सदगुणांच्या साहाय्याने शिक्षणपद्धतीतील दुष्परिणामांवर मात करून गुणसंपन्न होऊया !

१. विद्यार्थी हा परीक्षेतील गुणांनी नव्हे,
तर त्याच्यामधील सद्गुणांनी आदर्श बनणे

विद्यार्थी मित्रांनो, आपण आज ज्या शिक्षणपद्धतीत शिकत आहोत, ती पद्धत पूर्णपणे ‘परीक्षा पद्धत’ आहे. एखाद्या मुलाला किती टक्के गुण आहेत, त्यावर त्या मुलाची गुणवत्ता चांगली कि वाईट ते ठरते. खरे शिक्षण म्हणजे स्वतःतील दोषांचे (दुर्गुणाचे) निर्मूलन आणि सद्गुणांचे संवर्धन करण्याची प्रक्रिया ! एखाद्या मुलाला ९० टक्के गुण आहेत; पण त्याच्यात अनेक दोष आहेत. मग त्याचा सर्वांगीण विकास झाला का ? म्हणजे टक्केवारीच्या समवेत मुलामधील दोष जात आहेत का, याचे मूल्यमापन करायला हवे. एखाद्या मुलाची टक्केवारी चांगली आहे; पण उद्धटपणे वागणे, खोटे बोलणे, इतरांना दुःख होईल, असे बोलणे, हे दोष त्याच्यात असल्यास आपण त्याला हुशार म्हणावे का ? सध्याची आपली शिक्षणपद्धत एकांगी आहे. वरील दोन्ही गोष्टींना परीक्षेतील गुणांएवढेच महत्त्व यायला हवे. तसे न केल्याने मुलांचा सर्वांगीण विकास होतांना दिसत नाही. त्यामुळे समाजात आपल्याला विचित्र वागणारी मुले दिसतात.

२. केवळ गुण मिळवण्यापेक्षा सद्गुण अंगी बाणवणे, हेच खरे शिक्षण !

आई-वडिलांशी उद्धटपणे बोलणे, शिव्या देणे, एकमेकांना उलट बोलणे, खोटे बोलणे, इतरांना त्रास देणे अशा अनेक दुर्गुणांचा प्रभाव आज मुलांमध्ये दिसतो. त्यांचा त्रास समाज, कुटुंब आणि तो मुलगा यांना होतो. एखाद्या मुलामध्ये राग येणे, हा दोष आहे, तर तो आनंदी राहील का ? नाही ना ? म्हणजे ‘राग हा दोष जाण्यासाठी प्रयत्न करणे’, हेच शिक्षण आहे. मुलांनो, आपल्या वागण्यातून आई-वडील, तसेच समाज यांना आनंद मिळेल, असे वर्तन व्हायला हवे. तसे नसेल, तर आपण आपल्यात पालट करायला हवा. केवळ ‘गुण’ मिळवून स्वतःत पालट करता येत नाही.

३. परीक्षा पद्धतीमुळे नक्कल (कॉपी) करण्याचे प्रमाण वाढणे

सध्याच्या परीक्षापद्धतीमुळे मुलांना गुण म्हणजेच सर्वस्व वाटते. त्यामुळे यातून नक्कल (कॉपी) करणे म्हणजे ‘गुणांची चोरी’ करणे, ही विकृती हळूहळू मुलांमध्ये वाढत असल्याचे दिसून येते. नक्कल करणे योग्य कि अयोग्य आहे ? एखाद्या मुलाने नक्कल (कॉपी) करून अधिक गुण मिळवले, तर त्याला हुशार आणि आदर्श म्हणावे का ? यातूनच पुढे मुलांमध्ये चोरी करण्याची वृत्ती निर्माण होते.

४. एकमेकांविषयी प्रेमभाव वाढवून
मत्सर आणि द्वेष यांचे निर्मूलन करणे म्हणजे खरे शिक्षण !

हल्ली ‘अधिक गुण’ हाच निकष असल्यामुळे एखाद्या मुलाला अधिक गुण मिळाल्यास त्याच्यासमवेत इतरांची स्पर्धा वृत्ती वाढते. स्पर्धेतून एकमेकांविषयी प्रेमाची भावना न रहाता द्वेषाची भावना निर्माण होते. खरेतर शिक्षण म्हणजे द्वेषाचे निर्मूलन करणे आणि एकमेकांविषयी प्रेमभाव वाढवणे होय.

५. सध्याच्या शिक्षणपद्धतीमुळे मुलांमध्ये
निर्भयता न आल्याने आत्महत्येसारखे प्रकार घडत असणे

परीक्षापद्धतीमुळे मुलांवर ‘गुण हेच सर्वस्व असून ते अधिक मिळाले नाहीत, तर आपले जीवन निरर्थक आहे’, असा चुकीचा संस्कार झाला आहे. त्यामुळे मुलांच्या मनावर ताण येऊन मुले निराशेत जातात आणि आत्महत्या करतात. शिक्षण म्हणजे मुलांमध्ये निर्भयता येणे. छोट्याशा अपयशाने मुलांनी निराश न होता यातून समर्थपणे मार्ग काढायला शिकले पाहिजे.

६. देवाची भक्ती म्हणजेच जीवनातील सर्वांत मोठी संपत्ती !

मुलांनो, भक्त प्रल्हादामध्ये निर्भयता कोठून आली ? ठायी ठायी मृत्यू समोर असतांना प्रल्हादाला केव्हाच त्याची भीती वाटली नाही. मग प्रल्हाद कोणत्या शाळेत गेला होता ? मुलांनो, भक्त प्रल्हाद सतत देवाचे स्मरण करत होता. जो देवाचे स्मरण करतो, त्याच्यात देवाचे गुण येतात. देव सर्वगुणसंपन्न आहे. म्हणून आजपासून आपण देवाचे स्मरण करूया आणि सर्वगुणसंपन्न होऊया.

७. मुलांनो, संकुचित वृत्ती सोडून राष्ट्राभिमान जागवा !

आज मुलांमध्ये ‘गुण मिळवण्यासाठी विषय शिकणे’, असा संकुचित विचार निर्माण झाला आहे, उदा. मुले केवळ गुणांसाठी इतिहास शिकतात. ‘मला राष्ट्रपुरुषांसारखे व्हायचे आहे, त्यांच्यासारखा राष्ट्राभिमान माझ्यात यायला हवा’, हा विचारच मनापासून मुलांमध्ये रुजत नाही. मुलांनी ही संकुचित वृत्ती सोडून आपल्यात राष्ट्राभिमान निर्माण करायला हवा.

८. विद्या विनयेन शोभते !

मुलांनो, शिक्षणातून आपल्यामध्ये नम्रता यायला हवी. नम्रतेविना आपण ज्ञान ग्रहण करू शकत नाही. आपण सतत नम्र असायला हवे. नम्रतेनेच ज्ञानाला आरंभ होतो; पण सध्याच्या या परीक्षापद्धतीमुळे मुलांमध्ये नम्रता येत नाही. आपण आजपासून तसा प्रयत्न करूया.

९. मुलांनो, ईश्वराची भक्ती करा !

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कुलदेवतेची उपासना केली. तेसुद्धा सर्वगुणसंपन्न होते; म्हणून मुलांनो, आपणसुद्धा ईश्वराची भक्ती केली, तर आपले जीवन चांगले आणि सर्वगुणसंपन्न होईल.’

– श्री. राजेंद्र पावसकर(गुरूजी)