स्वधर्मासाठी प्राणाची आहुती देणारे गुरु तेगबहादुर !

१. इस्लाम धर्म स्वीकारावा, यासाठी औरंगजेबाने गुरु तेगबहादुर यांना
अनेक प्रलोभने दाखवणे; परंतु ते क्षणमात्रही विचलित न होणे

गुरु तेगबहादुर यांनी इस्लाम धर्म स्वीकारावा, यासाठी औरंगजेबाने त्यांना देहलीला बोलावले आणि राजसभेत बोलावून विचारले, "तुम्ही शीख आहात, तर मग पंडितांचे नेतृत्व का करत आहात ? तुम्ही इस्लाम धर्माचा स्वीकार करा, नाहीतर मृत्यूला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा." गुरु तेगबहादुर म्हणाले, "मला मृत्यू मान्य आहे. मी स्वधर्माचा त्याग करू शकत नाही." औरंगजेबाने त्यांना राजसभेत उच्च पदे देण्याची अनेक प्रलोभने दाखवली; परंतु गुरु तेगबहादुर आपल्या प्रतिज्ञेपासून जराही विचलित झाले नाहीत.

२. गुरु तेगबहादुर प्रतिज्ञेपासून विचलित न झाल्याने
त्यांना मरणप्राय यातना देऊन त्यांचे शिर कापून फेकून देणे

गुरु तेगबहादुर प्रतिज्ञेपासून विचलित करण्यासाठी त्यांच्यासमोर भाई मतिदास यांच्या शरिराचे तुकडे तुकडे केले. भाई दयाळला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले, तरीही ते विचलित झाले नाहीत. पाच दिवस गुरु तेगबहादुर यांना मरणप्राय यातना दिल्या. शेवटी ११.११.१६७५ या दिवशी देहलीच्या चांदनी चौकात गुरु तेगबहादुर यांचे शिर कापून फेकून दिले.

३. चांदनी चौकातील गुरुद्वारा देत असलेला प्रेरणादायी संदेश

गुरु तेगबहादुर यांच्या या अपूर्व बलीदानाची स्मृती म्हणून देहलीच्या चांदनी चौकातील 'गुरुद्वारा शीशगंज' आजही आपल्याला संदेश देतो, 'जो देहापेक्षा धर्म अधिक मौल्यवान समजतो, त्याचे यश अविनाशी आणि शाश्वत होते.' तेगबहादुरांचे हे बलीदान युगानुयुगे धर्मप्रेमींना प्रेरणा देत राहील.

संदर्भ : गीता स्वाध्याय, एप्रिल २०१२