आगामी भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सिद्धता करा !

‘आगामी महाविनाशकारी तिसरे विश्‍वयुद्ध आणि रक्षणाचे उपाय’ यांविषयी जागृती

१. तिसर्‍या वैश्‍विक युद्धाची नांदी !

सध्या जागतिक स्तरावर चाललेल्या घडामोडी पहाता सगळीकडे अस्थिरता आणि असहिष्णुता वाढत चालल्याचे दिसत आहे. एकीकडे वर्चस्ववाद, तर दुसरीकडे अन्न आणि स्वच्छ पाणी यांची न्यूनता अशी दुहेरी संकटे दिसत आहेत. त्यातच नैसर्गिक आपत्तींनी थैमान घातले आहे. यापूर्वीच्या अस्थिरतेची आणि वर्चस्ववादाची परिणती ही पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धांत झाली होती. आताच्या अस्थिरतेची परिणतीही तिसर्‍या महायुद्धात होण्याची शक्यता जागतिक स्तरावरील विचारवंत व्यक्त करत आहेत. याविषयी अनेकांचे इतके ठाम मत आहे की, तिसरे महायुद्ध अटळ आहे, केवळ कधी आणि कुठे एवढाच निर्णय व्हायचा आहे. लिओ ट्रॉटस्की हा रशियन विचारवंत म्हणतो, ‘‘तुम्हाला भलेही युद्ध नको असेल; मात्र युद्धाला तुम्ही (बळी म्हणून) हवे असता.’’

१ अ. रशिया आणि अमेरिका यांतील वाढता दुरावा : आपणही जागतिक राजकीय स्थितीचा आढावा घेतल्यास लक्षात येते की, रशिया आणि अमेरिका यांतील शीतयुद्ध संपले असले, तरी त्यांच्यातील दुरावा वाढत चालल्याचे दिसत आहे.

१ आ. चीनचा विस्तारवाद : चीनचा साम्राज्यविस्ताराचा आणि जागतिक महासत्ता बनण्याचा आटापिटा तर आपण नियमितपणे वाचत आहोत. अमेरिका चीनचा विस्तारवाद रोखण्यासाठी दक्षिण चिनी सागरात नियमित आपली विमाने आणि लढाऊ जहाजे पाठवत आहे. त्यामुळेही चीन संतापलेला आहे. तिबेट गिळंकृत केल्यावर चीनचे आता डोकलाम आणि अरुणाचल प्रदेशाचा काही भाग बळकावण्याचे प्रयत्न उघड झाले आहेत. चीनच्या संदर्भात बोलतांना नेपोलियनने म्हटले होते की, ‘चीन नावाच्या प्रचंड अजगराला झोपू द्या. तो जागा झाला, तर संपूर्ण जगाला विळखा घालेल.’ नेपोलियनसारख्या योद्ध्याने ज्या चीनविषयी भीती व्यक्त केली होती, तो अजगर जागा झाला आहे. १९६२ च्या युद्धात भारताने चीनकडून झालेल्या विश्‍वासघाताचा अनुभव घेतला आहे.

१ इ. उत्तर कोरियाची अण्वस्त्रसज्जता : अण्वस्त्रसज्ज असणार्‍या उत्तर कोरियाच्या किम जोंग-उन या शीघ्रकोपी लष्करशहाच्या वर्तणुकीची कोणीही खात्री देऊ शकत नाही.

१ ई. ‘जिहाद’ नावाचा भस्मासुर : दुसर्‍या महायुद्धानंतर पुन्हा युद्ध नको; म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली; मात्र तरीही युद्धे थांबली नाहीतच, उलट अनेक देशांत शांततेचे प्रयत्न चालू असतांना ‘जिहाद’ नावाच्या भस्मासुराने युद्धापेक्षाही अधिक बळी घेतलेले आहेत. इस्रायल आणि त्याची सभोवतालची मुस्लिम राष्ट्रे यांत सतत होणारा संघर्ष वाढत आहे. पाकिस्तान आणि अन्य इस्लामी राष्ट्रे यांच्यातील वाढते आतंकवादी संघटनांचे प्राबल्य हे जगाला संकटात टाकणारे आहे. भारताने तर पाकिस्तानसह प्रत्यक्ष युद्धे केली आहेत. त्यासह भारतातील आंतकवादी कारवायांतही पाकिस्तानचा सहभाग उघड झालेला आहे.

इसिसने सिरीयात केलेल्या नृशंस हत्यांचे प्रतिकात्मक चित्र

१ उ. ‘इस्लामिक स्टेट’ आणि सिरीयातील युद्धजन्य परिस्थिती : ‘इस्लामिक स्टेट’ (इसिस) सारखी आतंकवादी संघटना अद्यापही तेलसाठ्यांतून अब्जावधी रुपये कमावत आहे. त्या धनाच्या आधारे शक्ती वाढवण्याचे आणि मनुष्यबळ, तसेच शस्त्रास्त्रे गोळा करण्याचे त्यांचे कार्य चालू आहे. इसिसच्या विरोधात सिरीयातील असद सरकारला रशिया साहाय्य करत आहे, तर सिरीयातील असद सरकारवर रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याचा आरोप करून अमेरिका आक्रमणे करत आहे.

इसिसच्या आक्रमणाच्या नावाखाली इस्लामी राष्ट्रांतील नागरिकांनी युरोपातील अनेक देशांत आश्रय घेतला असून तेथे त्यांच्याकडून चालू असलेल्या कारवायांमुळे त्या देशांतील नागरिक त्रस्त झाले आहेत. यांतील महत्त्वाचा भाग म्हणजे नागरिकांच्या मृत्यूच्या भयाने अनेक राष्ट्रे युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतात; मात्र जिहादी आतंकवाद्यांना मृत्यूचे भय नसून ते जन्नत (स्वर्ग) मिळण्यासाठी, मरणाला कवटाळण्यासाठीच लढत असल्याने युद्ध नको असलेल्यांच्या अहिंसेच्या विचारांना कोणतेही महत्त्व रहात नाही. ही सर्व स्थिती ‘आपण तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत’, हे स्पष्ट करत आहे.

२. आगामी भीषण आपत्काळ

२ अ. मानवनिर्मित प्रलय निकट येणे : शास्त्रज्ञांनाही या स्थितीची जाणीव होत असून जानेवारी २०१८ मध्येच मानवनिर्मित प्रलयाचे सूचक मानले जाणार्‍या ‘डूम्स डे घड्याळा’ची वेळ २ मिनिटांनी पुढे ढकलण्यात आल्याचे अणु संशोधकांच्या वार्तापत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे; म्हणजेच मानवनिर्मित प्रलयाचा काळ निकट आल्याची त्यांनी सूचना केली आहे.

हवाई (अमेरिका) येथे ज्वालामुखीच्या भक्ष्यस्थानी पडलेले घर

२ आ. नैसर्गिक प्रलयांत वाढ : एकीकडे या मानवी प्रलयाची सूचना केली जात असतांनाच नैसर्गिक प्रलयांचाही प्रकोप आपल्याला पहायला मिळत आहे. त्सुनामी, वादळे, ज्वालामुखीचे विस्फोट, भूकंप, पूर यांतही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. या प्रलयांमुळे मानव आणि मालमत्ता दोघांचीही प्रचंड हानी झालेली आहे.

३. आध्यात्मिक कारण

ही सर्व पालटणारी स्थिती आपण अनुभवत असलो, तरी त्यामागील खरे कारण समजण्यासाठी केवळ मन-बुद्धीच्या स्तरावर अभ्यास करून चालणार नाही. त्यामुळे सनातन संस्थेने आध्यात्मिक स्तरावर, म्हणजेच सूक्ष्म स्तरावर चालू असणार्‍या घडामोडींचा अभ्यास चालू केला आहे. वातावरण, पशु, वनस्पती, मनुष्य यांच्यातील पालटांचा सूक्ष्म स्तरावर अभ्यास केला जात आहे. त्यातून लक्षात आले की, सत्त्व-रज-तम या तीन मूलभूत त्रिगुणांचा समतोल ढासळत असून त्यांच्या प्रमाणात पालट होत आहे. वातावरणातील सत्त्वगुणाच्या तुलनेत रज आणि तम या कनिष्ठ गुणांचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण सृष्टीवरच त्याचा परिणाम होत आहे. इतकेच नव्हे; तर वातावरणातील नकारात्मक शक्तीही त्याचा लाभ घेऊन आक्रमणे करत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या सृष्टीच्या निर्मितीतील मूळ पंचमहाभुतांवर या रज-तमाचा परिणाम होऊन नैसर्गिक आपत्तींत वाढ होत आहे.

३ अ. समष्टी कर्मफलन्याय आणि प्रारब्ध : मानवाच्या चांगल्या-वाईट कर्मांचा परिणाम त्याला प्रारब्धाच्या रूपाने भोगावा लागतो, तसाच समष्टीच्या स्तरावरील वाईट कर्मांचा परिणाम म्हणूनही त्याला या आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. सध्याच्या युगात मानवाचे ६५ टक्के जीवन त्याच्या प्रारब्धानुसार आणि ३५ टक्के क्रियमाण कर्मानुसार आहे. तसेच समाज, धर्म आणि राष्ट्र यांचेही समष्टी प्रारब्ध मानण्यात आले आहे. समाजातील आध्यात्मिक अपवित्रता वाढल्याने वर्ष २०१३ ते २०२३ या कालावधीत मनुष्यजातीला तीव्र समष्टी प्रारब्ध भोगावे लागणार आहे. या काळात नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढून त्या एका मानवाला दुसर्‍या मानवाच्या विरोधात लढण्यास भाग पाडणार आहेत. परिणामी हा काळ अधिक संघर्षाचा असून उत्पत्ती (निर्मिती)-स्थिती-लय (विनाश) या कालचक्राप्रमाणे त्यात रज-तम गुणांनी युक्त असणार्‍या अधिकाधिक मनुष्यांची हानी होऊन वातावरणाचे एकप्रकारे शुद्धीकरणच होणार आहे. अनेक भविष्यवेत्त्यांनीही या काळाचा आपल्या भविष्यवाणीत उल्लेख केलेला आहे.

४. महायुद्धाचा परिणाम

या तिसर्‍या महायुद्धात मानवाने शोधलेल्या महाभयंकर आधुनिक शस्त्रास्त्रांंचा किंवा अणुबॉम्बचा वापर होण्याची शक्यता असल्याने होणारा नरसंहारही मोठ्या प्रमाणात होणार आहे. आजच्या सर्व आधुनिक सुखसोयी आणि सुविधाही त्यात नष्ट होतील. त्या काळात अन्न-धान्य, पाणी, तसेच औषधांचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होईल.

आपत्काळात रक्षणाची उपाययोजना

या सर्व स्थितीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने आपली सिद्धता करायला हवी. आपल्या सभोवतालचे वातावरण शुद्ध करण्यासाठी अग्निहोत्र करणे, आवश्यक आयुर्वेदिक औषधांची घरातच लागवड करणे, अनावश्यक खर्च टाळून बचत करणे, अशा काही स्थुलातील उपाययोजना आपण करू शकतो. त्यासह या महायुद्धाचे एक कारण म्हणजे समष्टी कर्म आणि प्रारब्ध आहे. त्यापासून रक्षण होण्यासाठी आपल्याला भगवंतालाच शरण गेले पाहिजे. त्याची कृपाच या आपत्काळापासून आपले रक्षण करू शकते. त्यासाठी नियमित साधना करणे आवश्यक आहे.

‘सर्वांना या आपत्काळापासून रक्षण होण्यासाठी साधना करण्याची प्रेरणा मिळो’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !