गोमांस खाण्यावर बंदी घातल्याच्या कारणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्र्यी मनोहर पर्रिकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारं एक पत्र गोवा गृह आणि सामान्य प्रशासनाला प्राप्त झालं आहे. हे पत्र आयसिसनं पाठवल्याचं पत्रात नमूद नमूद करण्यात आलं आहे. गोमांसावर बंदी आणल्यावरून पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांवर या पत्रात तीव्र शब्दात राग व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा गोवा पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक व्ही. रंगनाथन यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली. पोस्टकार्डवर लिहिलेल्या या पत्रात ‘ तुम्ही गायींची कत्तल करण्यावर बंदी आणल्यामुळं आम्ही तुम्हाला ( मोदी आणि पर्रिकर) बघून घेऊ’ अशी धमकी दिल्याची माहितीही रंगनाथन यांनी दिली.
या पत्रात पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री पर्रीकर यांना उद्देशून ‘तुम्ही गोमांस खायला परवानगी देत नाही, त्यामुळे यापुढे तुमची आम्ही व्यवस्थित काळजी घेऊ’ असे पत्रात म्हटलं असल्याचंही ते म्हणाले. हे पत्र स्थानिक ठिकाणाहूनच पोस्ट केल्याची माहितीही त्यांनी दिली.
सध्या हे प्रकरण तपासासाठी दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सुपूर्द करण्यात आलं असून संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना गोव्यातील सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असल्याची माहितीही रंगनाथन यांनी दिलीय.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स