अध्यात्मच स्थायीभाव असलेल्या उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेल्या बालकांची वैशिष्ट्ये

१. आध्यात्मिक परिभाषेत बोलणारी आणि आध्यात्मिक भावविश्‍वात रमणारी बालके

काही जीव उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले असून त्यांचे विचार प्रगल्भ आहेत. ते विचार साधकांसाठी मार्गदर्शक आहेत.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही मराठी म्हण खरोखर किती योग्य आहे, हे त्यांच्या उदाहरणांवरून लक्षात येते. एखादे मूल भविष्यात कोण होणार, हे त्याच्या बालपणीच्या कृतींवरूनच समजते. साधक आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या या बालकांच्या विविध कृतींपैकी त्यांची आध्यात्मिक परिभाषा असलेली भाषाशैली हा एक वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे.

अनेकदा ही लहान मुले उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्मलेली आहेत, असेे तुम्ही कशावरून म्हणता ? असा प्रश्‍न बरेच जण विचारतात. त्यांपैकी काही मुलांचे बोलणे आणि वागणे यांविषयी पुढे दिलेल्या काही उदाहरणांवरून त्यांचे वेगळेपण आपल्या लक्षात येते. अशा मुलांची भाषाशैली आणि त्यांचे विश्‍व किती निराळे आहे, हे त्यांच्या बोलण्यावरून लक्षात येईल.

२. स्वतःचेे नाव पवनपुत्र हनुमान असल्याचे सांगणारा चि. मुकूल प्रभू (वय ३ वर्षे) !

एके दिवशी मी चि. मुकूल प्रभू याला सहज विचारले, तुझे नाव काय ? त्याने क्षणाचाही विलंब न लावता सांगितले, माझे नाव पवनपुत्र हनुमान आहे. त्याचे हे बोलणे ऐकून मला पुष्कळ आश्‍चर्य वाटले. स्वतःच्या नावाविषयी मानवाला सर्वाधिक आसक्ती असते; परंतु कु. मुकूलने स्वतःचेे नाव विसरून हनुमानाचे नाव स्वतःचे नाव म्हणून सांगितले. यावरून त्याची हनुमंताशी एकरूपता दिसून येते.

३. मोठेपणी संत होणार, असे सांगणारा अमेरिकेतून भारतात आलेला महर्लोकातील बालसाधक कु. अफोलाबी मिसा (वय १५ वर्षे) !

जवळजवळ प्रत्येकाचेच आपण मोठेपणी कोण व्हायचे ? याविषयी एखादे स्वप्न असते. त्या स्वप्नांना साकारत त्यानुसार कुणी अधिवक्ता (वकील) होण्याचा प्रयत्न करत असतो, कुणी आधुनिक वैद्य (डॉक्टर), तर कुणी अभियंता (इंजिनियर) होण्याचा प्रयत्न करत असतो; परंतु अमेरिकेतून भारतात साधनेसाठी आलेल्या कु. अफोलाबी मिसा याला तू मोठेपणी कोण होणार ? असे विचारले असता त्याने सर्वांपेक्षा वेगळे उत्तर दिले. त्याने काही वर्षांपूर्वी सांगितले, मी मोठेपणी संत होणार ! सध्याच्या कलियुगात मी मोठेपणी संत होणार, असे ध्येय ठेवून स्वप्न पहाणारी व्यक्ती अतिशय विरळाच !

४. चित्रकला स्पर्धेत श्रीकृष्णाचे चित्र काढणारी विदेशी बालसाधिका कु. अनास्तासिया वाले (वय १० वर्षे) !

कु. आनास्तासिया वाले गोव्यातील शाळेत शिकते. हिच्या शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा होती. सर्वांनी या स्पर्धेमध्ये विविध प्रकारची चित्रे काढली; परंतु कु. अनास्तासिया ही विदेशी बालसाधिका मूलतः हिंदू संस्कृतीमधील नसूनही तिने सर्वांपेक्षा वेगळे म्हणजे हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीकृष्णाचे चित्र काढले.

५. सतत अध्यात्म जगणारी महर्लोकातून आलेली बालसाधिका कु. पूर्ती लोटलीकर (वय ४ वर्षे)!

५ अ. रंगांचे आध्यात्मिक वैशिष्ट्य अचूक सांगणारी कु. पूर्ती ! : कु. पूर्ती लोटलीकर हिला एक दिवस तिची आई चित्रातील रंगांविषयी शिकवत होती. आईने पूर्तीला विचारले, पूर्ती, पिवळा रंग कशाचा असतो ? पूर्तीने लगेचच सांगितले, चैतन्याचा !

५ आ. श्रीकृष्णाला मामा म्हणून संबोधणारी आणि श्रीकृष्णाच्या भावविश्‍वात रममाण असणारी कु. पूर्ती ! : एकदा पूर्तीने तिच्या बाईंना (शिक्षिकेला) सांगितले, कृष्ण माझा मामा आहे. तो माझ्या नेहमी सोबतच असतो. बाईंना वाटले की, पूर्तीच्या आईच्या भावाचे नाव कृष्ण आहे; परंतु त्यांना तो नेहमी सोबतच असतो, हे कळले नाही; म्हणून त्यांनी पूर्तीच्या आईला विचारले, ही काय म्हणत आहे ? तेव्हा पूर्तीच्या आईने त्यांना सांगितले, ती भगवान श्रीकृष्णाला मामा म्हणते. त्याच्याशी ती बोलते, खेळते आणि तो तिच्या हृदयात वास करतो, असा तिचा भाव आहे. त्यावर त्या बरं बरं, असे म्हणाल्या.

बुद्धीजीवी लोकांना अध्यात्माची परिभाषा कळत नसते. या बालकांना ही उत्तरे कोणी शिकवलेली नाहीत. तर मग त्यांना हे कोणी शिकवले ? उच्च लोकांतून आलेल्या या बालकांचा अध्यात्म हा स्थायीभाव असल्यामुळे तो त्यांच्या भाषाशैलीतून प्रकट होतो.

–  कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, गोवा. (०१.०८.२०१४)