मुलांनो, पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा आचरणात आणूया !

प्रतिज्ञा आचरणात आणल्यास मुलांमध्ये राष्ट्राभिमान निर्माण होऊन ती राष्ट्र अन् संस्कृती यांच्या रक्षणासाठी सिद्ध होणे

        ‘विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर प्रतिज्ञा लिहिलेली आहे. ती कशासाठी आहे ? आपल्या जीवनाची सर्व मूल्ये या प्रतिज्ञेत आहेत. प्रतिज्ञेप्रमाणे जगणे, हेच खरे शिक्षण आहे. ही प्रतिज्ञा व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांचा आत्मा आहे. आज आपण परीक्षार्थी झाल्यामुळे नैतिक मूल्यांपेक्षा गुणांना अधिक महत्त्व देतो. परीक्षेमध्ये ‘प्रतिज्ञे’विषयी प्रश्न विचारले जात नसल्याने तिचा अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे वागणे आणि जगणे या गोष्टी आपल्याला गौण वाटतात. जोपर्यंत आपली ही स्थिती पालटत नाही, तोपर्यंत अपल्यामध्ये राष्ट्राभिमान निर्माण होणार नाही आणि आपण राष्ट्राच्या रक्षणासाठी सिद्ध होणार नाही. आपण सर्वांनी प्रतिज्ञेप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करूया आणि राष्ट्र अन् संस्कृती यांच्या रक्षणासाठी सिद्ध होऊया.

प्रतिज्ञेतील वाक्यांचा अर्थ

आता आपण या प्रतिज्ञेतील वाक्यांचा अर्थ समजून घेऊया.

१. ‘भारत माझा देश आहे ’: आपण ‘भारत माझा देश आहे’, असे म्हणतो; परंतु आपल्याला तो ‘आपला’ वाटायला हवा. तरच आपण त्याची काळजी घेऊ आणि त्याचे संवर्धन करू. जर प्रत्येकालाच ‘हा देश माझा आहे’, असे वाटले, तरच प्रत्येकजण देशाच्या रक्षणासाठी सिद्ध होईल. देशात कोणतीच समस्या रहाणार नाही आणि देश ‘सुजलाम् सुफलाम्’ होऊन देशाचा सर्वांगीण विकास हेईल.

२. ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ : ‘देशातील प्रत्येक व्यक्ती माझा भाऊ/बहीण आहे. ‘संपूर्ण देशच माझे कुटुंब आहे’, असा आपला व्यापक विचार असायला हवा; पण प्रत्यक्षात आपण असे वागतो का ? याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. जर आपण याप्रमाणे वागलो, तर एकमेकांमध्ये भांडणे होणार नाहीत. सर्वजण एकमेकांसमवेत आनंदाने रहातील. सध्या शाळेतील मुले वर्गातसुद्धा एकमेकांसमवेत भांडतात. एकमेकांना वाईट बोलतात. ‘हे विश्वची माझे घर’ असा व्यापक विचार असेल, तर रामराज्य येईल.

३. ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे ’ : माझे माझ्या देशावर प्रेम आहे, तर देशातील प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू यांवर आपण जिवापाड प्रेम करायला हवे. आपण असे वागलो, तर देशात एकही समस्या रहाणार नाही. देशातील प्रत्येक कुटुंब आणि पर्यायाने राष्ट्र आनंदी होईल.

४. ‘माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे’ : विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परंपरा म्हणजेच आपली संस्कृती. आपली संस्कृती जगाला मार्गदर्शक ठरेल, इतकी उच्च आहे. ‘प्रत्येक व्यक्ती आनंदी रहावी’, अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. त्याग हीच आपली परंपरा आहे. आपण एकमेकांना भेटल्यावर नमस्कार करतो. कपाळाला टिळा लावतो. अशा परंपरांचा आपल्याला अभिमान असायला हवा. या परंपरांमधूनच आपल्यामध्ये राष्ट्राभिमान जागृत रहाणार आहे. आपण आधुनिकतेच्या नावाखाली आणि पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे हे सर्व विसरत चाललो आहोत.

५. ‘त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी; म्हणून मी सदैव प्रयत्न करीन’ :  परंपरांप्रमाणे आचरण करणे, म्हणजे त्यांचे पाईक होणे. आपले वागणे, बोलणे आपल्या परंपरांप्रमाणे असायला हवे; पण प्रत्यक्षात ते कसे होते, ते पाहूया. आपण दूरभाषवर ‘नमस्कार’ न म्हणता ‘हॅलो’ म्हणतो. आपल्या मुली आपल्या संस्कृतीनुसार पोषाख न घालता पुरुषांप्रमाणे जीन्स, टी शर्ट घालतात. त्या कुंकू लावत नाहीत. बांगड्या घालत नाहीत. आपण जर परंपरा पाळत नाही, तर आपण आपल्या परंपरांचे पाईक कसे होणार ?

६. ‘मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन’ : या प्रतिज्ञेतील वाक्याप्रमाणे आपण आपल्या आई-वडिलांना प्रतिदिन नमस्कार करत नाही. गुरुजनांचा आदर ठेवत नाही. काही मुले आपल्या गुरुजींची टिंगल करतात. हे सर्व पाप आहे. आजपासून आपण आपले आई-वडील आणि गुरु यांना प्रतिदिन वंदन करूया. आपण प्रत्येकाशी सौजन्याने वागलो, तर कुणाशीच आपले वैर रहाणार नाही.

७. ‘माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे’: आपण अशी प्रतिज्ञा करतो; परंतु माझ्या देशबांधवांची प्रगती आणि देशाचे रक्षण यांसाठी मी काय करतो ? आपले शेजारी देश पाकिस्तान आणि चीन आपल्याशी युद्ध करण्याच्या सिद्धतेत आहेत. अशा कठीण परिस्थितीत आपण आपला देश, संस्कृती आणि धर्म यांच्याशी एकनिष्ठ असायला हवे.

८. ‘त्यांचे (देश आणि देशबांधव यांचे) कल्याण आणि त्यांची समृद्धी यांतच माझे सौख्य सामावले आहे’ : आपली प्रत्येक कृती इतरांच्या कल्याणासाठी हवी. इतरांची प्रगती झाली की, आपल्याला आनंद व्हायला हवा. आज आपल्याला समाजात आसुरी वृत्ती पहायला मिळते.

           विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रतिदिन शाळेत ही प्रतिज्ञा म्हणत असतो; पण ‘त्याप्रमाणे कृती करायला हवी’, असा विचारही आपल्या मनात आला नाही. आजपासून आपण या प्रतिज्ञेप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि ती पूर्ण केली. हे त्यांना कसे शक्य झाले ? शिवरायांनी त्यांची कुलदेवता भवानीमातेची भक्ती केली. आपणही आपल्या कुलदेवतेची भक्ती करूया. आपल्या कुलदेवतेचा नामजप करूया. प्रत्येक कृती करण्यापूर्वी देवतेला प्रार्थना करूया. मित्रांनो, भक्तीनेच शक्ती मिळते.’

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल.