पुणे : कसबा पेठेत बॅटरी चोरल्याच्या संशयावरून सावन राठोडला पेटविले असल्याचा दावा केला जात असला, तरी मला नाव विचारून, मी हिंदू असल्याचे समजताच अंगावर पेट्रोल ओतून मला पेटवून दिल्याचा धक्कादायक जबाब सावनने पोलिसांना दिला असून, या जबाबाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या घटनेत ७० टक्के भाजलेल्या सावन राठोड याचा काल सकाळी सहाच्या सुमारास उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला. इब्राहिम मेहबूब शेख, जुबेर तांबोळी, इमरान तांबोळी या तिघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने जुबेर व इमरानला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
गुरुवारी दुपारी ससून रुग्णालयात सावनला उपचारांसाठी दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करून जबाब घेतला. यामध्ये सावनने त्याला कसे पेटविले हे सांगितले आहे. ‘बुधवारी दुपारी काम शोधत असताना मी लघुशंका करत होतो. तेव्हा तेथे तिघेजण आले. त्यांनी मला ‘मला तू काय करत आहेस ?’ असे विचारले, मी लघुशंका करत असल्याचे सांगितले. ‘तुझे नाव काय आहे ?’ असे विचारल्यावर सावन राठोड असे सांगितले. या तिघांनी मला ‘तू हिंदू आहेस का ?’ असे विचारले. मी ‘हो’ म्हणून उत्तर दिले. त्यानंतर या तिघांनी माझ्या अंगावर काहीतरी ओतून काडी लावून दिली. अशी धक्कादायक माहिती सावन याने त्याच्या जबाबात दिली आहे. एका पोलिसाने तुला हिंदू म्हणूनच पेटवले का ? असे विचारले असता त्याने होकारार्थी उत्तर दिले. १ मिनिट १९ सेकंदांच्या व्हिडीओतून ही माहिती उघडकीस आली आहे.
मुसलमान तरुणांनी सावन हा हिंदूच असल्याने त्याला जाळून मारले असल्याचा आरोप करत आरोपींवर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदू बंजारा समाज, सेवाभाया गोर बंजारा युवा प्रतिष्ठानने जिल्हाधिकारी सौरभ राव यांना दिले आहे.
संदर्भ : सामना