काँग्रेसने हिंदु आतंकवाद सिद्ध करण्यासाठी सर्वसामान्य हिंदु तरुण आणि सैन्यातील पदाधिकारी यांचा बळी दिला ! – अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

झी २४ तास वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात सनातन संस्थेचा सहभाग

चर्चासत्रात सहभागी झालेले डावीकडून श्री. अभय वर्तक आणि बाजूला अधिवक्ता रामेश्‍वर गीते

मुंबई : ले. कर्नल पुरोहित यांनी काश्मीरमध्ये अनेक आतंकवाद्यांना ठार केले. अनेक वेळा ते घायाळ झाले, तरी त्यांनी विनंती केली की त्यांना सैन्यात कार्यरत रहायचे आहे. इतक्या चांगल्या अधिकार्‍याला अन्वेषण अधिकार्‍यांनी खोटे-नाटे षड्यंत्र रचून ९ वर्षे ६ महिने आरोपांची निश्‍चिती न करता कारागृहात डांबून ठेवले. त्यांना जामीनही मिळू दिला नाही. हा सर्वांत मोठा अन्याय आहे. त्यांना जामीन मिळाला, हा एक दिलासा आहे. केवळ ले. कर्नल पुरोहितच नाही, तर सुधाकर चतुर्वेदी, राकेश धावडे, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी आणि शंकराचार्य या सर्वांवर अन्याय झाला आहे. काँग्रेसने हिंदु आतंकवाद सिद्ध करण्यासाठी सर्वसामान्य हिंदु तरुणांचा आणि सैन्यातील पदाधिकार्‍यांचा बळी दिला. दुर्दैवाने याचा पाकिस्तानच्या आयएस्आय या गुप्तचर यंत्रणेने अपलाभ घेतला. पाकिस्तानने या खटल्यात भारतीय सैन्यातील अधिकारी नाहक अडकल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचा रहिवासी असलेला आणि सध्या फरार असलेला मुझम मील याचा या स्फोटांमागे हात असू शकतो, हे उघड असतांना काँग्रेसने केवळ भगव्या आतंकवादासाठी हे षड्यंत्र रचले, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. मालेगाव बॉम्बस्फोट २००८ प्रकरणातील आरोपी ले. कर्नल पुरोहित यांना नुकताच सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. याच्या पार्श्‍वभूमीवर ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीवर २१ ऑगस्ट या दिवशी ‘रोखठोक’ या कार्यक्रमात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी श्री. अभय वर्तक यांच्यासह साध्वी प्रज्ञासिंह यांचे वकीलपत्र घेतलेले अधिवक्ता रामेश्‍वर गीते, माजी आयपीएस् अधिकारी पी.के.जैन, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई आणि भाजपचे प्रवक्ता केशव उपाध्ये उपस्थित होते. सूत्रसंचालन वाहिनीचे संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी केले.

श्री. अभय वर्तक पुढे म्हणाले, “हिंदु आतंकवादाच्या नावाखाली ज्या निरपराध्यांना कारागृहात डांबले आहे, त्यांना जामीन मिळायला हवा; परंतु त्यासाठी खटला चालणे हा महत्त्वाचा आणि पहिला टप्पा आहे. ९ वर्षे ले. कर्नल पुरोहित यांना जामीन मिळाला नाही. याला संबंधित पोलीस अधिकारी आणि शासन उत्तरदायी आहे. हिंदु आतंकवाद सिद्ध करण्यासाठी अरुण खानविलकर यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकांनी कट रचला. पुढे ७० लाख रुपयांची लाच घेतांना त्यांना पकडण्यात आले.”

काँग्रेस सरकारच्या दबावामुळेच आरोपींवर ओढूनताणून मोक्का लावण्यात आला ! – पी. के. जैन, माजी आयपीएस् अधिकारी

या प्रकरणात राजकारण झाले असून आरोपींना जामीन मिळू नये, यासाठीच ओढूनताणून मोक्का लावण्यात आला. काँग्रेस सरकारच्या दबावामुळे ९ वर्षे आरोपींना जामीन मिळू शकलेला नाही. वर्ष २००६ मधील मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणातही मूळ आरोपींना बाजूला ठेऊन दुसर्‍यांनीच स्फोट घडवला, अशी ‘थेअरी’ पुढे करण्यात आली. एटीएस् आणि सीबीआय यांच्याकडून हे प्रकरण एन्आयए कडे गेल्यानंतर ही गोष्ट पुढे आली. पोलिसांच्या बर्‍याचशा बैठकांमध्ये ‘ठराविक जणांवर आरोप ठेवण्यात यावेत’, अशा सूचना काँग्रेस सरकारकडून देण्यात आली होती. हे प्रकरण भगवा आतंकवाद म्हणून पुढे आणले. सरकारला खटला लांबवायचा असल्याने सरकारी अधिवक्त्यांनी आरोपपत्र प्रविष्ट करण्यास किंवा खटला चालू करण्यात न्यायालयाला विनंती केली नाही. अशी स्थिती देशाला पोषक नाही.

काँग्रेसने केवळ हिंदुत्वनिष्ठ विचारधारेला अपकीर्त करण्यासाठीच हिंदु आतंकवादाचा कट रचला ! – केशव उपाध्ये, प्रवक्ता भाजप

घटनेप्रमाणे, न्यायाप्रमाणे जो दोषी असतील त्यांना शिक्षा होईल; मात्र जो निर्दोष असेल त्याला शिक्षा होता कामा नये. अन्वेषणात कोणताही हस्तक्षेप करायचा नाही, ही भाजप सरकारची भूमिका आहे. वर्ष २००६ च्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणातून ८ आरोपी सुटले ते भाजपच्याच सत्ताकाळात सुटले; मात्र त्या वेळी ‘सरकार अशी भूमिका का घेत आहे’, असा प्रश्‍न उपस्थित झाला नाही. वर्ष २००८ ते २०१४ या काळात केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार असतांना सुशीलकुमार शिंदे आणि चिदंबरम् यांनी या घटनेला ‘भगवा आतंकवाद’ असे नाव दिले आणि हा विषय गंभीर असल्याचे भासवले. असे असतांना काँग्रेसला या प्रकरणाच्या अन्वेषणात प्रगती का करावीशी वाटली नाही ? या प्रकरणात आणलेले साक्षीदार फुटले आणि त्यांची बळजोरीने साक्ष घेतल्याचे पुढे आले. अशाप्रकारे काँग्रेसने केवळ हिंदुत्वनिष्ठ विचारधारेला अपकीर्त करण्यासाठीच हिंदु आतंकवादाचा कट रचला. आज पत्त्यांचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे न्यायालयात हे षड्यंत्र उघड होत आहे. या प्रकरणातील धावडे या आरोपीला कह्यात घेऊन केवळ २ घंट्यांमध्ये त्याच्यावर आरोपपत्र प्रविष्ट करण्यात येऊन मोक्का लावण्यात आला, तर दुसरीकडे ६ वर्षे अन्वेषणात काही प्रगती होत नाही. हे हास्यास्पद असून काँग्रेसचे जाणीवपूर्वक ठरवून केलेल कारस्थान होते.

सर्वोच्च न्यायालयाने जामीन देणे हा गुणवत्तेवर आधारित निर्णय ! – अधिवक्ता रामेश्‍वर गीते

सर्वोच्च न्यायालयाने जामीन देण्याचा निर्णय गुणवत्तेवर दिला आहे. आपल्याकडे असे अनेक न्यायनिवाडे आहेत की ज्यात अनेक वर्ष कारागृहात असणार्‍यांना जामीन दिला जातो. ले. कर्नल पुरोहित या खटल्यात निर्दोषही सुटू शकतात; परंतु आपण आताच ते दोषी असल्याचे मानून चर्चा करत आहोत.

(म्हणे) सैन्यातील अधिकारी बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात असणे, हे गंभीर ! – हुसेन दलवाई, खासदार, काँग्रेस

ले. कर्नल पुरोहित यांच्यावर असीमानंद यांनी आरोप केले आहेत. कारागृहात एकाचा ‘एन्काऊन्टर’ झाल्यानंतर असीमानंद यांना नैतिकतेची जाणीव झाली आणि त्यांनी साक्ष दिली. (कॉग्रेसने केवळ हिंदुद्वेषापोटी निरपराध हिंदूंचा आणि ले. कर्नल पुरोहित यांच्यासारख्या देशभक्त सैन्याधिकार्‍याचा छळ केला, याचे भान दलवाई यांना आहे का ? स्वार्थासाठी इतरांवर अन्याय करणार्‍या काँग्रेसवाल्याना नैतिकता हा शब्द उच्चारण्याचा तरी काय अधिकार आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यामुळे एटीएस्चा तपास चांगला झाला. आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे हे प्रामाणिक अधिकारी होते. त्यांनी मला यासंदर्भात बर्‍याच गोष्टी सांगितल्या होत्या. (काँग्रेस सरकार सांगेल त्या दिशेने एटीएस्ने अन्वेषण केले, हे उघड होत असतांना दलवाई यांचा सत्य झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पुरोहित यांनी ते स्वत:च अभिनव भारतमध्ये असल्याचे म्हटले होते. त्यांच्यावर ६० किलो आर्डीएक्स आणल्याचे आरोप आहेत. सैन्यातील अधिकारी अशा प्रकरणात असणे हे गंभीर आहे. (केवळ आरोप असले म्हणून कुणी दोषी ठरते का ? आरोप सिद्ध करण्यासाठी न्यायालयीन यंत्रणा असतांना पुरोहित यांना गुन्हेगार ठरवण्याचा अधिकार दलवाई यांना कुणी दिला ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पोलीस यंत्रणा सरकारच्या हाती गेली आहे. सीबीआय आणि एन्आयए  यांचा वापर होत आहे हेसुद्धा अतिशय गंभीर आहे. (काँग्रेसनेच सत्तेच्या लोभापायी आणि हिंदुद्वेषाचा कंड शमवून घेण्यासाठी अन्वेषण यंत्रणांचा वापर केला, हे सर्वज्ञात आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) खटल्यामध्ये जो वेळ गेला, तो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये गेला. कोणत्या खटल्याचा निकाल लवकर लागतो ? उशीर लागण्याचे हे पहिलेच उदाहरण नाही.

देशाच्या जडणघडणीत स्वातंत्र्यवीर सावकर यांचे योगदान नाकारणारे सावरकरद्वेषी हुसेन दलवाई

चर्चासत्राच्या वेळी दलवाई यांनी, ‘हा देश गांधींचा असून त्यांच्यामुळेच सर्वांना अधिकार आणि लोकशाही मिळाली. हा देश सावरकर आणि गोळवलकरगुरुजी यांचा नाही’, असे म्हटले. यावर केशव उपाध्ये यांनी ‘हा देश सर्वांचा असून कोणत्या राजकीय पक्षाची ही मालमत्ता नाही’, असे सांगून दलवाई यांना प्रत्युत्तर दिले.

‘हिंदु-मुसलमान आतंकवाद’ असा भेद करत नसल्याचा कांगावा करणारे दलवाई यांचा दुटप्पीपणा उघड

चर्चासत्राच्या वेळी हुसेन दलवाई यांनी हिंदु-मुसलमान आतंकवाद असा भेदभाव करत नसल्याचा कांगावा केला; मात्र त्यांच्याच पक्षातील सुशीलकुमार शिंदे यांनी भगवा आतंकवाद हा शब्द उच्चारल्यावर दलवाई यांनी आक्षेप का घेतला नाही ?, असा प्रश्‍न केशव उपाध्ये यांनी उपस्थित केल्यानंतर दलवाई यांचा ढोंगीपणा आणि निधर्मीपणाचा बुरखा समोर आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related Tags

दूरचित्रवाणी कार्यक्रमसनातन संस्थाहिंदूंच्या समस्या

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​