इंग्रजांना धडा शिकवणारे शिवाजी महाराज !


आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वस्तूंची सूची पाहिल्यास त्यामध्ये ‘खोबर्‍या’च्या प्रकाराच्या सूचीत ‘राजापुरी खोबरे’ असे स्वतंत्र नाव त्यात नमूद केलेले असते. ब्रिटीश व्यापार्‍यांची राजापूरला वखार होती. त्यांनी तेथील व्यापार्‍यांना हाताशी धरून त्यांना पैसे चारले आणि आपल्या शेतकरी बांधवांकडून ते अत्यंत पडेल भावाने हे खोबरे खरेदी केले. तेव्हा दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती.

शेतकर्‍यांकडे त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा याकरता माल दुसर्‍या बाजारात पाठवण्याइतपत त्यांची आर्थिक कुवत नव्हती. म्हणून ते हतबल होते. त्यांना प्रचंड हानी सहन करावी लागली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पत्र लिहून याबाबत कळवले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी ताबडतोब इंग्रजांकडून जो माल महाराजांच्या मुलुखात येत होता, त्यावर २०० टक्के दंडात्मक आयात शुल्क बसवले; जेणेकरून इंग्रजांच्या मालाची किंमत वाढून तो विकला जाऊ नये. या प्रकारामुळे इंग्रजांची तारांबळ उडाली. त्यांच्या मालाची विक्री कमी झाली. त्यामुळे इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिले की, आमच्यावर दया करा, सीमाशुल्क कमी करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी ताबडतोब खलिता पाठवला, मी शुल्क उठवण्यास एकाच अटीवर तयार आहे की, तुम्ही आमच्या राजापूरच्या शेतकर्‍यांची जी हानी केली ती भरपाईसह योग्य प्रकारे भरून द्या. आणि ते भरून दिल्याची पोचपावती शेतकर्‍यांकडून आली की, मग मी दंडात्मक शुल्क उठवीन, अन्यथा नाही. अखेर ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली. दुसर्‍या दिवसापासून त्यांनी त्या व्यापार्‍यांना गाठून त्यांच्यामार्फत सर्व शेतकर्‍यांना त्यांचे जितके रास्त पैसे होते, त्यासोबत हानीभरपाईची रक्कम देण्यास सुरुवात केली. त्यानंतर शेतकर्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांची भरपाई मिळाली असून ते समाधानी असल्याचे कळवले. त्यानंतर महाराजांनी सीमाशुल्क उठवले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment