बालमित्रांनो, आपला अमूल्य वेळ खर्च करणाऱ्या दूरचित्रवाहिनीच्या राक्षसाला दूर ठेवा !


बर का विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अतिप्रिय असणारी दूरचित्रवाणी बघण्यात तुम्ही आयुष्याचा किती वेळ घालवता याची तुम्हाला कल्पना आहे का? मित्रांनो, आम्हाला माहित आहे की, तुम्हाला आयुष्यात कोणीतरी व्हायचे आहे, तुमचे ध्येय गाठायचे आहे. तुमच्या आयुष्यातील एवढे तास जर तुम्ही दूरचित्रवाणी निवळ मनोरंजनासाठी पाहण्यात वाया घालवलेत, तर मोठेपणी तुम्हीच तुम्हाला क्षमा करणार नाही ! मित्रांनो, दूरचित्रवाणी एक राक्षस आहे, तुमचे डोळे बिघडवणारा, तुमचे विचार खुंटवणारा, तुमची मती मंद करणारा…! काहींची दृष्टी बिघडवणारा, तर काहींचे डोके दुखवणारा ! धिम्या गतीने पसरणारे ते एक विषच आहे म्हणाना ! मित्रांनो, तुमच्या मर्यादित आयुष्याचा बहुमूल्य वेळ अमेरिकेत ज्याला 'इडियट बॉक्स' म्हणतात, त्याच्या स्वाधीन करणार आहात का? हे दिवस आहेत तुमचे मैदानी खेळ खेळायचे, नवनवीन गोष्टी शिकण्याचे, छंद जोपासण्याचे, भरपूर व्यायाम आणि भरपूर वाचन करण्याचे ! मित्रांनो, याची शिदोरी तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे, नव्हे याच पायावर तुमच्या व्यक्तिमत्वाची इमारत उभी राहणार आहे ! तेव्हा 'सारा तो रिमोट बाजूला आणि हाती धरा पुस्तकाला !' हा मूलमंत्र जगा आणि तुमचे व्यक्तीमहत्व बहुगुणी बनवा !

पालकांनीही मुलांना ठराविक कार्यक्रम बघण्याचे बंधन घातले पाहिजे. जे कार्यक्रम मुलांना बंद ते पालकांसाठीही वर्ज्य ! दूरचित्रवाणीवरील वाईट गोष्टींचा मुलांवर परिणाम होऊ नये, असे वाटत असल्यास पालकांनीही एवढा त्याग करायलाच हवा !