अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी काय करावे ?


अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या आवडत्या देवतेचा पाच ते दहा मिनिटे नामजप करावा. बुद्धीची देवता गणपति व विद्येची देवता सरस्वती यांना अभ्यास चांगला होण्यासाठी व लक्षात रहाण्यासाठी `हे विघ्नहर्ता, बुद्धीदाता श्रीगणेशा व श्री सरस्वतीदेवी, माझ्या अभ्यासात येणारे अडथळे दूर होऊ देत. माझा अभ्यास चांगला होण्यासाठी तू मला सुबुद्धी व शक्‍ती दे.' अशी प्रार्थना करावी. रोज एका विशिष्ट जागी अभ्यासासाठी बसणे जास्त योग्य होय. मन व शरीर ताजेतवाने असतांना अवघड वाटणार्‍या विषयांचा अभ्यास विशिष्ट वेळीच करणे योग्य ठरते. अभ्यासाला बसण्याच्या जागी उदबत्ती लावल्यास वातावरण चांगले होण्यास मदत होते. पुरेसा उजेड असलेली व शक्यतो इतर आवाज ऐकू येत नसतील, अशा ठिकाणी अभ्यासाची जागा निवडावी. अभ्यास पूर्ण झाल्यावर गणपति व सरस्वती यांच्या चरणी एकाग्रतेने अभ्यास करून घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करावी.

संदर्भ : सनातन-निर्मित-ग्रंथ ' अभ्यास कसा करावा? '

ध्यान-धारणेमुळे मेंदूचा विकास होतो, हे संशोधनाने सिद्ध !

भारतीय ऋषी-मुनींनी जे लक्षावधी वर्षांपूर्वी सांगितले आहे, ते आता सांगणारे विज्ञान !

न्यूयॉर्क – ध्यान-धारणेमुळे मनाचा व्यायाम होऊन मेंदूची वाढ होते, असे संशोधनाने सिद्ध केले आहे. श्‍वसन नियंत्रित करून एकाग्रता साधण्याच्या ध्यान-धारणेच्या साध्या प्रकारांनी केवळ ८ आठवड्यांच्या आत शिकण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती वाढते. या प्रकारांनी झालेल्या मेंदूच्या रचनेतील एम्.आर्.आय. तपासणीत वरील बाब अमेरिकेच्या संशोधकांना आढळून आली. (भारतीय ऋषी-मुनींनी आणि हिंदूंच्या धर्मग्रंथांत उल्लेख असलेल्या घटना अन् त्यामागील कारणांचा विज्ञानाला ठाव घेता आला नसल्याने बुद्धीवादी हिंदूंच्या धर्मावर टीका करत असतात. तथाकथित पुरोगामी हिंदूही त्यात आघाडीवर असतात; मात्र जेव्हा विज्ञानातून हिंदु धर्मातील घटनांविषयी माहिती सिद्ध होते, तेव्हा त्याचे महत्त्व पटते. आतातरी हिंदु धर्मावर टीका करणारे तथाकथित बुद्धीवादी आणि पुरोगामी गप्प बसतील आणि पाश्‍चात्त्यांप्रमाणे जिज्ञासेने संशोधन करतील अशी अपेक्षा ! – संपादक)

हार्वर्ड संस्थेतील मज्जातंतू विशेषज्ञ डॉ. सारा लाझार म्हणाल्या, तुम्ही जेव्हा मेंदूचा एखादा भाग वापरता, तेव्हा तो वाढलेला आढळेल. ध्यान हे मूलतः मनाचा व्यायाम आहे. शरीराप्रमाणे मन वापरले नाही, तर ते निकामी होते, हा नियमच आहे. ध्यान करतांना शरीरात होणार्‍या पालटांवर मन एकाग्र करावे आणि इतर विचार काढून टाकावेत. आम्ही १६ स्वयंसेवकांना वरील व्यायाम प्रत्येक दिवशी अर्धा घंटा करायला सांगितला. नंतर त्यांचे आणि व्यायाम न करणार्‍यांचे एम्.आर्.आय. तुलनात्मक तपासून बघितले. त्यातून वरील निष्कर्ष निघाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात