श्री गणेश चतुर्थी

मित्रांनो, प्रदूषणमुक्त आणि शास्त्रानुसार गणेशोत्सव साजरा करून श्री गणेशाची कृपा संपादन करा !

विद्यार्थी मित्रांनो, गणपति हे सर्व हिंदूंचे आराध्य दैवत आहे, तसेच गणपति ही बुद्धीची देवता आहे. त्याने आपल्याला बुद्धी दिली नसती, तर आपण अभ्यास करूच शकलो नसतो. गणपति ही सर्वांना आनंद देणारी देवता आहे. मित्रांनो, अशा देवतेचा उत्सव आपण शास्त्राप्रमाणे साजरा करायला हवा, तरच आपल्यावर गणपतिबाप्पाची कृपा होईल. मित्रांनो, आपल्याला गणपति येणार; म्हणून आनंद होतो ना ? आज आपण शास्त्रानुसार गणेशोत्सव कसा साजरा करायचा, तसेच गणपतीच्या नावांचा अर्थ आणि गणेशोत्सवातील गैरप्रकार कसे बंद करायचे, ते पहाणार आहोत.

१. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागील पार्श्वभूमी

१ अ. लोकांमधील संकुचितता जाऊन ‘माझा गाव आणि माझा गणपति’, हा व्यापक विचार रुजवणे : मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास आरंभ केला. आपण पूर्वी घरोघरी गणपति आणत असू. आजसुद्धा आणतो. तरीही लो. टिळकांनीr सार्वजनिक उत्सव का चालू केला ? तर आपापल्या घरापुरते संकुचित न रहाता पूर्ण गाव आणि शहर यांतील सर्व लोक आपला भेदभाव अन् भांडणे-वाद विसरून एकत्र यावेत, सर्वांमध्ये संघभावना वाढावी. ‘माझे घर माझा गणपति’ यापेक्षा ‘माझा गाव आणि माझा गणपति’, हा व्यापक विचार प्रत्येकात रुजावा, यासाठी हा उत्सव सार्वजनिक करण्यात आला.

१ आ. संघटितपणा वाढवणे : त्या वेळी इंग्रज अत्याचार करत असत. अशा स्थितीत आपण सर्वांनी संघटित रहावे, हाच लोकमान्य टिळकांचा उद्देश होता. आज दहशतवाद, तसेच अनेक समस्या देशासमोर आहेत. त्या दूर करण्यासाठी आपण सर्वांनी संघटित रहायला हवे.

२. धर्मशिक्षण नसल्यामुळे शास्त्र ठाऊक नसल्याने अनेक अपप्रकार रुजले जाणे

मित्रांनो, गणेशोत्सव शास्त्राप्रमाणे साजरा करायला हवा, तरच आपल्यावर गणपतीची कृपा होईल. आपल्याला धर्माचे शिक्षण न दिल्यामुळे ‘गणेशा’च्या नावाचा भावार्थ ठाऊक नाही, गणेशपूजन शास्त्राप्रमाणे कसे करावे, हेही ठाऊक नाही; म्हणून आज आपल्या उत्सवात अनेक अपप्रकार होत आहेत. ते बंद केल्यानेच आपल्यावर गणपतीची कृपा होणार आहे.

संतांनी गौरवलेले दैवत श्री गणेश

         संतशिरोमणी श्री ज्ञानेश्वरमाउलींनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी ‘देवा तूचि गणेश, सकल मती प्रकाशु’, असे म्हणून गणरायाला सविनय वंदिले आहे. संत एकनाथांनी भागवतटीकेत श्री गणेशाला

ओम् अनादि आद्या । वेद वेदान्त विद्या ।
वंद्य ही परमा वंद्या । स्वयंवेद्या श्री गणेशा ।।

याप्रमाणे वंदन केले आहे. संत नामदेवांनी

लंबोदरा तुझे शुंडादुंड ।
करीतसे खंड दुश्चिन्हांचा ।।

असे म्हटले आहे.

३. प्रथम गणेशपूजन का करतात ?

           गणपति दशदिशांचा स्वामी आहे. दशदिशा म्हणजे अष्टदिशा अधिक ऊध्र्व(वरची) आणि अधर(खालची) अशा दोन दिशा. इतर देवता त्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत; म्हणून कोणतेही मंगलकार्य किंवा इतर कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपतिपूजन करतात.

४. श्री गणेशाला वक्रतुंड का म्हणतात ?

            सर्वसाधारणत: वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा, सोंडेचा असा अर्थ समजला जातो; पण ते चूक आहे. ‘वक्रान् तुण्डयति इति वक्रतुण्ड: ।’ म्हणजे वक्रमार्गाने (वाईट मार्गाने) चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करून जो सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुण्ड.’

५ . शास्त्रानुसार गणेशोत्सव कसा साजरा करावा ?

५ अ. उत्सवासाठी बनवले जाणारे योग्य मखर किंवा सजावट

५ अ १. सजावट सात्त्विक आणि पर्यावरणाला घातक न ठरणारी असावी : मित्रांनो, आपण गणपति येण्यापूर्वी दोन दिवस अगोदर सजावट करतो. सजावट सात्त्विक आणि पर्यावरणाला घातक होणार नाही, अशी असावी, उदा. बांबूपासून मखर बनवावे. आपण सजावटीसाठी केळीच्या खांबाचा वापर करू शकतो. नैसर्गिक वस्तूंचा जास्तीतजास्त वापर केल्याने त्या वस्तू विसर्जित करता येतात आणि त्यांचा पर्यावरणावर घातक परिणाम होत नाही. तसेच त्यांतील टिकणार्‍या वस्तू घरात राहिल्या, तरीही त्यांत आलेल्या गणेशलहरींमधील चैतन्याचा लाभ गणेशोत्सवानंतरही घरातील सर्वांनाच होतो आणि घरातील वातावरण आनंदी रहाते.

५ अ २. कागदी पताका वापरणे : सजावटीसाठी कागदांच्या पताकांचा वापर आपण करू शकतो. त्यामुळे सजावट चांगली होते. कागद नंतर विसर्जित करू शकतो.

५ अ ३. आंब्याच्या पानांचे तोरण बनवणे : आंब्याच्या पानांच्या तोरणांचा वापर जास्तीतजास्त करावा. त्यामुळे वातावरणातील गणेश लहरींचा अधिकाधिक लाभ होतो आणि कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.

५ अ १ अ . अयोग्य प्रकारची आणि पर्यावरणाला घातक असणारी सजावट टाळणे

५ अ २ आ. थर्मोकोलमुळे प्रदूषणात भरच पडणे : सध्या आपल्याला शास्त्रच ठाऊक नसल्याने सजावटीतर् सरास थर्मोकोलचा वापर केला जातो. थर्मोकोल पाण्यात विसर्जित केले, तरी ते विरघळत नाही. जाळले, तर वातावरणात प्रदूषित वायू सोडला जातो, म्हणजे यामुळे आपण एकप्रकारे प्रदूषणच वाढवतो. मित्रांनो, हे गणपतीला आवडेल का ? आपण प्रदूषणमुक्त सजावट करायला हवी कि नाही ?

५ अ २ इ. विद्युत दिपांचा अनाठायी वापर करणे : सध्या आपण सजावटीसाठी रोषणाईचा फारच वापर करतो. अनेक रंगीत दिव्यांचा वापर, तसेच मोठ्या प्रमाणात विजेच्या माळा वापरतो. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर होऊन वीज वाया जाते, तसेच त्यामुळे गणेशलहरींचा जास्त लाभ होत नाही.

         मित्रांनो, वीज वाचवणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्यच आहे. त्यामुळे आपल्यावर गणेशाची कृपाच होणार आहे. मित्रांनो, या गणेशोत्सवात आपण विजेचा वापर अत्यल्प करून राष्ट्राची ऊर्जा वाचवायची आहे.  आपण पहातो की, अनेक गावांमध्ये वीज नाही. शहरांमध्येही अनेक घंटे विजेविना रहावे लागते. तेव्हा राष्ट्राचा एक दक्ष नागरिक म्हणून राष्ट्राप्रतीचे आपले कर्तव्य बजावणे आवश्यक आहे. हेच गणपतीला आवडेल.

५ आ. गणेशमूर्ती कशी असावी ?

५ आ १. गणेशमूर्ती १ ते २ फुटाची असावी आणि अतीभव्य नसावी  : मित्रांनो, गणेशमूर्ती १ ते २ फुटाची असावी. मूर्तीशास्त्र ठाऊक नसल्याने २० ते २५ फुटांची मूर्ती आणली जाते. अशा भव्य मूर्तीची योग्य निगराणी करणेही अवघड असते. या मूर्तीचे विसर्जन करतांना तिला ढकलून दिले जात असल्याने आपल्याच देवतेची विटंबना होते. आपल्या गणरायाची अशी विटंबना झालेली आपल्याला आवडेल का ? नाही ना ? मग मित्रांनो, आपणच मोठी मूर्ती आणण्यासाठी विरोध करायला हवा.

५ आ २. ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’च्या मूर्तीपेक्षा प्रदूषण विरहित अशा शाडूच्या मातीची मूर्ती आणावी  : आपल्या धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे गणेशमूर्ती शाडूच्या मातीची असायला हवी. ती प्रदूषण विरहित असते. सध्या आपण ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’ची मूर्ती आणतो. ती लवकर पाण्यात विरघळत नाही. पर्यायाने तिचे अवशेष पाण्याच्या बाहेर येतात आणि मूर्तीची विटंबना होते. अशी विटंबना होऊ द्यायची का ? नाही ना ? तर मग आपणच लोकांचे प्रबोधन करून शाडूच्या मातीचीच मूर्ती आणण्याचा आग्रह धरायला हवा.

५ आ ३. कागदाच्या लगद्यापासून बनवलेली मूर्ती वापरणे अयोग्य ! : कागदाच्या लगद्यापासून बनवलेली मूर्तीही आणू नये; कारण शास्त्रानुसार शाडूच्या मातीच्या मूर्तीत वातावरणातील गणेश लहरी आकर्षित करण्याची क्षमता जास्त आहे. ती क्षमता कागदांत नाही. याने गणपतीच्या लहरींचा पूजा करणार्‍याला लाभ होणार नाही.

५ आ ४. रासायनिक रंगांतील मूर्ती न आणता नैसर्गिक रंगांचा वापर केलेली मूर्ती वापरावी  : मूर्ती रंगवण्यासाठी रासायनिक रंगांचा वापर केला जातो; परंतु शास्त्रानुसार नैसर्गिक रंगांचा वापर करावा. जेणेकरून मूर्ती विसर्जित केल्यावर त्या रंगामुळे प्रदूषण होणार नाही. आपल्या धर्मशास्त्राने पर्यावरणाचा सखोल विचार केला आहे. मित्रांनो, आपण लोकांना सांगायला हवे की, नैसर्गिक रंगांचा वापर केलेली मूर्तीच वापरा; कारण यानेच पर्यावरणाचे रक्षण होईल.

५ आ ५. गणेशमूर्ती चित्रविचित्र आकारांत न बनवता गणपति जसा मूळ रूपात असतो, तशीच त्याची मूर्ती बनवावी : मूर्ती चित्रविचित्र आकारांत बनवायची नसते. आजकाल कोणत्याही आकाराच्या मूर्ती बनवल्या जातात. हे योग्य आहे का ? एखादा नेता, तसेच संत यांच्या रूपात मूर्ती बनवतात. याला आपण विरोध करायला हवा. मित्रांनो, आपल्या आई-वडिलांना वेगळ्या रूपात दाखवलेले तुम्हाला आवडेल का ? गणपति जसा मूळ रूपात आहे, तशीच मूर्ती हवी, तरच गणेशाची शक्ती त्या मूर्तीत येईल आणि आपल्याला त्या शक्तीचा लाभ होईल. तेव्हा आपण अशी मूर्ती आणण्यास विरोध करायला हवा. करणार ना ?

५ इ. गणपती घरी आणतांना भाव कसा असावा ?

५ इ १. ‘खरोखरच देव घरी येणार’, असा भाव असावा ! : मूर्ती घरी घेऊन येतांना आपण असा भाव ठेवायला हवा की, खरोखरच देव आपल्या घरी येणार आहे. मूर्ती आणतांना नामजप करावा. तेव्हा आपण गणपतीच्या नावाचा जयघोष करू शकतो, तसेच भजने म्हणू शकतो.

         सध्या आपण पहातो की, गणपति आणतांना चित्रपटातील गाणी लावली जातात. अशी गाणी लावणे आणि त्यांच्या तालावर चित्रविचित्र हावभाव करत नाचणे अतिशय चुकीचे आहे. या वेळी अनावश्यक बोलणे आणि फटाके वाजवणेही गैर आहे.

         मित्रांनो, अशा वर्तनाने गणपतीला आपल्या घरी यावेसे वाटेल का ? नाही ना ? तर मग गणरायांना आणतांना देवाला आवडेल, असे वर्तन ठेवले, तरच गणपतीची कृपा होईल आणि देवाला आपल्या घरी यावेसे वाटेल.

५ र्इ. गणरायाचे आपल्या घरी आगमन झाल्यावर त्याचा लाभ कसा करून घ्यावा ?

५ र्इ १. गणपतीचा नामजप करून प्रार्थना करणे : गणपति घरी आल्यावर त्याचा नामजप करावा. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करावा. त्याला प्रार्थना आणि मानसपूजा करावी. गणपतीचे गुणगान करणारी भजने म्हणावी. सुरात आणि भावपूर्ण आरती म्हणावी.

काही मुले मात्र पत्ते खेळण्यात, क्रिकेटचे सामने आणि मालिका पहाण्यात मग्न होतात. मालिकेतील खून, मारामार्‍या अशा प्रसंगाने आपले मन देवतेच्या स्मरणापासून दूर जाते. मुलांनो, हे आपण टाळायला हवे, तरच गणरायांची कृपा संपादन करता येईल.

५ र्इ २. किंचाळत आरती म्हटल्याने देवतेचा अपमान होत असल्याने भावपूर्ण आणि आर्ततेने आरती करावी : आपण देवतांची आरती करतो. आरती म्हणजे देवाला आर्ततेने मारलेली हाक होय. मग मित्रांनो, आपण आरती भावपूर्ण आणि आर्ततेने म्हणतो का, याचा विचार कर. किंचाळत आरती म्हणणे, मध्येच एखादा शब्द जोरात आणि विचित्र आवाजात बोलणे, चित्रपटाच्या चालीवर आरती म्हणणे, हे टाळा. प्रत्यक्ष गणपतिच आपल्यासमोर आहे. त्याला हे आवडेल का ? मित्रांनो, तुम्हाला कोणी किंचाळत हाक मारलेली आवडेल का ? नाही ना ? मग देवाला कशी आवडेल ? असे करणे ही देवाची एकप्रकारची विटंबना आणि अपमानच आहे अन् म्हणूनच असे करणे टाळयला हवे.

५ उ. कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करावे ?

५ उ १. राष्ट्रपे्रम आणि देवतांप्रती भक्तीभाव जागृत करणारे कार्यक्रम असावेत : गणपति आणल्यानंतर प्रवचन, कीर्तन, भजन, भक्तीभाव जागृत करणार्‍या नाटिका, क्रांतीकारकांच्या जीवनातील प्रसंग सांगणारी व्याख्याने, राष्ट्रपे्रम जागृत होईल अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करा. चित्रपटाच्या गाण्यांवर नृत्य करणे, चित्रपटांच्या गायनाचा कार्यक्रम, संगीत खुर्ची, असे कार्यक्रम न करता गणपति स्तोत्रपठणाची स्पर्धा आयोजित करावी. मित्रांनो, ज्या कार्यक्रमांतून देवाविषयीचा भक्तीभाव जागृत होणार नाही, असे कार्यक्रम ठेवणे अयोग्यच आहे. अशा कार्यक्रमांत सहभागी होऊ नका. नाहीतर आपणसुद्धा पापाचे भागीदार होऊन गणपतीची अवकृपाच करून घेणार ! आपण गणपतीलाच प्रार्थना करूया, ‘हे गणराया, मला अशा कार्यक्रमांपासून दूर रहाण्याची शक्ती आणि बुद्धी तूच दे.’

६. विद्यापती श्री गणपतीची कृपा संपादन करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक

         मित्रांनो, आपण सर्व जण विद्यार्थी आहोत. विद्यार्थी म्हणजे सतत ज्ञान ग्रहण करण्यासाठी प्रयत्न करणारा. विद्या ग्रहण करायची असेल, तर विद्यापती श्री गणपतीची कृपा संपादन केल्याविना आपण ज्ञान ग्रहण करू शकत नाही. श्री गणेशचतुर्थी म्हणजे आपल्या जीवनातील महत्त्वाचा दिवस आहे. तसेच ज्या बुद्धीने आपण ज्ञान ग्रहण करतो, तिचा बुद्धीदाताही श्री गणपति आहे. बुद्धी सात्त्विक असल्याविना ज्ञानाचे आकलन होत नाही; म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण श्री गणपतीची अधिकाधिक कृपा संपादन करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. खरेतर या दिवसांत पृथ्वीवर गणेशतत्त्व मोठ्या प्रमाणावर येत असते. त्याचा आपण सर्वांनी लाभ करून घ्यायला हवा.’

७. गणपतीच्या काही नावांचा भावार्थ

१. विघ्नहर्ता : ‘आपल्या अभ्यासातील सर्व अडथळे श्री गणपति दूर करतो. आपण जर त्याला तळमळीने प्रार्थना केली, तर तो आपले सर्व अडथळे दूर करतो; कारण तो विघ्ने दूर करणाराच आहे.

२. वक्रतुंड : जे विद्यार्थी अभ्यास करतांना वाईट मार्ग, उदा. नक्कल करणे (कॉपी करणे), तसेच इतरांना त्रास होईल, असे वागणे-बोलणे यांचा अवलंब करतात, अशा वाईट (वक्र) मार्गाने जाणार्‍यांना श्री गणपति योग्य मार्गावर आणतो.

३. बुद्धीदाता : श्री गणपति आपल्याला सात्त्विक बुद्धी देतो. ती आपल्याला सतत चांगला विचार करायला शिकवते. चांगले विचार आपल्याला आनंद देतात; म्हणून आपण श्री गणपतीला ‘हे गणराया, मला सद्बुद्धी दे,’ अशी प्रार्थना करायला हवी.

४. विनायक : श्री गणपति हा सर्वांचा नायक, म्हणजे नेता आहे. विद्याथ्र्यांच्या जीवनात ‘नेतृत्व’ हा गुण महत्त्वाचा आहे. श्री गणपतीची कृपा संपादन करून हा गुणही आत्मसात करायला हवा.

५. मंगलमूर्ती : मंगलमूर्तीची उपासना केल्यावर आपण मंगल होतो. मंगल म्हणजे पवित्र, म्हणजे ज्याच्यात कोणतेच विकार नाहीत असा. आपण आपल्यातील दोष आणि अहं यांना दूर करून पवित्र, आनंदी व्हायचे आहे. यासाठी श्री गणपतीला प्रार्थना करूया, ‘हे गणराया, माझ्यातील दोष आणि अहं दूर करण्याची शक्ती अन् बुद्धी दे आणि मला तुझ्यासारखे मंगल कर.’

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल.


गणपति अथर्वशीर्ष ऐकण्यासाठी येथे क्लिक करा !


श्री गणपतीची आरती ऐकण्यासाठी येथे क्लिक करा !