आत्मज्ञानापुढे मृत्यूला परतवून लावणा-या सिद्धीचीही किंमत शून्य असणे

चांगदेव सिद्धींच्या बळावर १४०० वर्षे जगले होते. त्यांनी मृत्यूला ४२ वेळा परतवून लावले होते. त्यांना प्रतिष्ठेचा मोह होता. त्यांनी संत ज्ञानेश्वरांची कीर्ती ऐकली. संत ज्ञानेश्वरांना सगळीकडे मान मिळत होता. चांगदेव ज्ञानेश्वरांचा मत्सर करू लागले. चांगदेवांना वाटले, ज्ञानेश्वरांना पत्र लिहावे; परंतु पत्राचा आरंभ कसा करावा, हे त्यांना कळेना; कारण ज्ञानेश्वरांचे वय अवघे सोळा वर्षे होते, मग पूज्य म्हणून कसे लिहिणार ? चिरंजीव लिहावे, तर ज्ञानेश्वर महात्मा होते. काय लिहावे काहीच समजेना; म्हणून त्यांनी कोरेच पत्र पाठवले.

संतांची भाषा संतच जाणतात. मुक्ताबाईंनी पत्राला उत्तर दिले, १४०० वर्षे तुझे वय झाले; पण तू तुझ्या पत्रासारखा कोराच राहिलास ! हे वाचून चांगदेवांना वाटले की, अशा ज्ञानी पुरुषांची भेट घ्यावी. चांगदेवांना सिद्धीचा गर्व होता. ते वाघावर बसून आणि सर्पाचा लगाम घेऊन भेटायला निघाले. ज्ञानश्वरांना समजले की, चांगदेव भेटायला येत आहेत. त्यांचे आदरातिथ्य त्यांना सामोरे जाऊन केले पाहिजे, असे त्यांना वाटले. त्या वेळी ज्ञानेश्वर ज्या भिंतीवर बसले होते, त्या भिंतीलाच त्यांनी चालण्याचा आदेश दिला. भिंत पुढे जाऊ लागली. हे चांगदेवांनी पाहिले आणि त्यांना पटले की, आपल्यापेक्षाही ज्ञानेश्वर श्रेष्ठ आहेत; कारण त्यांचा निर्जीव वस्तूंवरही अधिकार आहे. आपला केवळ प्राण्यांवरच अधिकार आहे. त्या क्षणीच चांगदेव ज्ञानेश्वरांचे शिष्य बनले.

तात्पर्य : सिद्धींचा वापर हा आत्मज्ञान मिळवण्याच्या मार्गावरील अडथळा आहे.