श्री गुरुनानक यांची ईश्वरभक्ती

मन हाच शेतकरी आहे. आपले शरीर हेच एक सुंदर शेत आहे. ईश्वराचे नाम हेच या शेतातील बियाणे आहेत. प्रेमानेच ही बियाणे रुजतात, फुलतात आणि फळतात. माझ्या शेतातून मी अशा प्रकाराने इतके पीक काढीन की, माझ्या कुटुंबाला भरपूर उत्पन्न पुरेल.” ही वाक्ये आहेत गुरुनानक यांची. गुरुनानक हे शिख पंथाचे संस्थापक होत.

पंजाबातील तळवडे या गावी काळू नावाचा एक शेतकरी होता. त्याला एक मुलगा झाला. त्याचे नाव नानक ठेवण्यात आले. नानक लहानपणापसूनच धार्मिक वृत्तीचा होता. नानक थोडा मोठा झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्याला शाळेत घातले. शाळा सुटल्यावर तो गायी-गुरांना रानात चरावयास घेऊन जात असे. तेथे जाऊन तो देवाचे भजन करत असे.

एक दिवस तो देवाची प्रार्थना करत असतांना एक वृद्ध शेतकरी तेथे आला. तो नानक यांना म्हणाला, ”मला यात्रेला जायचे आहे. मी चार दिवसांत परत येईन. तोपर्यंत माझ्या शेताची राखण कर. मी तुला पोतभर गहू देईन. माझ्या शेतात दहा पोती गहू पिकतात.” नानक यांनी त्याला होकार दिला. तो शेतकरी आनंदाने यात्रेला निघाला. नानक त्याच्या शेताच्या माचीवर बसले. शेतात गव्हाची भरगच्च कणसे आली होती. पहाता पहाता चिमण्यांचे थवेच्या थवे तेथे आले. त्या चिमण्या दाणे खाऊ लागल्या. तेव्हा नानक यांनी देवाची प्रार्थना केली, ”देवा, शेतकऱ्याच्या दाण्यांचे रक्षण कर. चिमण्यांना तुझे दाणे खाऊ घाल.” हा प्रकार चार दिवसांपर्यंत चालला. चिमण्या प्रतिदिन दाणे खात होत्या. चार दिवसांनंतर शेतकरी परत आला. शेतातील पीकांवर चिमण्यांचा थवा पाहून तो रागावला. तेव्हा नानक म्हणाले, ”शेतकरीबाबा, रागावू नका. शेताची कापणी करा. मग दाणे मोजून पहा. मी देवाचे दाणे चिमण्यांना दिले. तुमचे दाणे शिल्लक आहेत.” हे ऐकून शेतकऱ्याने शेताची कापणी केली. दाणे काढले आणि ते मोजून पाहिले. दाणे अकरा पोती भरली. देवाची ही कृपा पाहून शेतकऱ्याने नानकांचे पाय धरले.

मुलांनो, प्रार्थनेचे महत्त्व तुम्हाला कळलेच असेल. मनापासून आर्ततेने प्रार्थना केल्यास ईश्वर धाऊन येतो; म्हणून सतत कुलदेवतेचे नामस्मरण, प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. प्रार्थनेत पुष्कळ शक्ती आहे.

Leave a Comment