पाकिस्तानात कोणी असो वा नसो भारतात मात्र गुलाम अलींचे (पाकचे) ‘गुलाम’ आहेत ! – सम्पादक, हिन्दू जागृति
ठाणे : शिवसेनेच्या कडव्या विरोधामुळे गेल्या काही दिवसांत एकही कार्यक्रम करू न शकलेले पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या मैफलीचं आयोजन केलं आहे. शिवसेनेनं या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे.
आव्हाड यांच्या ‘संघर्ष’ प्रतिष्ठानच्या वतीनं येत्या ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान ठाणे महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात गुलाम अली यांची मैफलही होणार आहे. दस्तुरखुद्द आव्हाड यांनीच यासंदर्भातील ट्विट केले आहे. गुलाम अली यांनी आमंत्रण स्वीकारले असल्याची माहितीही आव्हाड यांनी दिली आहे. गुलाम अलींच्या या मैफलीला शिवसेनेनं कडाडून विरोध दर्शवला आहे. गुलाम अली यांनी ठाण्यात येण्याची हिंमत दाखवावी आणि आव्हाडांनी त्यांचा कार्यक्रम घेऊन दाखवावा, असे आव्हानच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिलं आहे. ‘आव्हाड यांना प्रसिद्धीची हौस आहे. गुलाम अली यांना आमंत्रण देऊन वाद निर्माण करण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यांना मैफलीच घ्यायचीच होती तर भारतात गझल गायक नव्हते का,’ असा सवाल सरनाईक यांनी केला आहे.
शिवसेनेच्या आव्हानाची आव्हाड यांनी खिल्ली उडवली. ‘पाकिस्तानला शिवसेनेचा विरोध आहे तर तो त्यांनी राजकीय मार्गाने दाखवायला हवा. शिवसेना मोदी सरकारमध्ये आहे. त्यातून त्यांनी बाहेर पडायला हवं,’ असं सुनावतानाच, ‘शिवसेनेला काय करायचं आहे ते करू द्या. सुधींद्र कुलकर्णी यांचा कार्यक्रम जसा झाला, तसा हाही कार्यक्रम करून दाखवू,’ असे प्रतिआव्हान आव्हाड यांनी दिले आहे.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स