचे संस्कार रुजवण्याची आवश्यकता दर्शवत होती.
  • राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करतांना राष्ट्र आणि धर्मविरोधी शक्तींकडून धर्मनिष्ठांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जाते. अशा वेळी धर्मनिष्ठांच्या बाजूने समर्थपणे उभे राहून त्यांना आश्‍वस्त करणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे पथक अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.
  • सांप्रत काळात स्त्रियांवरील अत्याचारांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अशा वेळी प्रत्येक स्त्रीने रणचंडी दुर्गादेवीची उपासना करून सबला होण्याचा संदेश रणरागिणी पथक देत होते.
  • दिंडीच्या मध्यमागी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची महानता दर्शवणारा फुलांनी सजवलेला चित्ररथ हिंदू एकता दिंडीत सहभागी झालेल्या हिंदु धर्मनिष्ठांना चैतन्य प्रदान करत होता.
शिस्त आणि उत्साह यांचे दर्शन घडवणारा अन् पारंपरिक लेझीम खेळाचा ठेका धरणार्याि दिंडीतील महिला
सनातन-निर्मित छत्र्या हाती घेऊन आगळ्यावेगळ्या प्रकारे धर्मप्रसार करणार्याे सनातनच्या साधिका

मान्यवरांची ओजस्वी भाषणे

साधनेचा स्तर वाढला की, हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही ! –  ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

आज जे हिंदूंचा अपमान करत आहेत, हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, तेच आज हिंदूंच्या मंदिरांमध्ये जाऊन देवतांचे दर्शन घेत आहेत. हिंदु राष्ट्र स्थापन झाले की, आतंकवाद नष्ट होऊन जगात शांती नांदेल. हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी साधना हा एकमेव उपाय आहे. साधनेचा स्तर वाढला की, हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही. जेव्हा जेव्हा धर्माचे कार्य असेल, तेव्हा तेव्हा हिंदूंनी एकत्र यायला हवे. काश्मीरमधील हिंदूंना त्रास झाला, तर मुंबईतील हिंदूंनी संघटित व्हायला हवे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे समस्त हिंदू ऋणी आहेत ! – सतीश कोचरेकर, हिंदु जनजागृती समिती

नाटके, चित्रपट, विज्ञापने यांतून देवतांचे आणि धर्माचे होणारे विडंबन रोखण्याविषयीचा दिलेला प्रथम विचार परात्पर गुरु डॉ. आठवले यांचाच आहे.  लव्ह जिहाद, तसेच सर्वत्रच्या हिंदूंवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध सडेतोड विचार मांडणारे आणि हिंदूंना त्यांच्या हक्काच्या ‘हिंदु राष्ट्राची’ उद्घोषणा करणारे अन् त्यासाठी अहोरात्र कार्यरत असणारे परात्पर गुरु हे एकमेवाद्वितीय आहेत.

हिंदु राष्ट्राची स्थापना हेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ध्येय ! – दीप्तेश पाटील

जोपर्यंत हिंदु राष्ट्र येत नाही, तोपर्यंत आपल्याला तळमळीने कार्यरत रहायचे आहे. हिंदूचे व्यापक संघटन उभे करून हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हे गुरुदेवांचे ध्येय आहे आणि लवकरच तेे प्रत्यक्षात साकारही होणार आहे; मात्र आपली साधना म्हणून आपणही या महान कार्यात सहभागी होऊन जीवनात परिपूर्णता आणूया.

हिंदू एकता दिंडी यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य करणारे धर्मनिष्ठ

श्री  विजय जैन, श्री.  नितीन कोलगे, अधिवक्ता सूर्यवंशी, श्री. महेश पेडणेकर, चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री. संजय ठाकूर, शिवसेना उपशाखाप्रमुख; सावंत ज्वेलर्सचे श्री. राजेंद्र सावंत यांनी दिंडीत सहभागी झालेल्यांना विनामूल्य सरबत वाटप केले. ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाणे आणि भोईवाडा पोलीस ठाणे यांचे वाहतूक प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले. अधिवक्ता सूर्यवंशी यांनी राजर्षी शाहू विद्यालय, करीरोड येथील एक वर्ग उपलब्ध करून दिला. मुंबई नागरिक को.ऑ.सो. क्रेडीट लि. मुंबईचे श्री. शांताराम तुपे यांनी पाणी व्यवस्था केली.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

पुष्कळ छान दिंडी आहे. हिंदु जनजागृती समितीने असेच मोठे कार्यक्रम घेत रहावे आणि त्यांमध्ये आम्हालाही सहभागी करून घ्यावे. भारताला लवकरच हिंदु राष्ट्र घोषित करावे, अशी आमची इच्छा आहे. – सर्वश्री किशोर गोहिल आणि प्रवीण राठोड, श्री योग वेदांत समिती

भारतमाता चौकात दिंडीची सांगता एका भव्य सभेत झाल्यानंतर स्फुलिंग चेतवणारी भाषणे ऐकतांना धर्माभिमानी

हिंदू एकता दिंडीत सहभागी झालेले मान्यवर

करीरोड सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे श्री. नाना फाटक, मालाड येथील व्यवसायिक श्री. तुषार वंजारे, ह.भ.प. आदेश महाराज रिंगे, तेजूकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विश्‍वस्त श्री. नामदेव हुले, अध्यक्ष श्री. अवधूत तावडे, खजिनदार श्री. सुभाष  सणस, सल्लागार श्री. विजय वारंग, धर्मप्रेमी श्री. नितीन मयेकर आणि सौ. सुवर्णा मयेकर, परळ येथील श्री. नितीन कोलगे, भांडूप येथील श्री. ठोंबरेगुरुजी, हिंदु एकता संघटना, नवी मुंबईचे अध्यक्ष श्री. राकेश म्हात्रे

परशुराम क्रीडा मंडळ, काळाचौकीचे पदाधिकारी श्री. विनायक देवरे हे त्यांच्यासमवेत १५ धर्मनिष्ठांंना घेऊन दिंडीत सहभागी झाले होते.

श्रीराम गणेश मंदिर, धारावीचे विश्‍वस्त श्री. कांतीभाई पटेल हे त्यांच्यासमवेत ८ धर्मनिष्ठांना घेऊन दिंडीत सहभागी झाले होते.

‘नॅब वर्कशॉप फॉर द ब्लाइंड’ या संस्थेचे ६ दृष्टीहीन विद्यार्थी दिंडीत उत्साहाने सहभागी झाले होते.

असे झाले हिंदू एकता दिंडीचे स्वागत

१. ग्रीनफिल्ड सोसायटी आणि रायगड संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने ना.म. जोशी मार्ग येथे प्रखर धर्मप्रेमी श्री. राजेंद्र सावंत यांनी धर्मध्वज आणि पालख्या यांचे पूजन केले.

२. करीरोड सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने करीरोड पूल येथे पाच सुवासिनींनी धर्मध्वज आणि पालख्या यांचे पूजन, तसेच औक्षण केले. या वेळी दिंडीवर पुष्पवृष्टीही करण्यात आली.

हिंदू एकता दिंडीत सहभागी हिंदूंकडून देण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घोषणा

१. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !

२. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो !

३. हिंदू एकजुटीचा विजय असो !

४. जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम !

५. भारतमातेचा विजय असो !

६. सर्व संतांचा विजय असो !

७. वन्दे मातरम् !

वैशिष्ट्यपूर्ण घटना आणि क्षणचित्रे

१. उपस्थितांनी हाती धरलेले आणि वार्‍याच्या झोताने फडकणारे भगवे ध्वज जणू चैतन्याची पखरण करत होते.

२. दिंडीमार्गावरील बसमधून जाणारे काही प्रवासी दिंडी पाहून हात जोडून नमस्कार करत होते.

३. भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाच्या ‘यदा यदाही धर्मस्य…’ या श्‍लोकाचे ध्वनीक्षेपकावरून प्रक्षेपण होताच दिंडीतील उपस्थित धर्माभिमान्यांची भावजागृती झाली.

४. दिंडी पहाणारे अनेक जण आपसूकच आपल्या भ्रमणभाष संचाचा वापर करून छायाचित्रे टिपत होते, तर काही जण उत्स्फूर्तपणे ‘व्हिडिओ’ बनवत होते.

५. दर्यावीर संघटनेच्या कु. स्वरांजली वैद्य आणि कु. समृद्धी वैद्य या १० वर्षांच्या  मुलींनी दिंडीमध्ये स्वतःहून लाठीकाठीची प्रात्यक्षिके करून दाखवली.

६. श्री. जयप्रकाश राणे हे ६९ वर्षांचे गृहस्थ चालतांना त्रास होत असूनही दिंडीत सहभागी झाले.

७. दिंडीमार्गातील इमारती, चाळी, दुकाने, रेल्वे स्थानक इत्यादींमधून लोक बाहेर येऊन दिंडी पहात होते.

Related Tags

सनातन संस्थाहिंदु जनजागृती समितीहिंदु राष्ट्र जागृती अभियान

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​