शिक्षकांसोबत आपली वर्तवणूक अशी ठेवा !

विद्यार्थ्‍यांना नवनवीन ज्ञान देणारी व्‍यक्‍ती म्‍हणजे शिक्षक. शिक्षक विद्यार्थ्‍यांसाठी तन आणि मन यांचा त्‍याग करतात. त्‍यांच्‍यामुळे विद्यार्थ्‍यांना जीवनाची दिशा मिळते. बालवयात अनेक विद्यार्थ्‍यांना चांगले आणि वाईट यांतील भेद कळत नाही. शिक्षक चांगल्‍या-वाईट गोष्‍टींविषयी समजावून सांगतात. हे सर्व करतांना ते कधी विद्यार्थ्‍यांवर रागावतात, तर कधी ओरडतात ! याचा अर्थ असा नव्‍हे की, ते विद्यार्थ्‍यांवर प्रेम करत नाहीत. ते विद्यार्थ्‍यांशी आईच्‍या ममतेनेच वागतात. विद्यार्थ्‍यांमधील दोषांची जाणीवही शिक्षक करून देतात. कठोर होण्‍यामागेही ‘विद्यार्थी चांगले, सुसंस्‍कारित आणि ज्ञानी व्‍हावेत’, हाच त्‍यांचा उद्देश असतो. शिक्षक हे विद्यार्थ्‍यांचे मार्गदर्शकच आहेत.

१. हिंदु संस्‍कृतीनुसार शिक्षकांना ‘सर’ म्‍हणण्‍यापेक्षा ‘गुरुजी’ किंवा ‘आचार्य’ म्हणा.

२. शिक्षक भेटल्यावर विनम्रपणे हात जोडून त्यांना ‘नमस्कार गुरुजी’, असे म्हणा.

३. गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी शिक्षकांना फूल द्यावे आणि खाली वाकून नमस्‍कार करा.

४. शिक्षकांचा आदर राखून त्यांच्याशी नम्रतेने व प्रेमाने बोला.

५. वर्गातील इतर विद्यार्थ्‍यांनाही शिक्षकांचा आदर राखण्‍यास सांगा.

६. शिक्षकांमुळे विविध विषयांचे ज्ञान मिळत असल्याने त्यांच्याविषयी कृतज्ञ रहा.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी

१. विद्यार्थ्यांचा शिक्षकांप्रती भाव कसा असावा ?

पूर्वीच्या काळी शिक्षकांना गुरु वा आचार्य असे संबोधत असत. गुरु-शिष्य परंपरा हे हिंदु संस्कृतीचे अनमोल वैशिष्ट्य आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, गुरु जसे शिष्यांना ब्रम्हज्ञान देतात, तसे शिक्षक मुलांना त्यांच्याकडे असलेले विद्यारूपी अमुल्य धन देतात. म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षकदिन गुरुपौर्णिमेला साजरा करा. गुरुपौर्णिमेला शिक्षकदिन साजरा केल्यामुळे आपल्या संस्कृतीचे जतन होईल.

अ. जीवनाचा योग्य दिशादर्शक

शिक्षक आपल्या जीवनातील अज्ञान दूर करून व्यवहारातील अनेक विषयांचे ज्ञान देतात. आपल्या जीवनाचे योग्य दिशादर्शक म्हणजे शिक्षक होय. आपण त्यांचा प्रतिदिन आदरच करायला हवा. आजचा दिवस हा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचाच दिवस आहे.

आ. शिक्षा करण्यामागे शिक्षकांचा असलेला कल्याणकारी हेतू

आपण जीवनातील अयोग्य गोष्टी टाळाव्यात, आदर्श वागावे, यासाठी शिक्षक आपल्याला आईप्रमाणे शिक्षा करतात. त्यामागे आपण आदर्श व्हावे, हाच शुद्ध हेतू असतो. त्यांनी शिक्षा केल्यावर आपल्याला अज्ञानामुळे राग येतो; पण आपण त्यांच्या कृतीमागील हेतू समजून घ्यायला हवा. जसा कुंभार मडके घडवण्यासाठी कच्च्या मडक्याला थापटी मारतो, त्याप्रमाणे ते आपल्याला शिक्षा करतात. ‘मुलांच्या जीवनाला योग्य आकार यावा, त्यांचे जीवन समाजासाठी आदर्शवत आणि आनंददायी व्हावे’, असे शिक्षकांना वाटत असते.

इ. शिक्षकांकडे जातांना सतत शिकण्याच्या स्थितीत रहा

शिक्षकांना अनेक विषयांचे ज्ञान असते; म्हणून आपण त्यांच्याकडे गेल्यावर शिकण्याच्या स्थितीत रहावे. शिकण्याच्या स्थितीत राहून आपण शिक्षकांना शंका विचारल्यावर त्यांना शिकवायलाही आनंद मिळतो. पर्यायाने ते पुढचे पुढचे ज्ञान स्वतःहूनच देतात; म्हणून आपण या स्थितीत सतत रहायला हवे.

ई. शिक्षकांचे आज्ञापालन करा

समाजातील योग्य-अयोग्य गोष्टींचे आपल्याला ज्ञान नसते. शिक्षक ज्ञानी असतात; म्हणून ते जेव्हा एखादी गोष्ट ‘करा किंवा करू नका’, असे सांगतात, तेव्हा आपण त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्वरित कृती केल्यावर आपली प्रगती होते. यामध्ये शंका घेऊ नये.

उ. शिक्षकांना प्रतिदिन कृतज्ञतेच्या भावाने नमस्कार करावा

देवच आपल्याला शिक्षकांच्या माध्यमातून अनेक विषयांचे ज्ञान देत असतो. ते आपल्यावर आईप्रमाणे प्रेम करतात. त्यांना नमस्कार केल्याने ‘मी अज्ञानी आहे’, याची जाणीव सतत रहाते. ‘विद्या विनयेन शोभते’, या उक्तीप्रमाणे नमस्काराच्या कृतीतून ‘नम्रता’ हा गुण आपल्यात येतो. जेवढी आपल्यामध्ये नम्रता अधिक, तेवढी आपली ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वाढते. म्हणून प्रतिदिन कृतज्ञतेचा भाव जागृत ठेवावा. ‘त्यांच्यामुळेच मी ज्ञानी होणार असून माझे जीवन समृद्ध होणार आहे’, अशी सतत जाणीव ठेवणे म्हणजे कृतज्ञता. ते मला गणित शिकवतात; म्हणून मी व्यवहार नीट करतो, ते मला भाषा विषय शिकवतात; म्हणून मी संवाद साधतो, हे लक्षात ठेवून सतत कृतज्ञता व्यक्त करावी.

ऊ. शिक्षकांप्रती कृतज्ञतेचा आणि शरणागतीचा भाव ठेवा

आपण शिक्षकांकडे आईसारखेच आदराने पहावे. ते आपल्यावर प्रेम करतात. ते प्रत्येक गोष्ट आपल्याला निरपेक्ष भावाने शिकवतात. आज आपण शिक्षकांप्रती भाव कसा असावा, हे पाहिले. शिक्षक म्हणजे आपल्या जीवनाचे गुरु. आपण सातत्याने त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा आणि शरणागतीचा भाव ठेवल्याने आपला सर्वांगीण विकास होणार आहे.

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल