सनातनला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून चर्चा करणे अयोग्य : सुनील घनवट

हिंदुत्वनिष्ठ वैभव राऊत यांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केल्याचे प्रकरण : ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्र

मुंबई : गृहमंत्र्यांनी सद्य:स्थितीची संतुलित माहिती देऊनही उपस्थित मान्यवर न्यायाधिशाच्या भूमिकेत जाऊन सनातन संस्थेला आरोपीच्या पिंजर्‍यामध्ये उभे करत आहेत, हे अत्यंत अयोग्य आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर हिंदुत्वनिष्ठ दोषी आहेत, असे जेव्हा सिद्ध होईल, तेव्हाच हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधात बोलायला हवे. मुसलमान आतंकवादी म्हणून सापडतात, त्याविषयी कोणी निषेध नोंदवत नाही. यावरून हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य करायचे आहे, असेच दिसते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. या कार्यक्रमामध्ये गृहराज्यमंत्री श्री. दीपक केसरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलीक, माजी आयपीएस् अधिकारी सुधाकर सुराडकर, शिवप्रतिष्ठानचे प्रवक्ता श्री. नितीन चौगुले, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट सहभागी झाले होते. या वेळी मांडलेल्या सनातन आणि हिंदुत्व विरोधी विचारांचे खंडण श्री. सुनील घनवट यांनी स्पष्टपणे केले.

श्री. घनवट यांनी मांडलेली सूत्रे

१. ‘सनातनला गोवण्याच्या हेतूनेच मडगाव बॉम्बस्फोटामध्ये अटक केलेल्या कार्यकर्त्यांवर ‘एफ्आयआर्’ प्रविष्ट करण्यात आला होता’, असे न्यायाधिशांनी सांगितले आहे, असा पूर्वीच्या प्रकरणातील अनुभव आहे.

२. सुधाकर चतुर्वेदी यांच्या घरी एटीएस्ने आर्डीएक्स ठेवलेले होते. एन्आयए सांगत आहे की, पोलीस चुकीच्या गोष्टी करतात. अन्य धर्मियांच्या संदर्भात अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर मात्र नवाब मलिक बोलण्याचे धाडस करत नाहीत.

३. पानसरे आणि दाभोलकर प्रकरणी ‘ट्रायल चालवा’, असे सांगूनही चालवली जात नाही. हिंदुत्वनिष्ठांवर अन्यायच करायचा का ?

गृहराज्यमंत्र्यांनाही खोचक प्रश्‍न विचारणारे डॉ. उदय निरगुडकर !

‘नालासोपारा येथे वैभव राऊत यांची अटक आणि त्यांच्या घरी सापडलेले साहित्य ही एटीएस्ने केलेली प्राथमिक तपासणी आहे. सर्व तपास पूर्ण झाल्यानंतरच ही घटना कोणता उद्देश ठेवून, कोणत्या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे, हे सांगता येईल. आताच कोणत्याही निष्कर्षापर्यंत जाता येणार नाही. आम्ही कधीच असे म्हटले नाही की, आम्ही कोणत्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे. आम्ही ३ व्यक्तींना अटक केलेली आहे, असे म्हटले आहे. आरोपी मिळाला नाही, तर आपण निष्कर्षाप्रत पोहचू नये, अशी विनंती आहे.’ या शब्दांत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी स्वतःची भूमिका आरंभी पूर्णतः स्पष्ट करूनही चर्चासत्राचे निवेदक डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांना पुढील खोचक प्रश्‍न विचारले – ‘सरकार हिंदुत्वनिष्ठ असल्यामुळे या संघटनांना अभय देणार का ?’, ‘तुम्ही कोणत्या संघटनेच्या सक्रीय कार्यकर्त्याला अटक केली आहे ?’, ‘यांचा दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येशी संबंध आहे का ? येथपर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत का ?’, ‘यांचा तीन गावांमध्ये घातपात करण्याचा कट होता का ?’ (वस्तुनिष्ठ माहिती समाजापर्यंत पोहोचावी, हा पत्रकारितेचा हेतू यातून साध्य होतो का, असा प्रश्‍न यामुळे पडतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) वस्तुस्थिती त्रयस्थपणे मांडण्याऐवजी हिंदुत्वनिष्ठांचाच या प्रकरणामध्ये हात असणार आणि त्यातही सनातन संस्थेचा हात आहे, असे गृहीत धरून वाहिनीचे निवेदक डॉ. उदय निरगुडकर कार्यक्रमात बोलत होते.

डॉ. उदय निरगुडकर यांची उपहासात्मक विधाने !

१. डॉ. उदय निरगुडकर म्हणाले, ‘‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या पदाधिकार्‍याला साधनाविषयक साहित्यासह नव्हे, तर बॉम्ब सिद्ध करण्याच्या साहित्यासह पकडले आहे.’’

२. ‘नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीच्या संघटनेचे श्रीरामपूर येथील कार्यकर्ते जर्मन बॉम्बस्फोटात सापडले आहेत, याविषयी बोलावे’, असे सूत्र श्री. घनवट यांनी परखडपणे मांडल्यावर डॉ. निरगुडकर यांनी उपहासाने ‘जर्मन बॉम्बस्फोट आणि मडगाव बॉम्बस्फोट अशी स्पर्धा आहे का ?’, असे विचारून श्री. सुनील घनवट यांना गप्प करण्याचा प्रयत्न डॉ. निरगुडकर यांनी केला.

नवाब मलीक यांची नेहमीची गरळओक !

(म्हणे) ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सनातन संस्था धर्माच्या नावावर तरुणांना भडकवून कृती करायला लावतात !’

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सनातन संस्था या संघटना धर्माच्या नावावर तरुणांना भडकवून त्यांना टोकाच्या कृती करायला लावतात. हे या संघटनांचेच कटकारस्थान आहे. (न्यायाधिशाच्या भूमिकेत गेलेल्या मलिक यांनी रझा अकादमी, सिमी, जमियत-ए-इस्लामी या संघटनांच्या आतंकवादी कारवायांविषयी बोलावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) सनातन संस्थेचे सनातन प्रभात हे वर्तमानपत्र सांगली येथून निघते आणि भिडेगुरुजी यांच्याशी असलेली त्यांची जवळीक यावरून या संघटना आतून एकच आहेत आणि केवळ नाव पालटून कार्य करत आहेत, असे लक्षात येते.

अन्य सूत्रे

१. श्री. सुनील घनवट यांचा आवाज व्यवस्थित ऐकू येत नव्हता, त्यामुळे हिंदुत्वाची बाजू समाजापर्यंत पोहोचतांना मात्र अडचण येत होती.

२. ‘सुधाकर चतुर्वेदी यांच्या घरी स्फोटके कोणी ठेवली, याचे उत्तर द्या’, असा प्रश्‍न श्री. घनवट यांनी विचारल्यावर माजी पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर चिडून ‘मी केवळ याच (सध्याच्या) विषयावर बोलणार’, असे म्हणाले.

३. ‘सनातन संस्थेच्या गोवा येथील आश्रमातील अनेक गोष्टींपर्यंत जाण्यात बाहेरच्या लोकांवर प्रचंड निर्बंध आहेत, असे बोलले जाते’, असे विधान आरंभीच्या वृत्तांकनात करण्यात आले. (एखाद्या गोष्टीविषयी नीट माहिती नसतांना अपूर्ण माहितीच्या आधारे वृत्तांकन केल्याने हसे होते, हेही लक्षात येत नाही का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

‘न्यूज १८ लोकमत’ वाहिनीवरील हिंदुद्वेषी आणि लोकांच्या भावना भडकवणार्‍या तळपट्ट्या अन् विधाने अशा प्रकारे अतिरंजित वृत्तांकन करणारी पीत पत्रकारिता लोकशाहीला कलंकच !

‘हिंदुत्ववाद्यांची बॉम्ब फॅक्टरी’, ‘नालासोपार्‍यामध्ये स्फोटके जप्त झाल्यानंतर महाराष्ट्र हादरून गेला आहे’, ‘देशाला हादरवून टाकणारी घटना’, ‘वैभव राऊतच्या घरी जणू बॉम्बची फॅक्टरीच होती’, ‘ही घटना देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेसाठीचा मोठा धोका आहे’, अशा तळपट्ट्या आणि विधाने दाखवल्या. या वाहिनीवरून चर्चासत्राच्या वेळी दाखवण्यात येत होत्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

दूरचित्रवाणी कार्यक्रमसनातन संस्थाहिंदु जनजागृती समितीहिंदु विराेधीहिंदूंचा विरोध

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​