मित्रांनो, नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरा करा !

मित्रांनो, गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा न करता तो ३१ डिसेंबरला साजरा करून महान भारतीय
संस्कृतीचे हनन करण्याचे पातक ओढवून घेऊ नका !

इंग्रजी पंचांगानुसार जुने हे वर्ष संपून आपण नवीन वर्षाकडे वाटचाल करत आहोत. त्या निमित्ताने जाता जाता वाचकांशी हितगुज…

प्रतीवर्षी प्रमाणे याही वर्षी ३१ डिसेंबर उत्साहाने कसा साजरा करता येईल, याचे नियोजन लहान मुले, पालक आणि गल्लीबोळांतील वृद्धांपासून ते अशिक्षितांपर्यंत सर्व जणच करू लागले आहेत. कोणी सुट्या घेऊन, कोणी सायंकाळी आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेत ३१ डिसेंबर साजरा करण्याच्या मागे लागलेले दिसू लागले आहे. त्यात शाळा आणि महाविद्यालयेही मागे नाहीत. हे सर्व पाहून मन सुन्न होऊन जाते. वाचकहो, आपणही असेच करत असाल ना ? एक पालक या नात्याने आपल्याशी या निमित्ताने मी हितगुज करू इच्छिते.

१. रामनवमी, हनुमान जयंती इत्यादी हिंदु सण साजरे करण्यामागे धर्मशास्त्रात आधार; मात्र ३१ डिसेंबर साजरा करण्यामागे धर्मशास्त्रात कुठे आहे आधार ?

खरंच ३१ डिसेंबर साजरा करून आपल्या मुलांचे हित होणार कि आपल्या देशाचे हित होणार ? हे सर्व करून पर्यायाने आपला वेळ, पैसा, श्रम तसेच आजची पिढीसुद्धा यांचाच नाश होणार नाही का ? ३१ डिसेंबर साजरा करून नवीन वर्षाचे स्वागत करणे, हा आपला उद्देश असेल, तर मला सांगा, ३१ डिसेंबरला धर्मशास्त्रात कुठे आधार आहे का ? जसे रामनवमी, हनुमान जयंती, दिवाळी, दसरा इत्यादी हिंदूंचे सर्व सण साजरे करण्यामागे काहीतरी ऐतिहासिक, पौराणिक किंवा धार्मिक (आध्यात्मिक) कारणे आहेत. हे सण साजरे केल्याने आपली संस्कृती जोपासली जाईल, सर्व लहान-थोरांवर सुसंस्कार होतील. सदगुणांची जोपासना होऊन आपल्या मरगळलेल्या मनाला तजेला आणि त्यातून वैयक्तिक आनंद, राष्ट्रीय उन्नती, संघभावना वृद्धींगत होईल.

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी साजरे करण्यामागे असे काहीतरी कारण असेल, असे वाटत नाही. मेकॉलेच्या इंग्रजी शिक्षणप्रणालीमुळे इंग्रजाळलेल्या लोकांनी १ जानेवारीला नववर्षारंभ करून आपल्या संस्कृतीचे हनन केलेले जिकडे तिकडे दिसते.

२. ३१ डिसेंबरच्या रात्री तरुणाईकडून होणारे बेताल वर्तन महान भारतीय संस्कृतीला शोभणारे आहे का ?

३१ डिसेंबरच्या सायंकाळपासून मेजवान्यांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये मटण-बिर्याणी, दारू, गुटखा, सिगारेट, पत्ते यांचा मोठ्या प्रमाणात समावेश केलेला दिसतो. अगदी मोठ्या माणसांपासून लहान मुलांपर्यंत सर्व जण त्या मेजवानीमध्ये सामील झालेले दिसतात. रात्रभर मनोरंजनाचेकार्यक्रम करण्यासाठी मोठ्या आवाजात ध्वनीवर्धकावर (लाऊड स्पीकरवर) पाश्‍चात्त्य संगीत लावून त्यानुसार ब्रेक डान्स केले जातात. त्यानंतर काही स्पर्धा ठेवून जल्लोष केला जातो. यामध्येतरुणाईला शोभणार नाही, असेच सर्वकाही असते. ते मेजवानी संपल्यानंतर मद्यप्राशन करून रात्रभर धिंगाणा घालतात. मद्यधुंद अवस्थेतच उरलेली रात्र घालवली जाते. याच काळात युवतींवर अतीप्रसंग केल्याच्या घटनाही घडतात. हे वर्तन आपल्या पवित्र आणि महान अशा भारतीय संस्कृतीला लांच्छनास्पद आहे.

३. पालकांनो, मुलांना अवास्तव मोकळीक देणे, हे मुलांचे जीवन अंती उद्ध्वस्त करणार आहे, हे लक्षात घ्या !

एक सुजाण नागरिक म्हणून मी आपल्याला हा प्रश्‍न विचारू इच्छिते, आपणच आपल्या पाल्यांना असे वागण्याची अनुमती देऊन त्यांचा सर्वनाश करायला कारणीभूत आहोत, असे आपल्याला वाटत नाही का ? आपण संस्कृतीचे रक्षण करण्याऐवजी संस्कृतीचे हनन करून आपल्या मुलांचे जीवन उद्ध्वस्त करत आहोत आणि याच त्यांच्या अवगुणांनी पुढे ते आपल्यालाही उद्ध्वस्त करणार आहेत. आपण जसे पेरले, तसेच उगवणार ना ? आपले कुटुंब वाचायला हवे, तर योग्य वेळीच डोळ्यांवरचे झापड काढून शहाणपणाने आपल्या संस्कृतीनुसार वागायला हवे. त्यामुळे आपल्या मुलांवर सुसंस्कार होतील आणि ती आपल्या कुटुंबाचे, पर्यायानेे देशाचे नाव उज्ज्वल करतील.

मित्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. या सगळ्याचा गांभीर्याने विचार करा, अशी कळकळीची विनंती ! आपण चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला धर्मशास्त्रानुसार नववर्षारंभ साजरे करणार, असा सर्वांनी आजच निश्‍चय करा !

– सौ. स्मिता गंगाधर तांडेल, अंधेरी, मुंबई.