जलप्रदूषण




१. वृक्षतोड केल्याने आणि इतर समस्यांमुळे वातावरणात पालट झाला. पूर्वीप्रमाणे न्यून दाबाचा पट्टा पालटल्याने त्याचा पावसावर परिणाम होऊन पाणी आणि हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे.

२. जलप्रवाहात कारखान्यातून निघणारा रासायनिक कचरा, मैला, घाण आणि घनकचरा यांमुळे नदी-नाले, अन् भूमीतील पाणी यांचे घातक प्रदूषण झाले आहे. दिल्लीत १०० दशलक्ष मैला यमुनेत टाकला जातो.

३. ‘वाढत्या लोकसंख्येमुळे घरगुती, सांडपाणी, साबणयुक्त, तेलयुक्त, सेंद्रीय-असेंद्रीय पदार्थ अशा प्रकारचे पाणी मोठ्या प्रमाणावर नद्या, नाले आणि गटारे यांत सोडून थेट समुद्रामध्ये येत आहे. त्यामुळे होणार्‍या जलप्रदूषणाने जलचर आणि जैविक विविधता यांवर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत आहे.’ – श्री. भीमराव गमरे, अंधेरी, मुंबई. (साप्ताहिक शोधन २१-२७ जानेवारी २०११)

४. ‘मुंबईतील कित्येक तलाव अतिक्रमण करून बुजवले आहेत, तर तलावांमध्ये कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या यांचे अतिक्रमण झाले आहे. – (साप्ताहिक शोधन)

अ. दूषित पाणीपुरवठ्याने रोग होणे

१. भूमीतील पाण्यात शुद्धतेचे प्रमाण अल्प होऊन नायट्रेट, पोटॅशियम आणि फॉस्पेट यांचे प्रमाण वाढल्याचे आढळते. भू-गर्भातील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण अधिक असल्याने, हाडांची ठिसूळता हा रोग देशातील १३ राज्यांत ५० लक्ष लोकांना असल्याचा अंदाज आहे.

२. पिण्याच्या पाण्यात विष्ठेतील जिवाणू सर्रास आढळणे त्यामुळे रोगराई पसरणे ! : बहुतेक पालिकेच्या जलवाहिन्या गटारे आणि नाले यांच्या शेजारी लागून झोपडपट्टी विभागात पाणीपुरवठा करतात. ‘महापालिकेने शहरभरात घेतलेल्या पाण्याच्या २८ सहस्त्र ६१० नमुन्यांपैकी ३० प्रतिशत, म्हणजे तब्बल ८ सहस्त्र ५५१ नमुने पिण्यायोग्य नव्हते. ८११ नमुन्यांमध्ये केवळ विष्ठेतच सापडणारा ‘ई.कॉली’ हा जीवाणू सापडला. याशिवाय, कावीळ, हगवण आणि इतर पोटाच्या रोगांना आमंत्रण देणारे जिवाणू मुंबईच्या पाण्यात आहेत.

याचा अर्थ, नाले तसेच गटारांमधील पाणी या पिण्याच्या पाण्यात मिसळते. आजही लक्षावधी मुंबईकर उघड्यावर मलविसर्जन करतात. पाण्याचे मोठे आणि छोटे नळ गंजले आहेत. काही नळ मुद्दामहून फोडले जातात. अशा स्थितीत मुंबईकर वर्षभर काविळीची साथ चालू रहावी किंवा पोटाच्या विकाराने ग्रासलेल्या रुग्णांनी रुग्णालये भरून जावीत, यात आश्चर्य नाही. (दैनिक महाराष्ट्र टाइम्स, २८.२.२०११)

आ. उपाय

१. पर्यावरणाच्या सुरक्षेकडे गेली ५० वर्षे दुर्लक्ष करून शेकडो नद्या प्रदूषित होण्यास उत्तरदायी असलेल्या राज्यकर्त्यांना कडक शासन करा ! : ‘पुणे येथील मुठा नदीचे पाणी खूपच प्रदूषित झाले आहे. तिचे एका मोठ्या गटारात रूपांतर झाल्याचे चित्र विमानतळावरून येतांना माझ्या दृष्टीस पडले. नदीचे पाणी एवढे प्रदूषित का होत आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे !’ – जयराम रमेश, केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री, काँग्रेस.’

२. पवित्र नद्यांचे प्रदूषण करणे, हे धर्मशास्त्राप्रमाणे महापाप आहे, हे लक्षात घेऊन धर्माचरण करणे ! : `कृष्णा ही सहस्त्रो वर्षांपासून आम्हा भारतियांची परम पवित्र नदी आहे. पुराणात तिचा महिमा सांगितला आहे. कृष्णेत चूळ भरणे, साबण लावून स्नान करणे, गुळण्या करणे, भांडी घासणे व घाण टाकणे हे हिंदूंच्या धर्मशास्त्राप्रमाणे महापाप आहे. त्या परमपवित्र कृष्णेत गावातील गटारे आणि घाण येऊन मिळते. साखर कारखान्यांची सगळी मळी टाकली जाते. पाणी दूषित झाले आहे. आमच्या धर्मभावना दुखावल्या जातात. शास्त्रानुसार ‘कृष्णेचे पावित्र्य राखले जाईल’, असाच प्रत्येकाचा आचार असावा. कृष्णा अपवित्र करणाराला कठोर शासन व्हायला हवे.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

इ. पाणीटंचाईची समस्या आणि उपाय

५० वर्षांत झालेल्या लोकसंख्यावाढीमुळे पाण्याची मागणी वाढली असून त्या मानाने पुरवठा अल्प होतो. आज पाण्यामुळे राज्याराज्यात भांडणे होत आहेत. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आंतरराज्य नद्यांची जोडणी व्हायला हवी; कारण उत्तर प्रदेशातील यमुना, गंगा नद्यांना १२ ही मास पाणी असते. ते पाणी जर दक्षिण भारतात नदी जोडणीप्रकल्पाद्वारे आणले, तर पुष्कळ समस्या दूर होतील.