मुलांनो देवाची पूजाअर्चा आदी उपासना करा !

१. देवाची पूजा करावी

देवघरात पूजा झालेली असल्यास स्नानानंतर प्रथम देवघरासमोर उभे राहून देवाला हळद-कुंकू आणि फूल वहावे. देवाला उदबत्तीने ओवाळावे. एखाद्या वेळी पूजा झालेली नसल्यास वडीलधार्‍यांची अनुमती घेऊन आपण ती करावी.

२. श्री गणेशवंदन करावे आणि अन्य श्लोक म्हणावेत

देवाची पूजा करून झाल्यावर श्री गणेशाला वंदन करावे. या वेळी दोन्ही हात जोडून पुढील श्लोक म्हणावा :

वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।

अर्थ :(दुर्जनांचा नाश करणारी) वाकडी सोंड, महाकाय (शक्तीमान) आणि कोटी सूर्यांचे तेज असलेल्या श्री गणेशा, माझी सर्व कामे सदा कोणतेही विघ्न न येता सफल होऊ देत.

३. देवाला प्रार्थना कराव्यात

अ. हे देवा, मला चांगल्या गोष्टी करण्यासाठी दिवसभर साहाय्य कर अन् वाईट गोष्टींपासून सदा दूर ठेव.

आ. हे कुलदेवते, तुझ्या नामजपाचे मला सतत स्मरण राहू दे.

इ. हे श्रीरामा, मला सर्व थोरामोठ्यांचा आदर करायला शिकव.

ई. हे श्रीकृष्णा, मला माझा देश आणि धर्म यांविषयी प्रेम वाटू दे.

४. देवाला नमस्कार करावा

कुलदेवता किंवा उपास्यदेवता, तसेच अन्य देवता यांना मनोभावे साष्टांग नमस्कार घालावा. साष्टांग नमस्कार घालणे शक्य नसेल, तर हात जोडून नमस्कार करावा.

५. देवाचा नामजप करावा

शेवटी बसून १० मिनिटे तरी देवाचा नामजप करावा. कोणत्या देवाचा नामजप करावा, हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल.

अ. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांची कुलदेवता श्री भवानीमातेची उपासना करायचे. श्री भवानीमातेच्या आशीर्वादाने ते ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापू शकले. मुलांनो, इतर देवतांपेक्षा आपली कुलदेवता आपल्या हाकेला लगेच ‘ओ’ देणारी असते; म्हणून तिची उपासना करावी. यासाठी तिचा नामजप करावा.

आ. नामजप करतांना देवतेच्या नामाआधी ‘श्री’ लावावा, नामाला चतुर्थीचा प्रत्यय लावावा आणि शेवटी ‘नमः’ म्हणावे, उदा. कुलदेवता भवानीदेवी असेल, तर ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’ असा नामजप करावा. उपास्यदेवता गणेश असेल, तर ‘श्री गणेशाय नमः ।’ असा नामजप करावा. कुलदेवता ठाऊक
नसेल, तर उपास्यदेवतेचा नामजप करावा.

इ. दिवसभरही मध्ये मध्ये नामजप करायचा प्रयत्न करावा.

उ. तिन्हीसांजेच्या वेळी हे करावे !

१. ‘शुभं करोति’ म्हणा : सूर्यास्तानंतर संधीकाल चालू होतो. या काळात प्रबळ होणार्‍या वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी आचारपालन करावे. त्यासाठी हातपाय आणि तोंड धुऊन अन् देवापुढे दिवा लावून पुढील श्लोक म्हणावा –

शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदाम्।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते ।।

अर्थ : दीपज्योती शुभ आणि कल्याण करते, त्याचप्रमाणे आरोग्य अन् धनसंपदा देते आणि शत्रूबुद्धीचा, म्हणजे द्वेषाचा नाश करते; म्हणून हे दीपज्योती, तुला नमस्कार असो.

२. स्तोत्रपठण करावे :श्रीरामरक्षास्तोत्र’, ‘मारुतिस्तोत्र’ यांसारखी स्तोत्रे म्हणावीत.

स्तोत्रे आणि आरत्या यांविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा !